श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। श्रीमती उर्मिला जी के “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनके स्वानुभव एवं संबंधों पर आधारित कथा “मालतीचं पत्र”। उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है। ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )
☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 27 ☆
☆ मालतीचं पत्र ☆
(कथा)
रोजच्याप्रमाणे पोस्टमन दिसल्याबरोबर मंजुळा बाईंनी त्याला विचारलंच ..” आमचं पत्र आलंय कां.? ” पोस्टमन फक्त गालातल्या गालात हसला व पुढं गेला त्याला हे नित्य परिचयाचं होतं.
पण त्यानंतर चारच दिवसांनी त्याने मंजुळाबाईंच्या हातात एक लिफाफा दिला व म्हणाला घ्या तुमच्या सुनबाईंचं पत्र.! अगदी उत्साहाने त्यांनी ते फोडलं पण वाचता येत नसल्याने त्यांनी आजूबाजूला पाहिलं तेवढ्यात आमच्या घराच्या ओसरीवर बसायला येणाऱ्या सदाला त्यांनी हाक मारली व म्हणाल्या ” सदा एवढं पत्र वाचून दाखव रं !”
मग ओसरीवरच मंजुळाबाई मांडी घालून डाव्या हाताचा कोपरा गुडघ्यावर टेकवून ऐटीत बसल्या अन् म्हणाल्या “बघ रं काय म्हणतीय मालती ?”
मालती हे माझं माहेरचं नाव पण मला त्या कायम त्याच नावानं बोलवायच्या.
आमचं. लग्न होण्यापूर्वी माझे सासरे वर्षभर अगोदर गेलेले होते. आम्हा दोघांना एकाच खात्यात एकाच दिवशी नोकरी लागल्याने आम्ही परगावी होतो. आणि मोठ्या दिरांच्या बदलीने तेही दूर त्यामुळे गावी त्या व शाळेत जाणारी दोन मुले गावी असायची.
साधारण १९६३ साल खेडेगावात त्यावेळी दुसरा काही विरंगुळा नसायचा. मुलं शाळेत गेली की त्या एकट्या असायच्या. तशा माझ्या चुलत सासुबाई, आजेसासुबाई तिथंच असायच्या. आमचं घर बऱ्यापैकी ऐसपैस. आमची स्वयंपाकघरं वेगवेगळी पण ओसरी मोठ्ठ अंगण एकच होतं.
आजेसासूबाईंना सर्वजण मोठीआई म्हणायचे. म्हणजे वयाने तर होत्याच पण ओसरीचा अर्ध्या खणाचा भाग त्यांच्या बैठकीने व्यपलेला असायचा.
ओसरीवर बसून जाणायेणाऱ्यांकडे नव्वदाव्या वर्षीही त्यांचं अगदी बारीक लक्ष असायचं. अन् पोस्टमन घराच्या दिशेने येताना दिसला की म्हणायच्या ….
“अगं मंजुळा तुझ्या मालतीचं पत्र आलं गं ऽऽ आलं…!”
मी पोस्टकार्ड वर कधीच पत्र लिहीत नसे. कारण माझा मजकूर त्यावर कधी बसायचाच नाही.फुलस्केप वर पानभर आणि पाठपोठ असा माझा मजकूर असायचा….
माझ्या ठसठशीत अक्षरातला सविस्तर मजकूर वाचून त्यांना खूप आनंद व्हायचा. म्हणायच्या
बघा माझी मालती कशी रेघ न् रेघ कळवती लिहून काय झालं काय नाही…
माझ्या जन्म दिलेल्या मुलालाही नाही पण हिला किती काळजी असते.
माझं आलेलं पत्र त्या दिवसातून दोन तीनदा तरी भेटेल त्याच्याकडून वाचून घ्यायच्या.
माझ्या पत्रात माझं घरातलं सगळं आवरून ऑफिसला जाताना होणारी तारेवरची कसरत, ऑफिसात साहेबांचा खाल्लेला ओरडा. कारण एस एस.सी झाल्यावर दोन वर्षांतच नोकरी सुरू.त्यामुळे वय आणि अनुभव दोन्ही बेताचेच.! असं सगळं माझं साग्रसंगीत वर्णन त्या पत्रात असायचं. त्याची त्यांना गंमत आणि कौतुक दोन्हीही वाटायचं.
आमची मुलं जरा मोठी झाल्यावर आम्ही उभयता मे १९७९ मध्ये “नेपाळ दार्जिलिंग” सहलीला गेलो होतो. तिथंन मी प्रवासाच्या सुरुवातीपासूनचं संपूर्ण सहलीचं वर्णन वेळोवेळी पाठवत होते.
त्यातल्या एका पत्रात मी हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांचं वर्णन पाठवलं. कैलास पर्वताच नाव ऐकताच त्या म्हणाल्या बघा कैलासराणा शिवचंद्रमौळी जिथं रहातो ते माझी सून मुलगा बघून आली. त्या रोज ते स्तोत्र म्हणत असल्यानं त्यांनी मला नंतर सांगितलं की तुमच्याबरोबर मी कैलास पर्वताचं दर्शन घेऊन आल्याचं मला जाणवलं.
पत्र म्हणजे तरी काय हो “या हृदयीचे त्या हृदयी.!” आपल्या मनाच्या कप्प्यातल्या भावना इतरांना समजावून सांगण्याचा एक खूप सुंदर सोपं साधन !
आठवणींना उजाळा देणारी शब्दांजली म्हणजेच पत्र.! अगदी आत्ता हे लिहिताना माझ्या पूर्वीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या. म्हणून तर म्हणतात ” मनात दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करुन देणारं हळूवार शस्त्र म्हणजे पत्र “!
मग ते पत्र श्रीसमर्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेले असो, पूज्य साने गुरुजींनी लिहिलेली ,पं.जवाहरलाल यांनी प्रियदर्शनीस लिहिलेली, बॅ.पी.जी.पाटील यांनी पूज्य कर्मवीर भाऊराव पाटील यांना लंडनहून लिहिलेली, सीमेवरच्या वीर जवानाने त्याच्या प्रियजनांस लिहिलेली असो ही एक अत्यंत अनमोल ठेव आहे असे मला. वाटते.!
“पू. मंजुळा स्मृतीस अर्पण”
©®उर्मिला इंगळे
सतारा मो – 9028815585
!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!