श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “कायद्याचा नाही.. सामाजिक मानसिकतेचा पराभव…☆ श्री जगदीश काबरे ☆

 कायदा अस्तित्वात आहे, दंडाची तरतूद आहे, तरीही पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या वस्तूंचा वापर सुरूच राहतो, याचा अर्थ केवळ कायद्याची अंमलबजावणी अपुरी आहे असे नाही; तर नागरिकांच्या मनात कायद्याबद्दलची नैतिक बांधिलकीच निर्माण झालेली नाही. याला कायदेभंगाची सामाजिक मानसिकता म्हणतात. कायदा आहे, पण कायद्याची संस्कृती नाही, असे आपल्या देशाचे वास्तव आहे. लोकांच्या मनात ‘पोलिसांनी मला पकडले नाही, म्हणजे मी काही चुकीचे केलेले नाही’, अशी मानसिकता असेल, तर पंचवीस हजार रुपयांचा दंडही परिणामकारक ठरणार नाही. कारण पर्यावरणाचे नुकसान तात्काळ दिसत नाहीत, त्याचा फटका आपल्या बरोबरच पुढच्या पिढ्यांना चांगलाच बसतो.

यामागे सामाजिक अनुकरण, दिखाऊपणा आणि पर्यावरणीय परिणामांविषयीची उदासीनता हे तीन महत्त्वाचे घटक आहेत. एकाने थर्माकोलची सजावट केली की दुसरा करतो; प्लास्टिकच्या माळा स्वस्त आणि आकर्षक वाटतात, म्हणून सगळेच त्या विकत आणतात. आणि समारंभाची शोभा वाढवली जाते. अशी तात्कालीक क्षणभंगुर शोभा वाढवणारे आपण ‘अदरवाईज जंटलमन’ असतो. पण हा स्वतःच्या चुकीला योग्य ठरवणारा कुतर्क आहे. त्यामुळे प्रश्न केवळ प्लास्टिक किंवा थर्माकोलचा राहत नाही; तो नागरिकांच्या विवेकाचा प्रश्न बनतो. म्हणून या परिस्थितीला एका वाक्यात असे म्हणता येईल की, कायदा बदल घडवू शकतो; पण कायद्याचे पालन करण्याची मानसिकता बदलली नाही, तर कायदा कागदावरच राहतो. खरी पर्यावरण जाणीव म्हणजे दंडाची भीती वाटून थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापरणे टाळणे नव्हे, तर दंड नसतानाही ते वापरू नये असे स्वतःला वाटणे होय.

प्लास्टिक आणि थर्माकोल यांचे सहज जैवविघटन होत नाही. ते पर्यावरणात बारीक बारीक तुकड्यांच्या स्वरूपात दीर्घकाळ टिकून रहाते. हे तुकडे कालांतराने सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म कणांमध्ये बदलतात. हे कण हवा, पाणी आणि अन्नसाखळीमार्फत माणसाच्या पोटात जातात, आणि मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम करतात. हे एक प्रकारचे स्लो पॉइझनिंग असते. म्हणून दिसत नाही म्हणजे नष्ट झाले, हा समज अत्यंत धोकादायक आहे. प्लास्टिकची फुले, थर्माकोलची सजावट कचऱ्यातून गायब झाली म्हणून समस्या संपलेली नसते; ती फक्त मोठ्या तुकड्यापासून अदृश्य होणाऱ्या सूक्ष्म कणांच्या रूपात बदललेली असते.

प्लास्टिक आणि थर्माकोचे दुष्परिणाम लगेच दिसत नाहीत; म्हणून काय फरक पडणार आहे, असा विचार हजारो लोक करतात आणि सामूहिकपणे ही मोठी समस्या निर्माण होते. जेव्हा त्याचे परिणाम पाणी, हवा, कचरा, आरोग्य किंवा हवामानाच्या रूपाने गळ्याशी येतात, तेव्हा मात्र दोष सरकारच्या माथी मारला जातो, प्रशासनाला दोषी धरले जाते. पण सामान्य माणसाला संकट दिसेपर्यंत त्याचा विवेक झोपलेला असतो आणि संकट आले की तो पश्चाताप करू लागतो. तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते.

म्हणूनच म्हटले जाते की, खऱ्या अर्थाने सुजाण समाजाची ओळख संकट आल्यानंतर तो काय करतो यात नसते; संकट येण्यापूर्वी तो कोणती खबरदारी घेतो यात असते. कळले का? 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Neha
0

अगदी खरंय.कायद्याच्या बडग्याने वागणुकीत सुधार होणे म्हणजे सुधारणा नव्हेच. ती मनापासून व्हायला हवीयं.