श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। श्रीमती उर्मिला जी के “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है उनके स्वानुभव एवं संबंधों पर आधारित संस्मरणात्मक कथा “बुकीची सून ”। उनकी मनोभावनाएं आने वाली पीढ़ियों के लिए अनुकरणीय है। ऐसे सामाजिक / धार्मिक /पारिवारिक साहित्य की रचना करने वाली श्रीमती उर्मिला जी की लेखनी को सादर नमन। )
☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 28 ☆
☆ बुकीची सून ☆
(विषय :- व्यक्तिरेखा )
दिवाळीची सुट्टी सुरू झाली होती त्यामुळे मोठी मुलगी व तिच्या मुली आल्या होत्या.सकाळच्या वेळी मी अंगण झाडत होते माझ्या दोन्ही नाती अश्विनी अक्षया माझ्या मागेपुढे करत होत्या.त्या शहरात रहात असल्याने त्यांना मोठ्ठ अंगण म्हणजे अगदी अप्रूप वाटायचं.
दसरा नवरात्रीची धामधूम संपली की आमच्या दारावर रांगोळी विकणाऱ्या बायका येतात.तशीच एक जाडजूड काळी बाई डोक्यावर रांगोळीचं भांड घेऊन “रांगोळी
..ए ..असं जोरजोरात म्हणत
आली अन् माझ्या जवळच थांबली न् मला म्हणाली ” आवो ,ऽऽ घ्यावो ..ऽऽ. ताई… एकदम पांढरी लयी छान हाय बगा.”
दसऱ्याला घेतलेली बरीच रांगोळी शिल्लक असल्यानं मी तिच्या बोलण्याकडं लक्ष दिलं नाही मी माझं हातातलं काम करत राहिले तशी घ्याहो.. म्हणून माझ्या मागेच लागली. मी म्हटल मागचीच शिल्लक आहे आणि आता घरादारात फरशा बसवल्यात त्यामुळे रांगोळी फार संपत नाही गं…मग मात्र माझं लक्ष वेधून घेण्यासाठी ती जोरात म्हणाली आवो ताई तुमच्या ” बुकीची सून हाय ओ….मी….!” .
तिचं बोलणं ऐकून माझ्या दोन्ही नातींना काही उलगडा होईना .
या भिकारणीसारख्या दिसणाऱ्या बाईची सासू …आजीची ” बुकी “… म्हणजे काय..?..
पण मला झाला..
कारण….
सुमारे पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी भिक्षा मागण्यास बंदी नव्हती. त्यावेळी आमच्या पेठेत एक भिकारीण रोज यायची. तेव्हा आजच्या सारख्या घंटागाड्याही नव्हत्या. कोपऱ्या कोपऱ्यावर नगर परिषदेच्या कचरा कुंड्या असायच्या.
तर ही भिकारीण आमच्या सगळ्यांच्या घरच्या केरकचऱ्याच्या बादल्या त्या कुंडीत रित्या करायची. आणि त्याबदल्यात तिला सर्व घरातील उरलेलं शिळं अन्न दिलं जायचं.
ती मुकी असल्यानं तिचं नाव कुणाला माहीत नव्हतं ऐकूही येत नसल्यानं तिच्याशी कोणाचा संवाद नसायचा, पण मी मात्र तिच्याशी खाणाखुणांनी बोलायचे. कधीमधी तिला छान ताज ताक, थंडगार कलिंगडाची फोड द्यायचे. तिला ते खूप बरं वाटायचं खाऊन पिऊन झाल्यावर ती मला स्वत:च्या छातीवर हात ठेवून जीभ टाळ्याला लावून टक्क् असा मोठ्ठा आवाज करायची म्हणजे खूप छान होतं, आवडलं .! असं सुचवायची.
मलाही खूप बरं वाटायचं.तशी ती नाकी डोळी नीटस होती.
तिला मुकी भिकारीण असं ल़ोक म्हणत आणि ते माझ्या मुलांना आवडायचं नाही. म्हणून त्यांनी तिचं नाव शाॅर्टमधे करायचं ठरवलं. मुकी भिकारीण म्हणून आधी ” भुकी ” म्हणायचं असं सर्वांनी ठरवलं पण त्यातून ती भुकेली आहे असा निष्कर्ष निघतो इति माझा मोठा मुलगा ! मग तो म्हणाला आपण तिला “बुकी” म्हणूया…मग सर्वांनी एकमताने अनुमोदन देऊन तिचे नामकरण “बुकी” असे झाले.तेव्हापासून ती आमच्या पेठेची बुकी झाली.
तिचं येणं नित्यनियमाचं असायचं.एकदा बरेच दिवस ती आलीच नाही बरं.. चौकशी तरी कुठं करायची.दोन अडीच महिन्यांनी एकेदिवशी ती दिसली.सगळ्यांनी विचारुन तिला बेजार केलं. मग मीच तिला एक दिवस खुणेनं विचारलं तेव्हा लाजत लाजत कपाळावरच्या कुंकवाकडे हात दाखवून नवऱ्याकडे गावी गेलेहोते असं. म्हणाली.
असेच काही दिवस गेले आणि ती पोटुशी असल्याचं लक्षात आलं.मग आम्ही तिला जरा आंबट चिंबट पदार्थ लोणची असं देऊन आम्ही आनंद घेत होतो.व तिचं जरा कौतुक करत होतो तीलाही ते आवडत होतं.मग तिला मुलगा झाला.त्याला काखेच्या झोळीत बांधून ती यायला लागली.ते बाळही गुटगुटीत छान होतं विशेष म्हणजे ते बोलू शकतं हे खुणेनेच सांगताना तिला झालेल्या आनंदाचं वर्णंनच नाही करता येणार.?
कालांतराने भिक्षा मागण्यास शासनाने मनाई केल्यामुळे की काय ती परत आम्हाला दिसलीच नाही. आम्हीही आमच्या रोजच्या घर ऑफिस मुलं सुना नातवंडे यात गुंतल्याने तिला विसरून गेलो.
आणि आज माझ्या “बुकीची सून” प्रत्यक्ष माझ्या समोर उभी !
आता नको असली तरी अधूनमधून मी तिच्याकडून रांगोळी घेते. तिचा आवाज मात्र भसाडा घोगरा आहे…ती ” रांगोळी ‘.. म्हणून ओरडत येते तेव्हा कानावर हात ठेवावा लागतो. आता हिचं नाव काय ठेवावं असा प्रश्न पडलाय.
सुचवाल कां एखादं नाजूक सुंदर नाव…
माझ्या बुकीच्या सूनेसाठी…!
कां आपलं हेच बरं आहे..” बुकीची सून ‘!!!
©®उर्मिला इंगळे
सतारा मो – 9028815585
!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!