सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जीवन प्रवास” – (आत्मवृत्त) – सौ. वर्षा महिंद भाबळ ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

पुस्तकाचे नाव: जीवन प्रवास (आत्मवृत्त)

लेखिका: सौ. वर्षा महेंद्र भाबळ.

प्रकाशक: सौ. अलका देवेंद्र भुजबळ.(न्यूज स्टोरी टुडे)

प्रथम आवृत्ती: डिसेंबर २०२२

पृष्ठे:१३६

किंमत:२००/—

“आयुष्य फार सुंदर आहे.  आयुष्य जगताना प्रत्येकाने त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवला, तर सर्व मानव जातीला ही दुनिया सुखमय भासेल.”

” सुख आणि दुःख ही जीवन पुस्तकाची दोन पाने आहेत. दुःख सहन करता आलं पाहिजे आणि सुख निर्माण करता आलं पाहिजे.  पण या दोन्ही भावनांची आपण अनुभूती घेतली पाहिजे.”

” कितीही वाटलं तरी, मानवाच्या भावनांचे नाजूक असे स्वाभिमानाचे आवरण कुठे ना कुठे विरतेच.  मग ते स्वाभिमानाचे आवरण कसं जपायचं, कसं वापरायचं नि कसं टिकवायचं हे आपणच ठरवायचं असतं .”

— अशी आणि अशाच प्रकारची सुंदर, जीवनाचे धडे देणारी भाष्ये,  सौ वर्षा महेंद्र भाबळ यांच्या 

‘ जीवन प्रवास ‘ या आत्मकथनपर पुस्तकात वाचायला मिळतात.

वर्षा ताईंचे जीवन प्रवास हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात प्रथम विचार आला तो असा की ,आजपर्यंत आत्मवृत्तपर पुस्तके ही  सर्वसाधारणपणे प्रसिद्धी मिळवलेले, विशेषतः कलाकार, नावाजलेले लेखक, राजकीय नेते, चित्रपट क्षेत्राशी संबंधित, किंवा उद्योजक थोडक्यात जे सेलिब्रिटी असतात त्यांचीच वाचली जातात. पण जीवन प्रवास हे पुस्तक वाचल्यानंतर या विचारांना फाटा फुटतो. हा गैरसमज दूर होतो.

 लाखो— करोडो स्त्री पुरुषांसारखं वर्तुळातलं आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीलाही जर प्रातिनिधिक स्वरूपात 

‘जगणं ‘ या संज्ञेचा विशिष्ट अर्थ सापडला असेल, तर त्याने का लिहू नये? वर्षाताईंनी चाकोरीतल आयुष्य जगत असताना,  जे टिपलं, जे अनुभवलं, आणि त्यातूनच जगण्याच्या अर्थाचा जो प्रामाणिक, अत्यंत बोलका, डोळस शोध घेतला आहे.. त्याचंच प्रतिपादन त्यांनी त्यांच्या आत्मकथनात इतकं सुंदरपणे केलं आहे की, वाचणारा त्यांच्या जीवनाशी त्या संदर्भांशी अगदी सहजपणे  बांधला जातो.  

माणूस कुठल्या कुटुंबात, कुठल्या जातीत, समाजात, गावात , जन्माला आलाय हे महत्त्वाचं नसतंच.  तो कसा जगला आणि त्याने आपल्या जगण्यातून इतरांना काय दिले हेच महत्त्वाचे.  सामान्य— असामान्य, प्रसिद्ध— अप्रसिद्ध, श्रेष्ठ कनिष्ठ, गरीब— श्रीमंत हे सर्व शब्द संदीग्ध  आहेत. प्रत्येकाच्या निरनिराळ्या दृष्टिकोनातून या प्रस्थापित शब्दांचे रूढार्थच बदलू शकतात, याची जाणीव जीवन प्रवास हे पुस्तक वाचताना पावलोपावली होते. 

प्रथम तुमच्यामध्ये जीवनाविषयीची प्रचंड ओढ असायला हवी. तुमच्या ठायी सुप्तपणे असलेल्या अनेक गुणांची तुम्हाला योग्य वेळी ओळख झाली पाहिजे.  आणि सुसह्य जीवनासाठी या गुणांचा कसा वापर करता येईल हेही उमजले पाहिजे.  आणि हे ज्याला जमतं तो वाळवंटातही हिरवळ निर्माण करू शकतो.  रुक्ष पाषाणातूनही एखादा शितल पाण्याचा झरा जन्माला येऊ शकतो, याचा अनुभव हे पुस्तक वाचताना येतो.

.. नव्हे ! तशी मनाची खात्रीच पटते.

वर्षाताईंच्या सामान्य जगण्यातलं असामान्यत्व असं सुरेख दवबिंदू सारखं मनावर घरंगळतं.

जवळजवळ २५  लहान लहान भागातून वर्षाताईंनी त्यांच्या जीवनसफरीतून वेचलेले मोती वाचकाच्या ओंजळीत घातले आहेत.  त्यांचे बालपण, त्यांचे गाव, आई-वडील, भावंडे ,गणगोत,शिक्षण, प्रेमविवाह, वैवाहिक जीवनातले अटीतटीचे प्रसंग, नोकरी, मुलांचे संगोपन नातेसंबंध, समाजाने दिलेली भलीबुरी वागणूक, जोडीदारासोबत चालवलेले अभ्यास वर्ग, विद्यार्थ्यांशी असलेली जिव्हाळ्याची नाती, स्वतःचे छंद, भेटलेले गुरु,  आदर्शवत व्यक्ती, या सर्वांविषयी वर्षाताईंनी यात भरभरून आणि मनापासून लिहिले आहे. आणि ते वाचत असताना एका अत्यंत संवेदनशील, कोमल, मृदू तरीही कणखर जबरदस्त टक्कर देणारी, सर्वांना सांभाळून सोबत घेऊन जगणारी आणि केवळ स्वतःपुरतेच न बघता सतत एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून  विश्वासाने,चौकस बुद्धीने, कृतज्ञतेने, दिमाखाने जगणाऱ्या व्यक्तीचेच दर्शन होत राहते.  यात कुठलाही अतिरेक नाही. पोकळ शब्दांचा… केवळ ग्लोरी फाय करण्याचा कुठलाही हेतू नाही. हे सारं मनापासून वाटलं म्हणूनच लिहिलं.

आवारातल्या नारळाच्या झाडाची आठवण देतानाही वर्षाताई  एकीकडे सहज म्हणतात,

” देवांना अर्पण केले जाणारे फळ म्हणजे श्रीफळ! कल्पतरूला आपल्या धर्मात खूप महत्त्व आहे. माडाचा प्रत्येक अवयव उपयोगात येणारा आहे. अर्थात्  गुणसंपन्न!  त्या तरूचे गुण आमच्यात रुजावेत, अशी मनी सुप्त इच्छा ठेवून या वृक्षासोबत आमच्या नव्या पर्वाला आम्ही सुरुवात केली.!”

— वा वर्षाताई!! तुमच्या या सोन्यासारख्या विचार प्रवाहाला माझा मानाचा मुजरा! 

अध्यात्म तत्त्वज्ञान हे वाचून रुजत नाही, तर त्याची बीजं अंतरंगातच असावी लागतात हे तुम्ही सिद्ध केलंत.

एखाद्या नोकरीच्या ठिकाणीही कामाव्यतिरिक्त पारिवारिक, सांस्कृतिक, नात्यानात्यातला आगळावेगळा जिव्हाळा…ईर्षा, प्रसिद्धी, चढाओढ, द्वेष मत्सर यांच्या पलीकडे जाऊन कसा निर्माण होऊ शकतो आणि कामातला आनंद कसा गुणित करू शकतो याचा सुंदर वस्तूपाठच,  वर्षाताईंच्या अडतीस वर्षाचे  एमटीएनएल मधले नोकरी विषयक किस्से वाचताना मिळतो. 

सर्वांग सुंदर असेच हे पुस्तक आहे.  वाचकाला खूप काही देणारं आहे !  संदेशात्मक, सकारात्मक आणि कुठलाही अभिनिवेश, अहंकार नसणारं  हे नम्र लेखन आहे. 

हे पुस्तक वाचताना मला असे वाटले की सर्वसाधारणपणे आपण एखादा पडलेला दगड पाहतो, एखादा चुरगळलेला कागद दिसतो, एखादं साचलेलं पाणी पाहतो… पण आपल्या मनात येतं का या दगडातून एकेदिवशी  सुंदर शिल्प निर्माण होऊ शकतं,  हा चुरगळलेला कागद थोडा उलगडला तर आपण एखादा सुविचार त्यावर लिहू शकतो, या साचलेल्या पाण्यावरही कमळ फुलवू शकतो.?   नसण्यातून असण्याला जन्म देणं हीच महानता ! आणि या महानतेचं दर्शन सौ.वर्षा भाबळ यांच्या “जीवन प्रवास” या पुस्तकातून अगदी सहजपणे होतं. 

सुंदर भाषा, सुंदर विचार आणि सुंदर मन यांचं सुरेख मिश्रण म्हणजे जीवन प्रवास हे पुस्तक !

सौ अलका भुजबळ यांनी हे पुस्तक देखण्या स्वरुपात प्रकाशित करून फार मोलाची कामगिरी केली आहे रसिक वाचकांसाठी !  त्याबद्दल मी समस्त मराठी भाषा प्रेमिकांतर्फे आणि वाचकांतर्फे आपले आभार मानते ! मा. देवेंद्रजी भुजबळ यांनी सुरेख प्रस्तावना लिहून पुस्तकाचा  यथोचित गौरव केला आहे.

वर्षाताई ! प्रथम आपणास मानाचा मुजरा करते. आणि नंतर अभिनंदन आणि आपल्या उर्वरित जीवनप्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !! धन्यवाद !

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments