शिक्षक दिवस विशेष

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(प्रस्तुत है शिक्षक दिवस के शुभ अवसर पर वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी द्वारा लिखित विशेष  विचारात्मक आलेख शिक्षक आजचा व कालचा.)

 

☆ शिक्षक आजचा व कालचा☆

 

आपण कालच्या शिक्षकापासून सुरुवात करुया.

कालच्या शिक्षकांची शिक्षणावर निष्ठा होती, त्यांची त्यांच्या विद्यार्थ्यांवर निस्वार्थ, प्रेम, आपुलकी होती. विद्यार्थ्याला कसं जास्तीत जास्त शिकवून घडवता येईल याकडे त्यांचा अधिक कटाक्ष असायचा.

ते शिक्षक स्वत: ज्ञानपरायण व विद्यार्थी परायणही होते. ते ज्या गावात नोकरीत असत तिथल्या सर्वांशी त्यांची नाळ जोडलेली असायची.

त्याकाळी त्यांना गुरुजी म्हणजे गरु मानले जायचे. गावातल्यांशी त्यांचा सलोखा असायचा. गावातलं काहीही महत्वाच काम करताना त्यांचा सल्ला मार्गदर्शन घेतलं जायचं इतकी समाजाशी त्यांची नाळ घट्ट होती.

त्यावेळी शिक्षकांना पगारही तुटपुंजा असायचा, त्यांच्या खिशात खूप पैसेही नसायचे पण मनात मात्र आनंद होता. मुलांना शिकवताना आर्थिक बाब कधी त्यांच्या मधे आली नाही.ऐनवेळी त्यांना कधी संप करुन शिकवणं बंद ठेवावं वाटलं नाही.

त्यांचं शिक्षण आतापेक्षा थोडं कमी असलं तरी मुलांचे मानसशास्त्र त्यांना तंतोतंत ठाऊक होतं.

आजच्यासारखं तंत्रज्ञान त्यावेळी नव्हतं, त्यांपासून ते कदाचित दूर असतील पण नेमक्या वेळी नेमके काय करावे हे त्यांना पक्के ठाऊक होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवून त्यांच्यात चांगले गुण रुजविण्याचा प्रयत्न केला.

आजचे शिक्षक तंत्रस्नेही, तंत्रप्रेमी बनले आहेत. अगदी तंत्रज्ञानातले बरेचसे प्रकार त्यांना उत्तम अवगत झाले आहेत पण एकाही शिक्षकाचा चेहरा आता मुलांना शिकवताना उचंबळून येत नाही.न जाणो तंत्रज्ञानामुळे शिक्षकांच्यातही यांत्रिकता आली की काय ? असे वाटते!

आज बहुतेक सर्व शिक्षक पाच अंकी पगार घेताहेत, त्याबद्दल काही आक्षेप घेण्याचं कारण नाही,पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर खराखुरा आनंद दिसत नाही असे वाटते.

आर्थिक सुबत्ता भरपूर आली, भौतिक प्रगती झाली मात्र मूळ ध्येयापासून सध्याचे शिक्षक कोसो दूर राहिलेत  असे वाटते.त्यांचा शिकवण्याची वृत्ती कमी व समर्पिततेचा अभाव दिसून येतो. ते पगारार्थी व व्यावसायिक वृत्तीने आपल्या पेशाकडे पहाणारे झालेत. पेशा, व्रत हे शब्द आता विस्मृतीच्या वाटेवर आहेत असे वाटते.

आजचा एकटा शिक्षकच या सर्वाला जबाबदार आहे असे म्हणता येणार नाही. कारण आजचा समाज, पालकवर्ग, विद्यार्थी, शासनाचे सतत बदलणारे ढिसाळ धोरण व बदलती विचार सारणी हे सर्व घटक याला तितकेच जबाबदार आहेत.

सामाजिक जडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे.देशाला सुदृढ व बुद्धिमान नागरिक पुरविण्याचे श्रेय शिक्षकांना जाते.म्हणून आज योग्य विचारसरणीच्या शिक्षकांची समाजाला गरज आहे.

 

©®उर्मिला इंगळे

दिनांक:-४-९-१९

!!श्रीकृष्णार्पणमस्तु !!

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments