सुश्री अरूणा मुल्हेरकर
☆ सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग ८) – राग~ बागेश्री/बागेसरी ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
सूर संगतराग ललत किंवा ललित
********
मारवा थाटोत्पन्न ललत किंवा ललित या रागाचा विचार करतांना पहिली गोष्ट मनांत येते ती म्हणजे रागांतील स्वरांचा व निसर्गाचा किती घनिष्ठ संबंध आहे. सूर्योदयाची वेळ, हळूहळू वर चढणारा दिवस, मध्यानीची प्रखरता, सांजवेळ, रात्र, उत्तर रात्र, चोवीस तासांतील हे सगळे प्रहर सा रे ग म प ध नि ह्या स्वर सप्तकांतून रसिकाच्या मनःचक्षूसमोर साकार होतात. बर्याचदां मध्यम(म) ह्या स्वरावरून रागाची वेळ ठरविली जाते.याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा राग ललत! एका पाठोपाठ येणारे दोन मध्यम (तीव्र,शुद्ध) हे या रागाचे खास वैशिष्ठ्य! या स्वरांची गंमत अशी की दिवसा शुद्ध असणारा मध्यम जसजशी रात्र चढू लागते तसतसा तीव्र होत जातो. ललत रागांतील तीव्र म रात्र नुकतीच संपल्याचे जाहीर करतो तर शुद्ध म दिवस वर येत असल्याची सूचना देतो.
“नि (रे) ग म(ध), (म)(ध), (म)म ग, ग (रे) ग (म), ग (रे) सा” अशी सुरावट ऐकली की द्दृष्टीसमोर अरूणोदयाचे चित्र उभे रहातेच.
अभिषेकी बुवांनी तेजोनिधी लोहगोल या कट्यार काळजांत घुसली मधील नाट्यपदाला म्हणूनच ललत रागांतील स्वरांचा आधार घेतला असावा.
पियु पियु रटत पपीहरा ही याच रागातील पारंपारीक बंदीश भावमधूर पहाटेचे वातावरण निर्मीते.
“खिन्न आंधळा अंधार आता
ओसरेल पार
लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल
आता उजाडेल…..”
ह्या मंगेश पाडगांवकरांच्या ओळी म्हणजे ललतचे पहाट घेऊन येणारे सूर.
या रागांत रिषभ आणि धैवत कोमल व बाकी इतर स्वर शुद्ध. काही संगीतकार मात्र या रागाचा जनक मारवा म्हणून शुद्ध धैवत घेऊन सादरीकरण करतात. पंचम वर्ज्य असल्यामुळे जाति षाडव~षाडव.
नि (रे) ग म,(म)म ग,(म) (ध) सां
(रें) नि (ध) (म) (ध)(म) म ग (रे) सा
असे याचे आरोह/अवरोह.
प्रातःकालच्या मंगलमय वातावरणाबरोबरच
पवित्र प्रेमाचा आविष्कारही ह्या स्वरांतून आपल्याला जाणवतो.
“नैना भरायोरी
नींद उध्यारो जब रातही
तब पिया पास ना देखायोरी
मै का करू अब
शोक पियाके बिछुरन सन मोहे
हाय हाय कछु ना देखायोरी”
प्रेमरसांत आकंठ बुडालेली प्रेमिका डोळ्यात भरून आलेल्या पाण्यामुळे जवळ असलेल्या तिच्या प्रियकराला पाहू शकत नाही. कुमारजींनी त्यांच्या या बंदिशीतून तिच्या मनाची अवस्था साकारली आहे.
मृच्छकटीक नाटकातील ‘हे सखी शशीवदने’ पद, जगावेगळे असेल सुंदर ते माझे घर हे ग. दि. मा/बाबूजी या जोडीचे पोस्टांतील मुलगी या चित्रपटांतील गीत, लता मंगेशकर व मन्ना डे यांचे ‘प्रीतम दरस दिखाओ’ ही सर्व गाणी ललतची ओळख करून देतात.
“इक शहेनशाहने बनवाके हंसी ताजमहल…!”
मुघल सम्राट शहाजहानने त्याच्या मुमताज बेगम साठी बांधलेला ताजमहाल ~प्रेमाचे प्रतीक~ म्हणजेच ललतचे सूर.
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈