श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ”  की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  उनकी शिक्षाप्रद कहानी फुलवा

आज भी गांवों में और यहां तक क़ि शहरों में भी लोग अंधश्रद्धावश अपना सब कुछ खो देते हैं .  यह कहानी हमें प्रेरणा देती है क़ि यदि समय रहते किसी को अंधश्रध्दा से बचाया जा सके, तो उसे एक नवजीवन प्रदान किया जा सकता है और इससे बड़ी कोई भी समाजसेवा नहीं है.

 

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 4 ☆

 

☆ कथा – फुलवा  ☆

 

आठवड्याचा बाजार भरला होता. कोणती भाजी घ्यावी अन् काय काय घ्यावं ह्या विचारात शिंदेबाई बाजार बघत फिरत होत्या,तेवढ्यात त्यांच्या समोर एक वयस्कर बाई आली अन् हात जोडत बाईंना म्हणाली,”. तुम्ही शिंदेबाई नां ?मला तुमालाच भेटायचं हुतं ….वाईच बोलायचं हुतं तुमच्यासंगट “!…

शिंदे बाई म्हणाल्या मी ओळखलं नाही ..

तशी ती म्हणाली “आवो ईस बावीस वर्स झाली तुमच्या साळंशेजारी आमचं खोपाट हुतं…मी आन् माज्या दोन पोरी..

माझ्या लेकीला न्हाई कां तुम्ही आक्षी मरनाच्या दारातनं वडून आनलं  देवावानी…’

शिंदेबाईंच्या डोळ्यापुढे त्या बाईच्या दोन मुली, त्यातली मोठी  म्हणजे बाईंची अगदी लाडकी !…. सगळं अगदी सगळ्या घटनांचा पट डोळ्यसम़ोरुन सरकू लागला…..

सालाबादप्रमाणे जूनमध्ये शाळा सुरू झाली आणि  पालक शाळेत मुलांची नावं दाखल करायला येऊ लागले.तशीच शेजारच्या खोपटातली एक विधवा तिच्या मुलीला घेऊन आली.

बाईंनी त्या मुलीचं नाव विचारलं..

‘फुलवा धोंडीबा सोनावने ‘ बाईंना हे ‘फुलवा ‘ नाव फारच भावल. त्यांनी तिच्याकडं कौतुकभरल्या नजरेनं  पाहिलं. मग त्या बाईला नाव विचारताच ती म्हणाली “या बया आता मला बी साळंत घालता कां काय ?”…

तशी बाई म्हणाल्या “अहो , आता आईचंही नाव लिहावं लागतं ..”

ही नवीन मुलगी ‘ फुलवा ‘  झोपडपट्टीत रहाणारी पण नाकी डोळी नीटस ,एकदम तरतरीत,बोलके डोळे तिला पहाताक्षणीच बाईंना ती छान वाटली…

ती रोज शाळेत वेळेत यायची. अंगावरचे कपडे साधेच पण नीटनेटके.वर्गात शिकविलेलं तिला लगेचच कळायचं… वर्गातल्या इतर मुलांपेक्षा ही एकदम चुणचुणीत..!…

हळूहळू बाईंच्या लक्षात आलं की हिचं अक्षर, चित्रकला सारंकाही सुंदर आहे. अगदी वर्गाच्या साफसफाईचं काम असो, रांगोळी, तक्ते,पताका चिकटवणं सर्व काम ती मन लावून करते. सर्व उपक्रमात हिचा सहभाग.!..

आता तर ती वर्गाची सेक्रेटरी झाली होती.ती सारखी बाईंच्या मागेपुढे असायची,याचं मुख्य कारण की बाई तिला प्रचंड आवडायच्या !..अन्  दुसरं म्हणजे तिची आई मजूरीवर दूर  जायची त्यामुळे दिवसभर खोपटाला कुलूप..मग बाईच तिचा खूप मोठा आधार ….

एक दिवस नेहमीप्रमाणे शाळा भरली पण फुलवा काही शाळेत आली नाही…बाईंना वाटलं आईंबरोबर गेली असेल येईल उद्या परवा…पण ते चार-पाच दिवसांपासून ती गैरहजर.

दुसऱ्या दिवशी शाळेत येताना बाईंनी तिच्या खोपटाचा उघडलेला दरवाजा पाहून त्या तिथं गेल्या.

पहातात तो ती एकटीच एका गोधडीवर अंगाचं मुटकुळं करून पालथी झोपली होती.

बाईंनी तिच्या आईला निरोप धाडला व बोलावून घेऊन सांगितलं की मुलगी एवढी आजारी असताना तिला एकटीला ठेवून तुम्ही कामावर जाता ? तिला असं एकटीला टाकून जाणं धोक्याचं आहे.त्यापेक्षा तुम्ही तिला शाळेत पाठवा इथं ती सुरक्षित तरी राहील व इतर मुलांबरोबर खेळली तर तिला बरं वाटेल. मग ती शाळेत आली..पण आता ती पूर्वीसारखी हसरी वाटत नव्हती. मुरझल्यासारखी दिसत होती.म्हणून बाईंनी जवळ जाऊन तिला विचारलं तुला काय होतंय गं ? तशी ती एकदम रडायला लागली,  म्हणाली बाईं माझ्या पाठीत दुखतंय..! बाईंनी तिच्या पाठीला हात लावून पाहिलं तर तिथं मोठा फोड आला होता अन् तिचं अंगही तापानं फणफणत होतं.

संध्याकाळी बाई तिच्याबरोबर तिच्या घरी गेल्या. तिची आई नुकतीच मजूरीवरनं आली होती. बाईंनी तिला सांगितलं “अहो, तुमच्या मुलीच्या पाठीवर एवढा मोठा फोड आलाय ती तापलीय, तिला दवाखान्यात न्या लौकर..”

तशी तिची आई म्हणाली “छ्या…छ्या..! आवं.. दवाखान्यात न्हिऊन ती बरी व्हनार न्हाई… तिला  ‘म्होट्टी बाई ‘ झालीया ..!”

आमच्या हितल्या साऱ्यांनी सांगितलंय की हिला औषधपानी केलं तर दुखनं वाढतं..! परवा. तिला देवरुषाकडं न्हेलं व्हतं. त्यो म्हनला हिला म्होटी बाई म्हंजे मोठ्ठा फोड येतो म्हणून ती बरी होन्यासाठी ‘ देवीची मांड’ भरायला सांगितली हाय. त्यासाटनं पन्नास लिंब, पंचीस नाऱ्याळ, याक बकरं, कोंबडं, साडीचोळी असं बरंच काईबाई आनाया सांगितलं हाय.त्यासाटंनच म्या पैकं गोळा करतीया…”

बाईंनी तर कपाळालाच हात लावला अन् म्हणाल्या तुम्ही अगोदर हिला दवाखान्यात न्या.! ती मोठीबाई वगैरे काही नसतं. पण तिची आई काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. तिचं म्हणणं एकच ‘पैकं जमलं की’ मांड भरनार बाकी काही न्हाई ‘..!

बाई मनात म्हणाल्या या अंधश्रद्ध लोकांना काय व कसं सांगावं..?…

शेवटी शिंदे बाईंनीच धाडस करून तिच्या आईला न सांगता त्या मुलीला सरकारी दवाखान्यात घेऊन गेल्या. डॉ नी तिच्या पाठीवरच्या गाठीची तपासणी तालुक्याच्या गावाला जाऊन करून आणायला सांगितली. बाईंनी ते सर्व केलं. डॉ नी तिला मणक्यांचा टी‌बी.असल्याचं सांगून तिला स्टेप्टोमायसीनची नव्वद इंजेक्शन व रोजच्या गोळ्या औषधं वेळच्या वेळी दिली व सकस अन्न खायला दिले तर ही वर्षभरात बरी होऊ शकेल असं सांगितलं.

बाईंनी तिची सर्व जबाबदारी घेतली. तिला दिवसाआड इंजेक्शनला नेणं, आणणं, रोजच्या गोळ्या औषधे वेळेवर देणं हे सर्व वर्षभर केलं.

तेव्हा दीड वर्षांने ती पूर्णपणे टीबीमुक्त झाली.

दीड वर्ष बाई रोज तिच्यासाठी डब्यात पौष्टिक आहार, फळं वगैरे आणून तिला मायेनं खाऊ घालायच्या. त्यामुळे ती  खडखडीत बरी होऊन पहिल्यासारखी छान दिसायला लागली.

तिच्या आईच्या हे लक्षात आलं होतं. ती म्हणाली  “अडानी लोकांचं ऐकून म्या पोरीला देवरुषाकडं न्हेलं असतं तर उपेग काईबी झाला नसता पन् माज्या पोरीचा हकनाक बळी मातुर गेला असतां..आन् आमची पोटं मारुन साठवलेला पैका त्या देवरुषाच्या मढ्यावर घालून पश्र्चाताप करायची येळ आली असती ..पन् बाईंनी  पैका न खर्च करता सरकारी दवाखान्यात उपचार देऊन माज्या पोरीला चांगली केली.

फुलवा आता चौथीत गेली होती. ती अभ्यासात हुशार होतीच, अक्षरही सुरेख मग बाईंनी तिला इतर मुलांबरोबर शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसवलंअन् ती केंद्रात चक्क पहिली आली. तिच्या आईलाही खूप आनंद झाला. चौथीची परीक्षा झाल्यावर ती पुढच्या वर्गात गेली व बाईंचीही दुसऱ्या शाळेवर बदली झाली अन् संपर्क तुटला….

शिंदे बाई बाजारातून घरी परत आल्या तशी ती मघाची बाजारात भेटलेली बाई घर शोधत आली.बाईंनी तिला पाणी दिलं. घरी आल्यावर तिला काय अन् किती सांगू असं झालं होतं…

ती सांगत होती..बरं कां बाई तुमी जिला वाचवली ती तुमची लाडकी फुलवा ल…ई.. ..शिकून आता मामलेदारीची परीक्षा दिली आन् तिला ती नोकरी पन् मिळनार हाय….! ही आनंदाची बातमी सांगाया  आन् तुमचं तोंड गोड कराया आज मी हितवर तुम्हाला सोधत आले.

खरंच ओ बाई तुमी त्या वक्ताला अक्षी देवावानी धावून आलात माज्या पोरीचा जीव वाचवलात म्हणून माजी “लेक वाचली” असं म्हणून तिला गहिवरुन आलं. बाईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला व तिला शांत केलं. म्हणाल्या तुमच्यासारख्या अडाणी लोकांना ते देवरुशी लोक फसवतात अन् तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकता..! ..पण तसं होण्यापूर्वीच मी तिला उपचार सुरू केले आणि तिचं दैव व परमेश्र्वर कृपा यामुळे ती वाचली. मी फक्त निमित्तमात्र…!

सगळं ऐकल्यावर बाईंना खूप आनंद झाला. त्यांनी विचारलं आणि ती धाकटी …?

सरिता व्हय…! हितं न्हाई कां रोज साळा बुडवून माज्यासंगट कामावर मी जाईन तिकडं यायची.तिला नुसतं हुंदडायला आवडायचं.डोंगरावनं खाली पळत यायाचं पुन्ना चडून जायाचं, गुरं चारायला लांबलांब घिऊन जायाचं हेच तिला आवडायचं..!

ती भरभरून बोलत होती. आमी पुन्याला भावाकडं गेलो. तीथं तिला साळत घातली पन् हिचं धावायचं येड काही जाईना. हे तिच्या सरांच्या धेनात आलं. त्यांनी तिला

ते धावपटू का  काय म्हनत्यात त्ये करायचं ठरीवलं. तिनंबी लयी कष्ट घेतलं. आन् बाई ती धावन्याच्या स्पर्धेत पयली आली ती सोन्याचं पदक घीऊनच.

अरे..व्वा…! हे ऐकून तर बाईंना आणखीनच आनंद झाला.

थोडयाच दिवसांत फुलवा बाईंना. भेटायला आली ती मामलेदार होऊनच…!

समोरासमोर दोघींनी एकमेकींना पाहिल्यावर एकदम भरून आलं…तिनं पट्कन बाईंच्या पायाला स्पर्श केला. बाईंनी तिच्या खांद्यांना धरुन हलकेच उठवलं अन् जवळ घेत म्हणाल्या …”किती मोठी झालीस गं..!.” तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला तिला बाईंच्या प्रेमळ कुशीचा खूप छान आधार वाटला.

ती मुळातच छान होती पण आता तारुण्य आणि उच्च शिक्षणाचं एक आगळंच तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. बाई तिच्याकडं कौतुकानं पहातच राहिल्या.

फुलवा म्हणाली ..”बाई मी तुमचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून शाळांमधल्या गरीब व गरजू मुलींना शक्य होईल तशी मदत करणार आहे. पू. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेनुसार मुलगी दत्तक घेऊन तिच्या शिक्षणाचा व अन्य खर्च उचलणार आहे…!’

‘हे सगळं करण्यात एक वेगळाच आनंद लपलेला असतो हे उमगलंय मला “.

शिंदे बाईंना तिच्या बोलण्याचं खूप कौतुक अन् तितकंच समाधानही वाटलं.

त्यांच्या मनात आलं  आपण लावलेल्या “आनंदाच्या” छोट्याशा रोपट्याला चैतन्याचे धुमारे फुटून नवं चैतन्याची फुलं बहरली आहेत…अन् ते” बाईंच्या डोळ्यापुढं वाऱ्याच्या झुळुकीनं डोलू लागलं…!!

तेवढ्यात शेजारच्या गाडगीळ काकू तिन्हीसांजेला म्हणत असलेल्या श्लोकातील शब्द कानावर आले…

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

 

©®उर्मिला इंगळे, सातारा

!!श्रीकृष्णार्पणमस्तु‌!!

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments