सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत –  किशोरी अमोणकर ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

मुख्यत्वे माझ्या पिढीचा विचार करता ज्या चार ‘सुरांवर’ आमचं पोषण झालं, जगणं तेजोमय झालं त्यांविषयी चार दिवस जमेल तशा शब्दज्योती उजळवून दिवाळी साजरी करण्याचा हा माझा प्रयत्न! खरंतर, ह्या सुरांचं देणं कसं मुठीत पकडावं, कसं आकार-उकार-वेलांट्यांत सजवावं आणि कसं त्याला शब्दांच्या हवाली करावं !?… ती फक्त अनुभवायची गोष्ट! ती अनुभूतीच शब्दांत सजवायचा प्रयत्न करतेय.

टिपूर चांदणभरल्या आकाशाचं छत, चंदेरी अंधारात सजलेलं निबिडवन, तिथं मंदपणं खळाळता एक निर्झर, त्याच्या काठाशी वडवाईच्या पारावर भान हरपून बसलेलं असावं…. चढत्या निशेच्या साक्षीनं निर्झराचा खळाळ जेमतेम ऐकू येण्याइतपत मंद व्हावा…. ती गाज ऐकताऐकता अवचित उरात लाटा उसळून याव्या, मनाच्या तळातून अल्लद वरती येत काळजावर तरंगू लागलेल्या एकेक संवेदना जाणवाव्या… साचू लागलेल्या नेत्रतळ्यांना आपसूक पापण्यांचा बांध पडावा, बंद डबीत मोती डुगडुगावा तसे पापण्यांच्या आत जाणवणारे आसवमोती आणि एका क्षणी पापण्यांच्या काठावर देणेकरी होऊन आलेल्या अनावरपणाची रिती ओंजळ लयदारपणे झरणाऱ्या थेंबांनी भरून जावी….

विरत जावेत सभोवतीचे बंध, मन रितं होताहोता भरून येणारा श्वास जाणवावा आणि स्वत:ला त्या क्षणाच्या हवाली करत झाडाच्या बुंध्याशी अलगद मान टेकवावी…. उसळून येणाऱ्या भावतराण्यांसोबत अश्रूंचा सळसळता झंकार, निमिषांच्या अंतरांपाठोपाठ जाणिवांच्या थकलेपणासोबत शांतावत चाललेला लयहुंकार… क्षण लोपतालोपता जीव मालवतामालवता आपण निर्गुणाच्या कुशीत विसावावं आणि तो क्षण कमलपाकळीवरच्या दंवभरल्या मोत्यासारखा अथांगात ओघळून लुप्त होत जावा…!  हे…….. असं काहीसं………. नव्हे, अगदी असंच किशोरीताईंच्या सुरांचं देणं!

खऱ्या अर्थानं महान उत्तुंग व्यक्तिमत्वं ही परमेश्वरानं वेळ देऊन घडवूनच पृथ्वीतलावर पाठवलेली असतात. असंच एक स्वरशिल्प त्यानं एका स्वरसाधिकेच्या पोटी जन्माला घातलं आणि त्या स्वरशिल्पाची साधना उच्चतम पातळीवर सातत्यानं सुरू राहावी इतक्या विशाल त्याच्या ज्ञानकक्षा व्हायला हव्यात ह्याची जाण त्या मातृहृदयातही घातली. त्यामुळंच पंडिता मोगूबाई कुर्डीकर ह्यांनी स्वत: आचरत असलेल्या जयपूर-अत्रौली घराण्याची शास्त्रशुद्ध तालीम आपली लेक किशोरीताईंना दिल्यानंतर इतरही सर्व संगीत घराण्यांतील बारकावे त्यांना उमजावे आणि प्रत्येकातील उत्तम ते त्यांच्या गायनात उमटून त्यांची स्वत:ची एक संपन्न गानशैली निर्माण व्हावी ही जागरुकता दाखवली.

केवळ संगीतसमृद्धीची आस धरून स्वत:चा अहंभाव मधे येऊ न देता लेकीला इतर गुरूंकडंही शिकायला पाठवलं. मोगुबाईंचे स्वत:चे गुरू जयपूर-अत्रौली घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खॉं साहेब, आग्रा घराण्याचे उस्ताद अनवर हुसेन खॉं साहेब, पं. बाळकृष्णबुवा पर्वतकर, पं. मोहन पालेकर, शरदचंद्र आरोळकर, पंडिता अंजनीबाई मालपेकर अशा गुरुजनांकडून किशोईताईंना गायकीतली जाण व सौंदर्यदृष्टी लाभावी ह्या मोगुबाईंच्या विचाराचा परिपाक म्हणून आपल्याला गानसरस्वती किशोरीताई आमोणकर लाभल्या.

प्रत्येक राग हे एक वेगळं व्यक्तिमत्व असतं, त्याला स्वत:चा असा एक स्वभाव असतो, त्या स्वभावाला सूक्ष्म कंगोरेही असतात. ते समजून उमजून घेऊन आपण राग उभा केला पाहिजे अशा असामान्य विचारानं ताईंनी रागसंगीताची साधना केली. म्हणूनच त्यांचा प्रत्येक राग आपल्याला वेगळी अनुभूती देतो. शास्त्रीय संगीतासोबतच अनेक उपशास्त्रीय संगीतप्रकार, भावगीत, अभंग, भजन इ. कित्येक प्रकारांतूनही त्यांनी आपल्याला आनंद दिला आहे. मात्र कोणत्याही प्रकारात स्वत:शी तादात्म्य पावलेल्या त्यांच्या सुराचं आपल्या काळजाला हात घालणं चुकत नाही. ‘अवघा रंग एक झाला’ ह्या त्यांनी अजरामर केलेल्या रचनेतील शब्दांनुसारच अवघा रंग एक असल्याची अनुभूती त्यांचं कोणत्याही प्रकारचं गायन ऐकताना आपल्याला प्रत्येकच वेळी येत असते.

एकवेळ संतप्रभृतींच्या परमेश्वराविषयी असलेल्या भक्ती-प्रीतीभावावर लिहिता येईल, परमेश्वराला कधी भगवंत म्हणवत लेखणीतून भक्तिफुलांची ओंजळ वाहाता येईल तर कधी सखा म्हणवत त्याच्याभोवती लडिवाळ शृंगारपखरणही करता येईल. परंतू ताईंच्या भावस्वराचं काळीजभेदी, गगनचुंबी निर्गुण निराकारत्व कोणत्या शब्दांत पेलणार, असं त्यांचे अभंग, भजनं ऐकताना होऊन जातं. त्यांच्या सुराचं विश्व आभाळाच्याही पल्याड जाणारं! हाती येणं लांबच, ते डोळ्यांना तरी कसं दिसावं… आणि… कुठल्या आधारावर त्याला शब्दांत विणायला घ्यावं!?

सुराला परमेश्वर मानणारी जितकी अलौकिक दृष्टी त्यांच्याकडे होती तितकीच अलौकिक विचारधारा त्यांच्या स्वरार्थरमणी ह्या पुस्तकात दिसून येते.  आपलं मोठं भाग्य कि, जाणिवेतून नेणिवेकडे, मूर्तातून अमूर्ताकडे, सगुणाकडून निर्गुणाकडे, अशाश्वताकडून शाश्वताकडे घेऊन जाणारा ताईंचा सूर आपल्याला अनुभवायला मिळाला!! ज्ञानेश्वर माऊलींच्या, `हृदया हृदय येक जाले । ये हृदयीचे ते हृदयी घातले ।‘ ह्या शब्दरत्नांचा अर्थ ताईंचा सूर ऐकताना प्रकर्षाने उमगतो. प्रत्येकच रचनेतून आपल्या मनात गडदगहिरे भावतरंग उमटवणारा, ऐकणाऱ्याशी अद्वैत साधणारा असा किशोरीताईंचा सूर!! अपार साधना, अनंत शोधवाटा, अथक ध्यास,, अफाट मेहनत ह्यातून गवसलेलं असीम सृजन असं भावरंगांशी अद्वैत न साधतं तरच नवल! ताईंच्या अनंत सृजनावकाशाला वंदन करताना माझ्या दोन तोकड्या शब्दांचं समर्पण….    

मिल के बिछडे वह सूर नही ।  जगत को भूले परमेश कही!?

 

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments