श्री हर्षल भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “आमेन” – लेखिका : सिस्टर जेस्मी — भावानुवाद सुश्री सुनंदा अमरापुरकर ☆ परिचय – श्री हर्षल भानुशाली  

पुस्तक : आमेन – द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन (Amen-the autobiography of a nun)

लेखिका : सिस्टर जेस्मी 

अनुवाद : सुश्री सुनंदा अमरापुरकर

मूल्य: ३००₹ 

फ्री होम शिपिंग : संपर्क हर्षल भानुशाली 9619800030

तटबंदीआडच्या आयुष्याचा धीट आणि थक्क करून सोडणारा लेखाजोखा ३१ ऑगस्ट, २००८ रोजी सिस्टर जेस्मी यांनी कॉन्व्हेंट सोडलं. ‘नन’ म्हणून कॉन्व्हेंटमध्ये राहत असताना तेहेतीस वर्षांत आलेल्या अनुभवांचं भारतातलं हे पहिलंच पुस्तक आहे.

सिस्टर जेस्मी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद खूप छान झाला आहे. मूळ पुस्तकच मराठीत आहे असं वाटतं. कुठेही बोजडपणा आलेला नाही.

एका केरळी भारतीय “नन”ने- तेहेतीस वर्षं कॉन्व्हेंट मध्ये घालवली अनेक अन्याय, अत्याचार सोसत. आणि या अत्याचारांचा अतिरेक झाल्यावर शेवटी कॉन्व्हेंट सोडायचा निर्णय घेतला. आणि त्या तथाकथित सेवाभावी, पवित्र गणल्या गेलेल्या संस्थांमधील गैरप्रकार, अनैतिक लैंगिक संबंध, भ्रष्टाचार, राजकारण, उच्चनीचता, अंधश्रद्धा या बद्दल लिहिती झाली.

नन होण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे, कठीण आहे. त्यासाठी वरिष्ठांची अज्ञा पाळण्याची शपथ, आणि दारिद्र्याची शपथ घ्यावी लागते. ब्रह्मचर्य पाळणं अपेक्षित असतं. पण सर्वच नन्स ना ब्रह्मचर्य सांभाळणं जमत नाही त्यामुळे वाढीला समलैंगिक संबध लागलेले आहेत. लेखिकेलाही इतर शिकाऊ नन्स प्रमाणे एखाद्या वरिष्ठ “सिस्टर”(?) च्या अशा भुकेलाही बळी पडावं लागलं. काही “फादर”(?) कडून अत्याचार झाले. आणि येशूची इच्छा, येशू मार्ग दाखवेल अशा अंधविश्वासापोटी तिला सगळं सोसावं लागलं.

लेखिका हेही सांगते की चर्चमध्येही ननच्या सामाजिक आणि सांपत्तिक स्थितीनुसार नन्समध्ये भेदभाव केला जातो. खालच्या दर्जाच्या नन्सना (ज्यांना चेडुथी म्हणतात) फक्त राबवलं जातं शारिरिक श्रमांसाठी. पुरुष सभासद (फादर, ब्रदर) यांच्या तुलनेत महिलांना खूपच कष्टाची कामं करावी लागतात. त्यांना आर्थिक स्वातंत्र्यही कमी मिळतं सेवेच्या नावाखाली चालवलेल्या जाणाऱ्या कॉलेजमध्ये कसा भ्रष्टाचार होतो, डोनेशन कसं उकळलं जातं आणि त्याला विरोध करणाऱ्या सज्जन लेखिकेला शारिरिक मानसिक छळाला तोंड द्यावं लागलं, अपप्रचाराला तोंड द्यावं लागलं, इतकंच काय तीला वेडं ठरवण्याचा प्रयत्न “मदर”(?), “फादर(?)” यांनी केला.

विशेष म्हणजे लेखिकेने ज्या मुद्द्यांना हात घातला आहे त्या समस्यांचं निराकरण करण्याऐवजी चर्च मात्र लेखिकेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिला खोटं पाडण्याच्या उद्योगातच आहे.

चर्च, कॉन्व्हेंट आणि इतर धार्मिक संस्थांवर आंधळेपणाने विश्वास टाकणाऱ्या, धर्मांतरित होणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं हे पुस्तक आहे. तसंच हिंदूधर्म आणि इतर भारतीय धर्मांतच ज्यांना फक्त वाईट दिसतं त्यांना विचार करायला लावणारं हे पुस्तक आहे.

परिचय : श्री हर्षल भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments