कविराज विजय यशवंत सातपुते
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। आज प्रस्तुत है एक प्रेम से परिपूर्ण भावप्रवण कविता प्रेम असे. . . प्रेम तसे. . . ! )
☆ प्रेम असे. . . प्रेम तसे. . . ! ☆
सुख आणि दुःख जणू, दोघे प्रेमाचे सोबती
दुःख तुझ्या आभासात, सुख आपल्या सांगाती.
प्रेम लाजाळूचे झाड, वर्षावात कोमेजते
विरहाच्या चटक्याने, पुनः नव्याने फुलते.
प्रेम जळणारी वात, प्रेम तेवणारा दिवा
तेलवात करणारा, हात सदा हाती हवा.
प्रेम सोसाट्याचा वारा, प्रेम सुगंधी बहर
पिढ्या पिढ्या चालू आहे, त्याचा लहरी कहर.
प्रेम कधी दूरध्वनी, तर कधी चलभाष
कसा साधावा संवाद, सांगे आपलाच श्वास.
प्रेम गजर्याची भाषा, प्रेम तळहात रेषा
अंतराने अंतराची, घ्यावी जाणूनीया दिशा.
प्रेम गुलाबाचे फूल, प्रेम संसाराची चूल
कल्पनेने वास्तवाची, करू नये दिशाभूल.
प्रेम मौनाचा कागद, प्रेम आसवांची शाई
मने जुळण्याआधीच, नको वाचायची घाई.
प्रेम असे, प्रेम तसे , दोन डोळ्यातले ससे
नजरेने नजरेला, सांग शोधायचे कसे?
प्रेम सृजनाच लेणं, प्रेम संस्काराच देणं
भावनांच जाणिवांशी , अविरत देणं घेणं.
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.