सुश्री वर्षा बालगोपाल

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ कथापौर्णिमा – लेखिका : सुश्री पूनम छत्रे ☆ परिचय – सुश्री वर्षा बालगोपाल ☆ 

(एका वेगळ्या पद्धतीने पुस्तक परिचय) 

लेखिका : पूनम छत्रे 

प्रकाशक :  रसिक आंतरभारती

पृष्ठ संख्या – १७६

मूल्य : रु.२७०

कुठून कसा कोण जाणे पण कोरोना सगळीकडे पसरला. या राक्षसाने भिषण रूप घेतले आणि सगळ्यांना घरातच बसायची वेळ आली. लॉकडाऊन डिक्लेअर झाला आणि कामानिमित्ताने बाहेर जाणारी, घरचे बाहेरचे मुलाचे सगळे सांभाळून आपला छंद जोपासणारी पूनम घरातच बंद झाली.

किती अवघड असते ना असे राहणे? मग काय लोकांचे अंतर्भूत गुण बाहेर आले आणि सोशल मिडियावर बरेच ऍक्टिव्ह राहू लागले.

पूनमही काय करता येईल याचा विचार करू लागली आणि शेजारच्याच बिल्डिंगमधे होम क्वारंटाईन असलेल्या निनाद आणि त्याच्या बाबांविषयी समजले. त्यांच्याच सोसायटीत दंगापार्टी चालू असल्याचा संतापही आला आणि लोकांना चांगली बुद्धी देण्यासाठी अनुदिनी अनुतापे प्रार्थना तिने केली.

आपल्याच विचारात कधी टिव्ही लावला हे तिच्याही लक्षात आले नाही. पैठणीचा होम मिनिस्टरचा रिपीट टेलिकास्ट चालू होता. त्यात पैठणी जिंकलेली सीमा तिच्या ओळखीचीच होती. पैठणी जिंकून सुद्धा ती नेसून तिची निगा राखणे तिला किती अवघड होते हे सगळे तिला माहित असल्यानेच सीमाच्या मनाची घालमेल जाणून पूनमच सुन्न झाली. आधी हाताला चटके च्या ऐवजी आधी मनाला चटके बसले होते.

या चटके बसलेल्या मनाचा ती पराभव होऊ देणार नसली तरी तिच्या ओळखीच्या सुधीरच्या आईची अवस्था पूनमला आठवली. आपल्या म्हातारपणी कोणाला आपले काही करायला लागू नये म्हणून मिस्टरांच्या माघारी टोकाचे उचललेल पाऊल बूमरँग होऊन तिला कायमचे विकलांग करते या घटनेने अतिशय व्यथित झाली.

तरी तिच्या मनाचा वटवृक्ष घट्ट मुळे रोऊन सकारात्मकतेच्या पाराने डौलाने उभा होता. आपल्या मुलांना आकाशात भरारी मारायला मोकळीक दिलेल्या बाबांना आपल्या गावाकडील मंदिराच्या जिर्णोद्धाराचा प्रसंग  आठवून पूनमला पण छान शिकवण मिळाली.

मग उगाचच मैत्रिण रमा आणि तिचा मित्र सत्यजीत यांची आठवण होऊन त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर होताना अर्थात त्यांच्या हृदयी वसंत फुलताना झालेल्या स्थित्यंतराने ओठावर स्मित आले.

दुसरी मैत्रिण हेमांगी आणि गौरव यांचे प्रेम सफल नाही झाले तरी त्यांचे एकमेकांवर किती निस्सिम प्रेम होते याची आठवण झाली.

मग उगाचंच  ओळखीतल्या एका अंजलीने केलेला  पुनर्विवाह आठवला आणि बिजवर नवर्‍याची मुलगी सोनालिकाने तिचा आई म्हणून स्विकार करण्यासाठी केलेला प्रयत्न डोळ्यांपुढे तरळला.

कंटाळून पूनमने जरा स्वत:ला आडवे केले आणि आईचा फोन आला. सहजच मनात आले या कोरोनाने मोठ्या माणसांना पण टेक्नॉलॉजी शिकवली आहे ना? किती सहजतेने वरच्या पिढ्या सुद्धा नवे तंत्रज्ञान वापरत आहेत नव्या गोष्टी शिकत आहेत मग कौतूकाने अशाच एका व्हॉट्सअप आई चे उदाहरण आठवले.

वाटले या नव्या जमान्याने मुलांना परदेशाचे वेड लावले असले तरी तेथे स्वत:चे हाल होऊ नयेत म्हणून स्वावलंबी होऊ घातलेली मुले आपल्या आईच्या नाळेशी अधिक दृढ होतात .त्यांची या देशाशी आईशी संस्काराशी असलेली नाळ कधीच तुटत नाही.  याचेच उर्वी आणि सुजाताचे उदाहरण तिने बोलता बोलता आईला सांगितले पण•••

तिने पुन्हा टिव्ही लावला रिपीट टेलिकास्टच दाखवले जात होते.  त्यावर कॅमेरामन जग्गुचे नाव पाहून घरदार सोडून कॅमेरामन झालेला जग्गू दिवाळीच्या निमित्ताने तरी घरी गेला. अशा परत आपल्या फॅमिलीत जाऊन फॅमिलीवाला जग्गू  मनात येऊन गेला.

अस्वस्थ पूनम या कुशीवरून त्या कुशीवर होत होती रिकाम्या मनाचिये गुंती उतारवयात एकमेकांचे आधार होऊ पहाणार्‍या सुलू आणि मुकुंदाची कथा आठवली.

कूस बदलली त्या सरशी खरे मित्र मैत्रिणी असलेल्या शुभंकर अमृताची आठवण जणू एकमेकांना तुझ्या नसानसात मी असल्याची जाणिव देत आहेत अशी अनुभूती दिली.

छताकडे पहात असताना दूरचे कोणीतरी अभंग अबिर आठवले आणि मुले अनुभवातून कशी शहाणी होतात, शिकतात हे अभंग वाणी च्या स्वरूपात मनात नाचून गेले.

पुन्हा कोरोनाची आठवण येऊन रोज कोणी ना कोणीतरी गेल्याच्या बातम्या कानावर येतच होत्या. तसाच कोणाचा तरी फोन आला आणि कामवाली बाई शारदा जी नाईलाजाने हॉस्पिटलमधे कोरोनाच्या पेशंटची सेवा करत होती ती गेल्याचे समजले. वाईट जरी वाटले तरी मरणाने केली सुटका  असा विचार देखील आला.

उलट सुलट विचारांची माला पूनमच्या डोक्यात फिरतच होती. बस्स तिने ठरवले आपण आता या काळात कथा लिहायच्या. त्या निमित्ताने असे अनेक प्रसंग अनेक व्यक्ती आठवयाच्या आणि ते अनुभव आपल्या शब्दात मांडायचे.

तिने ठरवले आणि तिचा कोरोनाचा काळ खरच लिखाणात ते लिखाण  फेसबुकसारख्या सोशल मिडियावर  प्रकाशित करण्यात  सुसह्यतेने पार पडला.

मग वेध लागले ते कथासंग्रह काढण्याचे. पण आपले लिखाण सगळ्यांना आवडेल का? कोण काढेल आपला संग्रह असे विचार कस्तुरीमृगासारखे स्वत:लाच पडत गेले. आणि या लेखकांमधे होते कुरूप वेडे  अशा राजहंसाचे लिखाण असल्याचे मित्र मैत्रिणिंकडून सांगितले गेले. 

अनेक कथांपैकी १५ कथा निवडून कथापौर्णिमा नामकरणही झाले.

शैलेश नांदुरकर यांनी पुढाकार घेऊन पुस्तकाची निर्मिती केली, रसिक आंतरभारतीच्या सुनिता नांदुरकरांनी २८ आक्टोबर २०२३ला संग्रह प्रकाशितही केला. पुस्तकाचे मूल्य केवळ रु.२७० एवढे आहे.

असे वेगवेगळे नातेपैलू असलेल्या कथा वेगवेगळ्या भावना मनात जागृत करतात. त्याला वास्तवतेचे एक अधिष्ठानही लाभलेले आहे त्यामुळे कथा मनाला भावतात.

निसर्गरम्य परिसरात धुंद रात्रीच्या वेळी छान चंद्रप्रकाशात जणू आपले मन मोकळे करत आकाशाच्या छत्रीखाली लेखीका पूनम छत्रे आपल्या कथा सांगायला आली आहे. त्या तेवढ्याच उत्कटतेने आपण सर्व ऐकाल म्हणजे वाचाल हा विश्वास वाटतो .

परिचय : वर्षा बालगोपाल

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments