सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ लेखिका – संपदा जोगळेकर,सोनाली लोहार,हर्षदा बोरकर,निर्मोही फडके ☆
☆ – “गुंफियेला शेला” – एक प्रयोग ☆
ग्रंथालीने नुकतेच एक आगळे – वेगळे पुस्तक प्रकाशित केले. ‘गुंफियेला शेला’. याचं वेगळेपण यात आहे, की एकच चित्र बघून चौघींना सुचलेल्या चार लघुकथा यात आहेत. अशा बारा चित्रांच्या ४८ लघुकथांचा हा शेला. या शेल्याची संकल्पना संपदा जोगळेकर कुळकर्णी यांची, तर त्यांना साथ दिलीय, सोनाली लोहार, हर्षदा बोरकर, डॉ. निर्मोही फडके या त्यांच्या तीन सख्यांनी. वरील पुस्तक 3 एप्रील 2022 रोजी डॉ.स्नेहलता देशमुख (मुंबईच्या माजी कुलगुरू ) यांच्या हस्ते प्रकाशित झाले .
संपदा जोगळेकर कुळकर्णी म्हणतात, ‘चित्र हे सर्जनाचं कारण ठरवलं. मग चित्र, चित्रांचे रंग, रेषा, आकार, त्यातून निर्माण होणारे भास, आभास, या मातीत कल्पनेला कोंब फुटला आणि त्याची झाली कथा. डॉ. निर्मोही फडके आपल्या मनोगतात म्हणतात, की शब्दांमधुनी उमलले सारे, चित्राच्या पालीकडले’. तर अशा या चित्रप्रेरीत कथा. प्रत्येक कथा केवढी? फक्त वीस वाक्यांची. सोनाली, लिहितात,
‘शब्द मोजकेच होते, पण गोष्ट मोठी झाली.
तो ‘गुंफियेला शेला’ अन् मनं रिती झाली.’
आपला अनुभव व्यक्त करताना हर्षदा बोरकर लिहितात, ‘केवळ वीस वाक्यात कथा गुंफताना कल्पनेला विवेकाचा लगाम लावत, नेमक्या शब्दांना ओवत, चित्रातील व्यक्त-अव्यक्त साराला कथेचा परिपोष बनवण्याचा प्रयत्न केला. ’ चित्राधारीत, चार लेखिकांच्या, प्रत्येकी वीस वाक्यातील चार कथा, हा साहित्य क्षेत्रातला एक वेगळा प्रयोग आहे. वाचकांपर्यंत हा नवा प्रयोग पोचवण्यासाठी आम्ही एका चित्रावरील चार कथा इथे रोज क्रमश: एक,अशा देत आहोत. त्यापूर्वी आज वाचू या, ‘गुंफियेला शेला’ या पुस्तकाचा परिचय.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈