सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत (भाग – १२) – भावविभोर भटियार ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
संगीत जय जय गौरीशंकर नाटकातील विद्याधर गोखल्यांच्या ‘निराकार ओंकार साकार झाला, तये विश्वसंचार हा रंगविला’ ह्या शब्दांतला साकार होणारा ओंकार म्हणजे वसंत देसाईंनी त्यासाठी योजलेली भटियार रागाची धून! ह्या रागाचं रुपडं ‘पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा’ ह्या शब्दांतही नेमकं जाणवेल. पूर्वी डीडी-नॅशनलवर ‘राष्ट्रीय साक्षरता मिशन’ अधोरेखित करणारं हे सुरेख गीत लागलं कि त्या बालवयातही कान टवकारले जात हातातला उद्योग सोडून डोळे टीव्हीकडं वळायचे ते त्यातील मनाला अक्षरश: खेचून घेणाऱ्या सुरावटीमुळं! पूर्वेला क्षितिजावर साकार होणारं तेजबिंब पियुष पांडेंच्या ह्या शब्दांत उमटलेलं पाहाताना संगीतकार अशोक पत्कींना ते सुरांत सजवताना भटियारची सुरावट आठवावी हे आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचं सामर्थ्य! ह्या रागाची शास्त्रनिर्धारित गाण्याची वेळ ही सूर्याचा पहिला किरण पृथीवर पडतानाचीच आहे.
आपण मागच्या भागात पाहिलेल्या संध्याकाळच्या संधिप्रकाशी रागांतल्या सर्वपरिचित मारवा रागाची छटा ह्या सकाळच्या संधिप्रकाशाच्या सीमारेषेवरच्या रागातही शुद्ध धैवत, शुद्ध निषाद व कोमल रिषभाच्या स्वरसंबंधांतून दिसून येतेच… अर्थात भटियारची उत्पत्तीही मारवा थाटातूनच झालेली आहे. मात्र पुढे षड्जावरून वादी असलेल्या शुद्ध मध्यमावरची तेजस्वी झेप व शुद्ध मध्यमावरून पंचमाच्या कुशीत शिरून विसावणं ही गोष्ट आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. पंचमावरून परतताना गंधारवरचा क्षणभर थांबा आणि त्यानंतर पंचमावरून कोमल रिषभावर ओघळणारी मींड म्हणजे झेप घेताना विहंगम होत चंचलतेकडे झुकणाऱ्या मनाला पुन्हा गांभीर्याने स्थिरावायला मदत करणारं साधन!
‘जगाच्या पाठीवर’ ह्या चित्रपटातील ‘जग हे बंदिशाला, कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला’ किंवा संगीत मत्स्यगंधा नाटकामधील वसंत कानेटकरांचं ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ अशा वरकरणी थोड्याशा हताश, उदास शब्दांनाही ह्या रागाचा रंग शोभून दिसतोच. कारण कुठंतरी अशा हताश क्षणांत होणारे साक्षात्कारच काळरात्र दूर सारत नव्यानं (उगवून) उभरून, तेजाळून येण्याची चाहूल आणि चेतना घेऊन येतात… म्हणूनच कि काय भटियारमधल्या चैतन्यमय धैवताची ऊर्जा इथेही किमया घडवते.
भटियार रागातील बंदिशी ते रागधूनीवर आधारित सुगम संगीतातील बहुतांशी रचनांमधे उठून दिसणारा शुद्ध धैवत हा मला आजोबांनी नेटकी व साजिरी, देखणी देवपूजा केल्यानंतर समईच्या प्रकाशात उठून दिसणाऱ्या प्रत्येक देवमूर्तीच्या कपाळावरील मधोमध कुंकवाचा ठिपका ल्यायलेल्या नीटस व रेखीव चंदनी टिळ्याची आठवण करून देतो. भटियार रागाची ओळख सांगणाऱ्या जागांपैकी पधनीपधमप हा हिंदोळ फार लडिवाळ आहे… आपल्या मनाला एक सुखदायी झोका देणारा!
आशाबाईंच्या भावगर्भ सुराने सखोल अर्थासहित आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या, वसंत प्रभूंचा स्वरसाज असलेल्या ‘हरी उच्चारणीं अनंत पापराशी, जातील लयासी क्षणमात्रे’ ह्या ज्ञानोबारायांच्या रचनेचं सार्थस्मरणही ‘भटियार’निमित्तानेच! भक्तिभावाने केलेली ‘सुर’संगत किंवा ‘सूर’संगत दोन्हींतूनही हे साधत असावे.
किशोरीताई आमोणकरांनी केलेला ‘बोलाला विठ्ठल’ अभंगाच्या स्वररचनेच्या धृवपदातील भटियारचा प्रयोग आपल्या मनाला भक्तिरसात चिंब भिजवणारा आहे. पुढे अंतऱ्यांसाठी मात्र त्यांनी वेगळ्या अनोख्या वाटा धुंडाळल्या आहेत. अर्थातच एखादी स्वरधून ही जेव्हा ‘राग’ म्हणून सादर होत नाही त्यावेळी तिला रागाच्या नियमांचे काही बंधन नसते. ‘राग’ म्हणून गाताना वर्ज्य व विवादी असलेले सूर नजाकतीनं रागाच्याच सुरावटीसोबत वापरून तयार झालेल्या कित्येक रोमांचक स्वररचना आपण उपशास्त्रीय व सुगम संगीतात पाहातो. परंतू एकूणच उपशास्त्रीय व सुगम संगीतातील रचनांकडे स्वतंत्र दृष्टिकोनातून पाहायला हवे. एखाद्या रचनेला अमुक एक ‘रागाधारित’ असं आपण म्हणतो कारण ती सुरावट आपल्याला त्या विशिष्ट रागाची आठवण करून देते म्हणून! मात्र केवळ त्या आठवणीपायी त्या रचनांसारखा तो राग आहे असे म्हणणे मात्र संयुक्तिक होणार नाही.
हा विचार मनात ठेवता हिंदी चित्रपटसंगीताला नवे आयाम देणारा संगीतकार ए. आर. रहमानचे ‘वॉटर’ ह्या चित्रपटातील ‘नैना नीर बहाए’ हे गीत आठवल्याशिवाय राहात नाही. पहिली ओळ अगदी भटियारचं चलन घेऊन आलेली, मात्र दुसऱ्या ओळीतली राग ललतची छटा ही अगदीच चपखल आणि सुखद धक्का देणारी! म्हणून सुगम रचनांमधे केलेले रागांचे प्रयोग पाहायला मजा जरूर येते, मात्र शास्त्रदृष्ट्या रागाची व्याख्या पूर्ण वेगळी असते.
प्रभाकर जोगांनी ‘भटियार’वरच बेतलेले यशवंत देवांचे ‘कोटि कोटि रूपे तुझी’ हे शब्द रागाच्या बाबतीतही खरे ठरावेत. एकच सुरावट कुणाला कशी दिसते, कशी उमजते, कशी सजवावीशी वाटते ही गोष्ट ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’इतकी विविधता दर्शविणारी आहे आणि एकाच आरोह-अवरोहाच्या परिघात मुक्त संचार करत खरोखरी श्रेष्ठ अशा विविध संगीतसाधकांनी उभी केलेली एकाच रागाची अनंत रूपं ही किमया म्हणजे ‘त्याची’च विविध रूपं नाहीतर काय म्हणावं!!!
© आसावरी केळकर-वाईकर
प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (KM College of Music & Technology, Chennai)
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈