सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत – पंडित जसराज ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
एखादं गर्भरेशमी वस्त्र ल्यायल्यानंतर त्याच्या तलम, मुलायम स्पर्शानं मन मोहवतं, सुखावतं, शांतावतं. नेमकी तशीच अनुभूती नावाप्रमाणे रसराज असणारे पं. जसराज ह्यांचा सूर आपल्याला देतो. काहीही ढिम्म कळत नसलेल्या लहानग्या वयात मी पं. जसराजांना ऐकलं. अगदी ऋषितुल्य, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि भावगर्भ सूर ह्यांची ती एकत्रित अनुभूती एकूणच ‘सौंदर्याची व्याख्या’ माझ्या मनात रुजवण्याऱ्या घटकांपैकी एक म्हणावी लागेल. एखाद्या सुंदर सुरानं मनाला स्पर्श करून तिथं घर करायला वय, ज्ञान, समज काहीकाही आड येत नाही. तसंच अगदी लहागग्या वयातच त्यांच्या सुरानं माझ्या मनात घर केलं. अत्यंत तलम, मुलायम, लडिवाळ, मनाला खोलवर स्पर्श करणारा आणि महत्वाचं म्हणजे मन शांतावणारा सूर म्हणजे जसराजींचा सूर ही व्याख्याच मनावर कोरली गेली.
सुरांत हरवून जाणं म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहाताना, त्यांना ऐकताना उमजत होतं. सुरांतली भावगर्भता हा मला भावलेला जसराजजींचा सगळ्यात मोठा पैलू! मेवाती घराण्याच्या ह्या अध्वर्यूविषयी, त्यांच्या गायकीविषयी मी काही लिहिणं म्हणजे अगदीच मिणमिणत्या ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखं आहे. परंतु आपापल्या परीनं प्रत्येकजण कलाकाराच्या गाण्यातली सौंदर्यस्थळं शोधत असतो किंबहुना ती आपसूकच श्रोत्याच्या मनात उमटत जातात. त्यांच्या बाबतीत मला जे भावलं ते म्हणजे त्यांच्या सुरांतली मनाला स्पर्शणारी, मनात खोलवर झिरपत जाणारी भावगर्भता! शास्त्रीय संगीत म्हटलं की बहुतांशीवेळा गळा नसणाऱ्या, संगीत न शिकणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात अकारणच त्याचं एक क्लिष्ट चित्र रंगवलं गेलेलं असतं. मात्र जसराजजींचं महत्तम योगदान म्हणजे दुसऱ्याला भावविभोर करणाऱ्या आपल्या सुरांनी त्यांनी अत्यंत सर्वसामान्य माणसाला शास्त्रीय संगीताची गोडी लावली.
नेमानं संगीताची साधना घडत असलेल्या घरात पं. जसराजजींचा जन्म झाला. त्यांचे पिता पं. मोतीराम जसराजजी अवघे चार वर्षांचे असताना निवर्तले मात्र त्यापूर्वी त्यांच्याकडून जसराजजींना संगीताची दीक्षा मिळाली होती. त्यानंतर त्यांचे सर्वात वडील बंधू पं. मणिराम ह्यांच्याकडून गायनाची व मधले बंधू पं. प्रताप नारायण ह्यांच्याकडून तबल्याची उत्तम तालीम त्यांना मिळाली. त्यानंतर मेवाती घराण्याचे दिग्गज महाराणा जयवंत सिंह वाघेला व आगऱ्याचे स्वामी वल्लभदास ह्यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. बाबा श्याम मनोहर गोस्वामी महाराजांच्या सानिध्यात हवेली संगीताचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी बऱ्याच नवीन बंदिशी बांधल्या. त्यांच्या बंदिशींचा एक वेगळाच ढाचा आणि बहुतांशी बंदिशींचे कृष्णमय शब्द ऐकताना अक्षरश: भान हरपून जायचं. बंदिशीच्या शब्दांना न्याय देत रसाळपणे समोरच्या कोणत्याही वर्गवारीतल्या श्रोत्याला रसोत्पत्तीच्या परमोच्च बिंदूवर पोहोचलेल्या आपल्या सुरांनी न्हाऊ घालणे ही त्यांची खासियत! मनोमन सदैव कृष्णभक्तीत रममाण असणाऱ्या जसराजजींनी अनेक भजनांतूनही आपल्या भक्तिरसानं रसिकांना चिंब न्हाऊ घातलं. ही सगळी किमया म्हणजे संगीतमार्तंड पं. जसराजांनी आपल्या दैवी देणगीला दिलेल्या अपार साधनेची जोड आणि त्याचं फलित होतं.
आवाजाच्या नैसर्गिक धाटणीत असलेल्या फरकामुळं स्त्री व पुरुष गायक, दोघांनाही स्वत:च्या आवाजाच्या पोताशी तडजोड न करता, स्वरतंतूंवर ताण न देता एकत्र गाता येत नाही. सहगायन करायचं म्हटलं तर कुणा एकाला आपल्या आवाजाच्या नैसर्गीक पट्टीपेक्षा चढ्या किंवा खालच्या पट्टीत गाणं अपरिहार्य होऊन जातं. त्यामुळं गाणाऱ्याचं समाधानही होत नाही आणि गायनाचा म्हणावा तसा प्रभावही पडत नाही. बहुधा स्त्रीशिष्यांना स्वत:च्या पट्टीत तालीम देताना किंवा स्त्री व पुरुष शिष्यांना एकत्र तालीम देताना आवाजाच्या नैसर्गिक पट्टीतल्या फरकाच्या गोष्टीवर त्यांचं सातत्यानं चिंतन घडत राहिलं असावं आणि त्यातूनच त्यांनी एक अभिनव प्रयोग केला, जो प्रथम पुण्यात झाला आणि तिथल्या रसिकांना तो अत्यंत भावल्याने त्यांनी त्या प्रयोगाला जसराजजींच्या सन्मानार्थ प्रेमभावानं ‘जसरंगी जुगलबंदी’ हे नाव दिलं.
शास्रीय संगीतातील मूर्छना तत्वावर आधारित असलेला हा प्रयोग आहे. ह्या जुगलबंदीत एक स्त्री गायक तर एक पुरूष गायक असतो. दोघंही आपापल्याच पट्टीत गातात तरीही सोबत गाऊ शकतात. दोघांचे साथीदार वेगवेगळे असतात कारण त्यांच्या पट्ट्या वेगळ्या असतात. दोघांचे रागही भिन्न असतात, तरीही त्यातलं एकसंधपण टिकून राहातं कारण एका गायकाचा मध्यम दुसऱ्या गायकाचा षड्ज असतो आणि एकूण स्केलमधली स्वरांतरं बदलत नाहीत. फक्त षड्जाचं स्थान बदललं तर त्यानुसार रागाचं नाव बदलतं. ह्याच गोष्टीचा वापर करून हा प्रयोग केला गेला जो अतिशय लोकप्रिय झाला. अर्थातच ह्या प्रयोगाला काही मर्यादा नक्कीच आहेत ज्या अपरिहार्य आहेत. मात्र एक नाविन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण गोष्ट म्हणून ही जुगलबंदी नक्कीच अनुभवण्यासारखी आहे.
आज विचार करता वाटतं, जसराजजींचा भावगर्भ रससंपन्न सूर, किशोरीताईंची अफाट प्रतिभासंपन्न, विद्वत्तापूर्ण तरीही रसाळ गायकी, कुमारजींचा टोकदार सुरातील नक्षीदारपणे उभा केलेला राग, भीमसेनजींचा कमावलेला दमदार सूर अशा अनेक अद्भुत गोष्टींनी आमच्या पिढीचं संगीताचं वेड समृद्ध केलं आहे. फक्त संगीताशी निष्ठावंत असणाऱ्या ह्या कलाकारांनी डोळ्यापुढं उभं केलेलं संगीताचं एक सुंदर, मनमोहक विश्व कायमच सोबत असतं, मनाच्या तळाशी जपून ठेवलेली ह्या कलाकारांच्या कलेनं प्रदान केलेली अलौकिक रत्नप्रभा ही बऱ्याचदा जगण्याची ऊर्जा ठरते. ‘आत्मसुख देणारं ते हे संगीत’ अशी धारणा वर्षानुवर्षं मनात जपली गेली आहे ती केवळ त्यांच्या सच्च्या सुरानं दिलेल्या अद्भुत अनुभूतीमुळं! असे संस्कार आमच्या पिढीच्या कानांवर झाले यापरते आमचं भाग्य ते काय असावं!? ह्या व्यक्तिमत्वांनी आमचं जगणं समृद्ध केलं… मनात अनेक जाणिवांची रुजवण ह्यांच्या कलेनं केली… डोळे मिटताक्षणी ह्यांच्या सुरांनी ‘त्याचं’ दर्शन घडवलं… अस्सलपण म्हणजे काय हे ह्यांच्या सुरांनी दाखवलं!
इतकंच म्हणता येईल की, भगवद्गीतेतल्या ‘त्याच्याच’
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥
ह्य आत्म्याच्या व्याख्येनुसार तशाच आत्मीय सुराचं ‘त्यानं’च ह्या कलाकारांना दिलेलं वरदान म्हणजे आपल्यासाठी निखळ आनंदाचा ठेवा, ऊर्जास्त्रोत व प्रेरणास्थान! ह्या स्वरसाधकांनी ‘साधलेल्या’ अलौकिक सुरांना सादर वंदन! ह्या चार सुरांना गुंफणारी शब्दमाला आज पूर्ण होतेय. अशा अनोख्या पद्धतीनं दिवाळी साजरी झाल्याच्या आनंदात आपली रजा घेते. त्यापूर्वी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ??
© आसावरी केळकर-वाईकर
प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (KM College of Music & Technology, Chennai)
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈