सौ.अंजली दिलिप गोखले
☆ मनमंजुषेतून ☆ गणितातील किमयागार रामानुजन – भाग 1 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
“मेरा भारत महान” असे आपण खूपदा वाचतो. तो महान होण्यासाठी अनेक जणांनी कितीतरी प्रयत्न केलेले असतात. आपण यांची ओळख करून घेतले पाहिजे. नवीन पिढीला ओळख करून दिली पाहिजे.
आपल्या भारत देशामध्ये भास्कराचार्या नंतर जागतिक कीर्ती मिळवणारे आणि भारताला जागतिक किर्ती मिळवून देणारे गणित तज्ञ होऊन गेले,ते म्हणजे रामानुजन.त्यांचे संपूर्ण नाव श्रीनिवास रामानुजन अय्यंगार.आपल्या विलक्षण बुद्धी सामर्थ्याने गणिती जगाला त्यांनी अक्षरशः थक्क करून सोडले.
भारताच्या तामिळनाडू प्रांतांमध्ये तंजावर जिल्ह्यामध्ये रामानुजन चा जन्म एका गरीब ब्राह्मण कुटुंबात 22 डिसेंबर 1887 ला झाला. वडील एका कापडाच्या दुकानामध्ये कारकून होते. आई कोमलतामल देवीची भक्त , कर्मठ आणि कडक सोवळे ओवळे पाळणारी शाकाहारी प्रेमळ स्त्री होती. काळ्या सावळ्या रामानुजनच्या डोळ्यामध्ये बुद्धिची चमक होती. लहानपणा पासून त्यांची तब्येतही नाजूकच !
शाळेमध्ये पहिल्यापासूनच हुशार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची स्मरणशक्ती तीव्र होती. एकदा सांगितलेले त्यांना पटकन समजत असे. कुतूहला मुळे एकदा काही शिक्षक आणि पालक रामानुजन च्या घरी आईला भेटायला आले. रामा इतका हुशार आहे तुम्ही त्याला मुद्दाम काय खायला देताअसे विचारले. आई म्हणाली,” अयो, आमच्या कडे पावसाळ्यात छतातून पाणी गळते आणि उन्हाळ्यात झळा येतात. आमी काय वेगळे देणार? सगळी आमच्या देवीची कृपा “.
शाळेत असल्यापासूनच रामानुजन यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांचे वाचन राजा राणीची गोष्ट,जादू ची चटई असलं नव्हतं बर का!वाचनही ते गणिताचे च करत. त्याची ही गणिताबद्दलची जिज्ञासा आणि आवड पाहून त्याच्या वडिलांच्या मित्रांनी त्याला सरकारी कॉलेजच्या ग्रंथालयातून CARRनावाच्या गणितज्ञाचे भले मोठे पुस्तक आणून दिले. पुस्तक होते – सि नॉप्सिस फॉर प्युअर मॅथेमॅटिक्स. आश्चर्य म्हणजे कॉलेजच्या मुलांसाठी असलेला हा संदर्भग्रंथ एवढ्याश्या मुलाने कोणाचीही मदत न घेता वाचून काढला आणि त्यातील क्लिष्ट विषय समजावून घेतला. हे पुस्तक वाचता वाचता रामानुजन यांच्या विचारांना चांगलीच धार आली.
पूर्ण संख्या घेऊन त्यांचे जादूचे चौरस करण्यात रामानुजन पटाईत झाले होते आता चौरसाच्या क्षेत्रफळ एवढे वर्तुळ कसे काढायचे या प्रश्नावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. त्यांनी लहान वयातच पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या लांबी किती असावे याविषयीचे गणित केले आणि त्यांनी काढलेल्या या परिघाची लांबी इतकी बरोबर होती की त्यात केवळ काही फुटाची कमी होती.
वयाच्या सोळाव्या वर्षी शालांत परीक्षा पास झाल्यावर त्यांना “जूनियर सुब्रम्हण्यम शिष्यवृत्ती” मिळाली. सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन ही मिळाली.पण गणित हाच विषय त्यांच्या नसानसात भिनला होता.त्यामुळे इतर विषयांकडे त्यांचे दुर्लक्ष होत होते.त्याचा परिणाम असा झाला की एकदा नाही तर सलग दोनदा वार्षिक परीक्षा ते उत्तीर्ण झाले नाहीत.आणि त्या शिक्षणाविषयी त्यांची गोडी निघून गेली आणि त्यांनी कॉलेजचे शिक्षणच सोडून दिले.
पण आपल्या आवडत्या गणिताचा अभ्यास मात्र त्यांनी सोडला नाही. त्या काळच्या प्रथेनुसार रामानुजन यांचा विवाह करून देण्यात आला. त्यांची पत्नी दहा वर्षाची होती. दोघांचे पोट भरण्यासाठी नोकरी करणे आवश्यक होते. त्यामुळे ते चेन्नई ला आले. खूप खटपट करून एका गोदीमध्ये त्यांना कारकुनाची नोकरी मिळाली आणि पोटापाण्याचा प्रश्न थोडातरी सुटला.
गणिताच्या अभ्यासाची मात्र रामानुजन यांनी अजिबात हेळसांड केली नाही. तो अव्याहत सुरूच होता. 1911 च्या”जर्नल ऑफ इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी”या नियतकालिकात त्यांचा पहिला संशोधन लेख छापून आला.तो लेख” बेर्नुली संख्यांचे गुणधर्म”या विषयावर होता पाठोपाठ आणखी दोन संशोधन लेख याच नियतकालिकात प्रसिद्ध झाले. त्यामुळे रामानुजन यांच्या बद्दल सर्वसामान्य लोकांनाही जिज्ञासा निर्माण झाली. आपल्या लेखामध्ये त्यांनी सर्वसामान्य माणसांना कूट प्रश्नही विचारले होते.
गणित हाच त्यांचा श्वास होता – ध्यास होता.
© सौ. अंजली गोखले
मो ८४८२९३९०११
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈