मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १११ आणि ११२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १११ आणि ११२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. १११ – – 

हिताकारणे बोलणे सत्य आहे ।

हिताकारणे सर्व शोधूनि पाहे ।

हिताकारणे बंड पाषांड वारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ।।१११।।

अर्थ : समर्थ म्हणतात, ” हितासाठी जे सत्य आहे ते मी तुला सांगतो. आपल्या हितासाठी तू स्वतःच हितकारक गोष्टींचा शोध घे. धर्माच्या विरुद्ध असणारे पाखंडी किंवा नास्तिक विचार बाजूला सार. ज्या चर्चेतून शंकांचे निरसन होते अशी चर्चा किंवा संवाद हितकारक असतो. “

(हिताकारणे – आत्महितासाठी, बंड – विचारातील विरोध, पाषांड – देव व धर्म विरोधी वागणे किंवा नास्तिकता, वारणे – दूर सारणे)

विवेचन : आत्मतत्वाचा शोध घेणे किंवा आत्मसाक्षात्कार करून घेणे हे प्रत्येक मनुष्याचे ध्येय असले पाहिजे असे समर्थांचे सांगणे होते. हेच आपल्या हिताकरिता त्यांनी सांगितलेले सत्य. परंतु काही लोक हे खरोखरच आपल्या हिताचे आहे यावर विश्वास ठेवायला तयार नसतात. म्हणून समर्थ म्हणतात की या गोष्टीचा तू स्वतःच शोध घे. त्यासाठी सर्व मार्गांचा वापर कर. साधू संत काय सांगतात किंवा ग्रंथांमध्ये काय म्हटले आहे हे तपासून पहा. एखादी गोष्ट माणूस जेव्हा स्वतः समजून घेतो, तेव्हा त्यावर त्याचा जास्त विश्वास बसतो. म्हणून समर्थांनी मी सांगतो तेवढेच खरे असे न मानता तुम्ही स्वतःच सत्याचा शोध घ्या असा कळकळीने उपदेश केला आहे.

राम लक्ष्मणादि भावंडांचे गुरु वसिष्ठांच्या आश्रमातील शिक्षण जेव्हा पूर्ण झाले, तेव्हा त्यांना निरोप देताना ते म्हणाले, ” मी माझ्याजवळ असणारे सर्व ज्ञान तुम्हाला दिले आहे. परंतु तरीसुद्धा तुम्ही आपल्या आयुष्यात मी सांगितलेले तेवढेच खरे असे मानून चालू नका. तुमच्या विचारांना आणि विवेकबुद्धीला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे वागा. ” वसिष्ठांसारखी किंवा समर्थांसारखी अधिकारी व्यक्ती जेव्हा असे म्हणते, तेव्हा आपण तर सामान्य माणसे! आपल्या ज्ञानाचा उगीच गर्व करण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे अशा व्यक्ती जे सांगतात त्यामागे त्यांची साधना असते. सांगण्याचा अधिकार असतो. ‘ आधी केले मग सांगितले ‘ अशा या व्यक्ती असतात.

सत्याची एक वेगळी व्याख्या महाभारतात फार छान आहे. जे हितकारक आहे, ते सत्य असे त्यात म्हटले आहे. एखादी गोष्ट आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी घातक आहे असे जेव्हा आईला वाटते, तेव्हा ती त्याला ते देत नाही. तुझे पोट दुखेल, दात किडतील असे सांगून त्याला ती तो पदार्थ देत नाही. इथे तिचे बोलणे असत्य जरी असले तरी तिच्या मुलासाठी ते हितकारक आहे. काही वेळा कटू बोलणे आपल्या हितासाठी असते. परंतु आजच्या काळात जेव्हा गोड बोलून किंवा वेगळ्या प्रकारे ट्विस्ट करून एखादी गोष्ट सांगितली जाते तेव्हा मात्र ती आपल्या हिताची असेलच असे नाही. टीव्ही वरील मालिकांतून नको त्या गोष्टी नकळत आपल्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच सत्य काय आहे हे आपणच तपासून घ्यायला हवे.

आपण सामान्य माणसे मात्र व्यवहारात बुद्धिभेद करणाऱ्या माणसांच्या वक्तृत्वाला भुलून आपल्या साधुसंतांनी सांगितलेल्या मौल्यवान गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. अशा माणसांच्या नास्तिक, पाखंडी विचारांचा स्वीकार करतो. आपल्याच चांगल्या गोष्टींवर टीका करू लागतो. त्यातून द्वेष तयार होतो. माणूस आपले नीतीधर्माचे आचरण सोडून देतो. क्षुद्र विकार, वासनांना बळी पडतो. काही रूढी, परंपरा कालबाह्य झाल्या असतील, काही गोष्टी चुकीच्याही असतील. पण सगळ्याच गोष्टी कालबाह्य किंवा टाकाऊ झालेल्या नसतात. अर्थात प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु त्यामुळे सामान्य माणसांची मात्र दिशाभूल होते, गोंधळ उडतो. म्हणूनच समर्थांनी आपल्या हितासाठी अशा विचारांना दूर सारून सत्य काय आहे ते जाणून घ्या असे सांगितले आहे.

स्वसंवाद 

१. संतांनी किंवा गुरूंनी सांगितले म्हणून मी आंधळेपणाने विश्वास ठेवतो, की समर्थांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या विवेकबुद्धीने ‘हितकारक गोष्टींचा शोध’ घेण्याचा प्रयत्न करतो?

२. महाभारतातील सूत्राप्रमाणे, माझे बोलणे केवळ वरवरचे ‘गोड’ असते की ते समोरच्या व्यक्तीच्या आणि माझ्या स्वतःच्या ‘परम हिताचे’ (सत्य) असते?

३. टीव्ही, मोबाईल किंवा समाजमाध्यमांवरील आकर्षक वक्तृत्वाला भुलून, मी माझ्या संस्कृतीतील चांगल्या आणि सात्त्विक विचारांकडे दुर्लक्ष तर करत नाहीये ना?

४. मनातल्या शंका दूर करून निःशंक होण्यासाठी मी व्यर्थ वाद घालतो, की एखाद्या अधिकारी व्यक्तीशी माझ्या आत्महितासाठी ‘हितकारक संवाद’ साधतो?

=====

 श्लोक क्र. ११२ – – 

जनीं सांगता ऐकता जन्म गेला ।

परी वाद वेवाद तैसा चि ठेला ।

उठे संशयो वाद हा दंभधारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ।।११२।।

अर्थ : अनेक वर्षांपासून जगात हिताच्या गोष्टी सांगितल्या आणि ऐकल्या जातात. पण एवढे होऊनही वादविवाद निर्माण करणारे मतभेद कायमच आहेत. संशयापोटी निर्माण होणारा वाद हा अहंकार वाढवणारा असतो. ज्या संवादातून शंका फिटून काही तत्व हाती लागते असा संवाद हितकारक असतो.

(ठेला – तसाच राहिला, दंभ – व्यर्थ अहंकार/अभिमान)

विवेचन : या श्लोकात मानवी स्वभाव आणि प्रवृत्तीवर समर्थांनी अचूक बोट ठेवले आहे. आपण अनेक वर्षांपासून चांगल्या हितकारक गोष्टी ऐकत आलो आणि सांगतही आलो. संतांनी समाजाच्या आणि आपल्या हितासाठी आपले सारे आयुष्य झिजवले. ग्रंथातून, प्रवचनातून आपले विचार आपल्यापर्यंत पोचवले. परंतु दुर्दैव हे आहे की एवढया सगळ्या खटाटोपानंतर देखील आपल्या शंका आणि वादाचे विषय कायम राहिले. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, मनाचे श्लोक, तुकाराम गाथा यासारख्या अनेक ग्रंथांना शेकडो वर्षांची परंपरा आहे. हे अक्षर वाङ्मय आहे. या ग्रंथांमध्ये एवढे ज्ञान आहे की खरे तर कोणत्याही शंकाच शिल्लक राहायला नको.

खरी ज्ञानी माणसे नम्र असतात पण मी विद्वान आहे या जाणिवेतून अहंकार जन्मतो. मला सगळेच माहिती आहे या जाणिवेतून संतांनी जे काही हितकारक सांगितले त्याबद्दल संशय निर्माण होतो. ईश्वर आहे हे कशावरून, पुनर्जन्माचा काही पुरावा आहे का, ईश्वराला कोणी पाहिले आहे का… वगैरे वगैरे अनंत गोष्टींबद्दल मानवी मनात संशय अनंत काळापासून आहे आणि तो तसाच राहणार आहे. शंका असणे रास्त आहे, चांगली गोष्ट आहे. पण एखाद्या अधिकारी माणसाकडून किंवा वर उल्लेख केलेल्या ग्रंथातून जेव्हा आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळते, त्यावेळी निःशंक मनाने ‘ राघवाच्या अनंत पंथावर ‘ चालण्यास सुरुवात करावी.

बऱ्याच माणसांची प्रवृत्ती अशी असते की संतांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा एखादी संशयाची सुई त्यांच्या मनात जास्त घर करून बसते. मग आपल्या हिताचे कळूनही त्यांना त्या मार्गाने जाण्याची बुद्धी होत नाही. अशा लोकांच्या बाबतीत ‘ पालथ्या घड्यावर पाणी ‘ ही म्हण सार्थ ठरते. सगळे समजते आहे पण पोकळ दंभ किंवा अहंकार त्यांना या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करतो. “मी जप करू? कीर्तनाला जाऊ? छे! छे! मी एवढा विद्वान! मला इतकी माहिती आहे! मग लोक काय म्हणतील? ” यासारख्या खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पना अशा व्यक्तींना परमार्थ मार्गावर चालण्यासाठी प्रतिबंध करतात.

परंतु समाजमान्यता असणाऱ्या काही विद्वानांनी बुद्धिभेद केला की सर्वसामान्य माणसे देखील गोंधळतात. मग अशी माणसे राम आणि कृष्ण यासारख्या वंदनीय महापुरुषांच्या चरित्रात देखील दोष दाखवतात. राम आणि कृष्णासारख्या महापुरुषांनी आपल्या जीवनकार्यातून कोणता महत्वाचा संदेश दिला आहे याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होते. या सगळ्या गोंधळात आपल्याला आपल्या आत्मतत्वाचा शोध घ्यायचा आहे ही मूळ गोष्ट ते विसरतात. वादविवाद कुठे होत नाहीत असे नाही पण जिथे मूळ तत्वाचा शोध घेण्यापेक्षा आपल्या अहंकाराला जास्त जोपासले जाते असा वाद काय कामाचा? ज्यातून काही जीवनोपयोगी तत्व गवसते आणि मन परमार्थ मार्गाकडे ओढ घेते असा सुखसंवाद महत्वाचा असेच समर्थांना यातून सांगायचे आहे.

स्वसंवाद

१. अनेक वर्षांपासून संतांचे विचार, ग्रंथ आणि निरूपण ‘ऐकून व वाचूनही’ माझे आयुष्य ‘पालथ्या घड्यावर पाणी’ या म्हणीसारखेच कोरडे राहिले आहे का?

२. “मी एवढा शिकलेला, मी नाम कसे घेऊ? ” अशा प्रकारच्या कुठल्यातरी पोकळ दंभामुळे (अहंकारामुळे) किंवा खोट्या प्रतिष्ठेमुळे मी स्वतःला आत्महितापासून दूर ठेवत नाहीये ना?

३. महापुरुषांच्या किंवा संतांच्या चरित्रातील आणि विचारांमधील केवळ ‘दोष’ शोधण्यात मी माझी बौद्धिक ऊर्जा वाया घालवतो, की त्यांच्याकडून ‘जीवनोपयोगी तत्त्व’ शिकण्याचा प्रयत्न करतो?

४. मनात शंका असणे स्वाभाविक आहे, पण ग्रंथांच्या वाचनातून किंवा अधिकारी व्यक्तींच्या ‘सुखसंवादातून’ उत्तर मिळाल्यावर, मी निःशंक मनाने भक्तीच्या मार्गावर चालण्यास सुरुवात करतो का?

– क्रमशः श्लोक १११ आणि ११२

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ काळ मोजणारे मंदिर.. – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ काळ मोजणारे मंदिर.. – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

“घड्याळाचा शोध लागण्याच्या कित्येक शतकं आधी,

अंतराळात डोकावणाऱ्या दुर्बिणी तयार होण्याच्याही आधी,

इतकंच काय, युरोपला एक वर्ष 365 आणि सव्वा दिवसांचं असतं हे कळण्याच्याही फार आधी,

 

भारताच्या दक्षिण टोकावर, जिथे समुद्र आणि आकाश एकमेकांना भेटतात, तिथे एका महान आश्चर्यकारक मंदिराचा उदय झाला.

ते म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर.

अनंत नावाच्या नागावर चिरनिद्रेत पहुडलेल्या त्या प्रभूचे मंदिर.

ते केवळ भक्तीचे ठिकाण नाही;

तो दगडात कोरलेला एक महान टाइम मशीन आहे!

 

भाग १. दिवस मोजणारे खांब

मंदिराच्या लांबलचक कॉरिडॉरमध्ये प्रवेश करा आणि पहा.

तुमच्या समोर 365 खांब दिमाखात उभे आहेत.

ते बोलत नाहीत, ते हलत नाहीत.

पण ते काळ मोजत आहेत.

रोज सकाळी जेव्हा पूर्वेला सूर्य उगवतो, तेव्हा त्याचा प्रकाश पूर्वेकडील प्रवेशद्वारातून आत येतो आणि दररोज एका खांबाला स्पर्श करतो.

एका दिवसाला एक खांब, असे ते खांब वर्षाचे 365 दिवस मोजतात.

– – पण, तिथे एक ‘सव्वा खांब’ आहे.

तो अगदी लहान आहे, लपलेला आहे.

तीन वर्षे तो खांब सावलीतच राहतो.

पण केवळ चौथ्या वर्षी, म्हणजेच लीप वर्षात, सूर्याची किरणे त्या खांबाला पूर्णपणे प्रकाशमान करतात.

एक हजार वर्षांपूर्वीच आपल्या पूर्वजांनी दगडात गणित करून ठेवले होते की सौर वर्ष केवळ 365 दिवसांचे नाही, तर त्यात अतिरिक्त 6 तास आहेत!

 

भाग २. प्रभूच्या चरणांना स्पर्श करणारा सूर्य

वर्षातून दोनदा सूर्य एक चमत्कार घडवतो.

– 22 डिसेंबर (हिवाळी संक्रांती): सूर्याची किरणे गर्भगृहात प्रवेश करतात आणि पहुडलेल्या पेरुमलच्या डाव्या पायावर पडतात.

– 21 जून (उन्हाळी संक्रांती): तोच सूर्यप्रकाश सरकतो आणि पेरुमलच्या उजव्या पायाला स्पर्श करतो.

– विषू (संपात दिन): ज्या दिवशी दिवस आणि रात्र समान असतात, त्या दिवशी सूर्यप्रकाश पेरुमलच्या अंगठ्यावर पडतो – ना डावीकडे, ना उजवीकडे, अगदी मध्यभागी!

यासाठी किती अचूक गणित लागले असेल याचा विचार करा.

– – ही केवळ भक्ती नाही; ही स्थलाकृति आणि खगोलशास्त्राच्या विज्ञानाची सर्वोच्च पातळी आहे!

 

भाग ३. दरवाजे नसलेल्या 49 खिडक्या

मंदिराच्या गोपुराकडे पहा.

त्याला सात मजले आहेत.

आपल्या पूर्वजांनी त्याची रचना पर्वतासारखी केली आहे.

.. तो तुमच्या मणक्याचा नकाशा आहे!

जे खाली आहे ते मूलाधार आहे, जे वर आहे ते सहस्रार आहे.

या सात मजल्यांवर, प्रत्येक मजल्यावर सात खिडक्या, अशा एकूण एकोणपन्नास खिडक्या आहेत.

पण या खिडक्यांना दरवाजे नाहीत, पडदे नाहीत, काच नाही.

त्या नेहमी उघड्याच असतात.

 

यामागचे तत्त्वज्ञान काय आहे?

जेव्हा मनुष्य ज्ञानामध्ये जागृत होतो, तेव्हा त्याच्या संवेदनांचे दरवाजे (49 दरवाजे) दरवाज्यांशिवाय उघडे असले पाहिजेत.

काहीही अडवले जाऊ नये, काहीही नाकारले जाऊ नये.

संपूर्ण जग जसे आहे तसे स्वागत करणारी ही एक जागरूकता आहे.

 

भाग ४. पावसातही न भिजणारे गर्भगृह

केरळमध्ये मुसळधार पाऊस पडतो तेव्हा वारा जोरात वाहतो.

गोपुरातील सर्व एकोणपन्नास खिडक्या उघड्या असूनही, पाण्याचा एक थेंबही गर्भगृहात प्रवेश करत नाही!

हे कसे शक्य आहे? मंदिराची रचना तशी आहे.

बाहेरील हवा आणि आतील हवा यांच्यात दाबाचा फरक निर्माण करून, आपल्या पूर्वजांनी ‘व्हॅक्यूम बॅरियर’ तयार केले.

ते पावसाला आत येऊ देत नाही.

आतील रहस्य: बाहेरच्या जगात कितीही संघर्षाचा पाऊस पडला तरी, तुमच्या आतले ‘चित्सभा’ (गर्भगृह) नेहमीच कोरडे आणि शांत राहिले पाहिजे – हेच हे मंदिर शिकवते.

 

भाग ५. साप हा तुमचा शत्रू नाही

गर्भगृहात, पद्मनाभ स्वामी आदिशेषावर पहुडलेले आहेत.

त्या नागाला पाच फणे आहेत.

तो प्रभूच्या चरणाशी नाही; तो प्रभूच्या संपूर्ण शरीराला धारण करून आहे.

आपल्याला शतकानुशतके काय शिकवले गेले? की ‘साप’ ही खाली गुंडाळलेली एक शक्ती आहे, आपण तिला दाबून वर आणले पाहिजे.

पण हे मंदिर एक वेगळे रहस्य सांगते:

– – साप हा तुमचा शत्रू नाही; तो तुमचा पाया आहे!

तुमचा मणका हाच तो सर्प आहे.

तुमची जागरूकता हाच तो प्रभू आहे.

केवळ जेव्हा तुम्ही तुमच्या मणक्याला (सापाला) शत्रू न मानता, त्यावर विश्वास ठेवून विसंबता, तेव्हाच तुमच्या आतले ते परम ज्ञान जागृत होईल.

 

भाग ६. आपल्या काळाचे साक्षीदार

१. जागृत मुत्सद्दी

23 सप्टेंबर 2025 च्या पहाटे शशी थरूर त्या मंदिरासमोर उभे होते.

ते भक्त म्हणून आले नव्हते; ते एक आधुनिक माणूस म्हणून आले होते.

सूर्य उगवताना आणि गोपुराच्या प्रत्येक खिडकीतून क्रमाक्रमाने प्रकाश आत येताना पाहून ते आश्चर्यचकित झाले.

ते म्हणाले:

“यासाठी आजच्या तंत्रज्ञानाची गरज नाही, आपल्या पूर्वजांचे अचूक गणितच पुरेसे आहे.

हा चमत्कार नाही, हे अचूकता (Precision) आहे! “

 

२. सत्याचा शोध घेणारा अधिकारी

डॉ. अलेक्झांडर जेकब, एक निवृत्त गुप्तचर अधिकारी आणि या मंदिराचा अनेक वर्षे अभ्यास केलेले एक ख्रिश्चन अधिकारी, यांनी एक प्रश्न विचारला… 

“युरोपला 1554 मध्येच कळले की एक वर्ष 365 आणि सव्वा दिवसांचे असते.

पण हजार वर्षांपूर्वीच ते या मंदिरात कोरलेले होते.

हे किती हिंदूंना माहित आहे? ” त्यांनी वेदनेने विचारले.

“हे मंदिर केवळ दगडांनी बनलेले नाही;

– – तो तुमच्या शरीराचा नकाशा आहे.

तुमचा मणका हाच सात मजली गोपुर आहे.

तुमचा श्वास हाच तो सूर्य आहे.

जर तुम्ही तुमच्या खिडक्या उघड्या ठेवून तुमच्या मणक्यावर विश्वास ठेवून विश्रांती घेतली, तर तुमच्या सभोवताली कितीही पाऊस पडला तरी, तुमच्या आतले गर्भगृह नेहमीच शांत आणि कोरडे राहील! ” 

☆

लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय सेनेचे पाच पांडव!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतीय सेनेचे पाच पांडव!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

☆

महाभारतात शंभर कौरवांचा पराभव करणारे सर्वच्या सर्व पाच पांडव एकाच आईच्या पोटी जन्मले नव्हते. युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे कुंतीचे तर नकुल आणि सहदेव हे माद्रीचे पुत्र होते.

परंतू आधुनिक महाभारतात अर्थात १९७१मध्ये पाकिस्तानी कौरवांविरोधात प्राणपणाने लढून विजयश्री खेचून आणणारे आपले हे पाच पांडव मात्र एकाच आईच्या पोटी जन्मले होते!

तो डोक्याने पहिल्यापासून बराचसा तापट पण अभ्यासात, खेळांत अतिशय वाकबगार होता. वडील लष्करी विभागात कनिष्ठ लिपिकाची नोकरी करीत इंग्रज आमदनीमध्ये. त्यामुळे या मुलाला ब्रिटीश आणि पुढे भारतीय लष्करी अधिकारी, त्यांचा रुबाब जवळून अनुभवता आला. डेहरादून येथे स्थापन झालेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (N. D. A.)मध्ये पहिल्याच तुकडीत लष्करी अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून हा नवतरुण त्याच्या अंगभूत कौशल्यांच्या बळावर गुणवत्तेवर निवडला गेला! त्याचे वडील आणि आई यांचा आनंदात गगनात मावेनासा झाला.

यथावकाश प्रशिक्षण सुरु झाले. आणि एक दुर्दैवी घटना घडली. एका अधिका-याने या नवोदित, प्रशिक्षणार्थी तुकडीतील एका गटाला जरा जास्तच शिक्षा दिली. त्याचा सूड म्हणून या तुकडीतील प्रशिक्षणार्थी तरुणांनी त्या अधिका-याच्या कार्यालयाची रात्री चोरून तिथे घुसून नासधूस केली. याचा तपास करताना अधिका-यांनी सर्व तुकडीवरच निलंबन कारवाई करण्याचे निश्चित केले. या गुन्ह्यात आपला कथानायक खरा नायक होता. पण आपल्यामुळे सर्वांचे नुकसान होऊ नये म्हणून याने सर्व दोष आपल्या शिरावर घेतला आणि अकादमीमधून निष्कासित अर्थात काढून टाकले जाण्याची शिक्षा स्वीकारली!

या धक्क्याने त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले! आई खूप दु:खी-कष्टी झाली. हा थोरला मुलगा होता. त्याच्या पाठीवर आणखी चार भाऊ आणि दोन बहिणी होत्या. थोरल्यावर कुटुंबाचा भार आणि आशा-आकांक्षा होत्या, पण त्याच्या या कृतीने सर्व झाकोळले गेले! पण म्हणून या मुलाच्या आईने हिंमत गमावली नाही. तिने मुलाच्या प्रामाणिकपणाचे कौतुकच केले. आणि त्या मुलानेही मग लष्करात भरती होण्याचे स्वप्न साकार करण्याच्या जिद्दी पायी ‘शिपाई’ म्हणून लष्करी जीवन अंगिकारण्याचा निर्णय घेतला. परंतु NDA मधून झालेले निलंबन यात मोठा अडथळा असल्याने सर्वं मार्ग बंद झालेले होते! पण एका चमत्कार घडला!

प्रेमकुमार यांनी इंग्रजी भाषेत उत्तम प्राविण्य संपादन केले होते. त्यांनी त्यांच्या इतर भावांना आणि मित्रांनाही इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न केला होता. एकेदिवशी प्रेमकुमार जळणासाठी लाकूडफाटा गोळा करण्यासाठी मित्रांसमवेत डोंगरावर गेलेले असताना चांगल्या इंग्रजीत मित्रांशी संवाद साधत असताना लष्करी वसाहतीच्या एका इंग्रज लष्करी अधिका-याने त्यांचे बोलणे ऐकले. आणि त्या सर्व मुलांना क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी आमंत्रित केले. त्या सामन्यात उत्तम कामगिरी केल्याने त्याची तिथल्या ब्रिटीश कमांडंट साहेबांशी परिचय करून देण्यात आला.

पुढे लष्करी जवानांची भरती निघाली. प्रेमकुमार यांचा अर्ज अर्थातच त्यांच्या आधीच्या प्रकरणामुळे नाकारण्यात आला होता, पण विशेष बाब म्हणून ब्रिटीश कमांडंट साहेबांनी त्यांची शिफारस केली आणि अशा रीतीने प्रेमकुमार कुकरेती शिपाई म्हणून का असेना अंगावर लष्करी गणवेश परिधान करते झाले! त्यांना गढवाल रेजिमेंट मिळाली. पण तेथील अधिका-यांनी प्रेमकुमार यांना त्यांची क्रीडा पार्श्वभूमी, इंग्रजी संभाषण कला आणि अधिका-याला साजेसे नेतृत्वगुण लक्षात घेऊन त्यांना कुठल्याही बटालियनमध्ये न पाठवता रेजिमेंटमध्येच ठेवले. पण येथील जवान प्रेमकुमार यांना त्यांचे सहकारी जवान त्यांच्या पूर्वीच्या आयुष्यावरून चिडवत असत. यावर गांभीर्याने विचार करून प्रेमकुमार यांनी लष्करी अधिकारी होण्याचे मनावर घेतले. खूपच कष्ट घेत त्यांनी शेवटी IMA Indian Military Academy मध्ये प्रवेश मिळवला आणि ते अधिकारी बनले! त्यांना गढवाल रेजिमेंटमध्येच सेकंड लेफ्टनंट म्हणून नेमणूक मिळाली. त्यांचे NDA तुकडीतील प्रशिक्षणार्थी मित्र आता त्यांच्यापुढे चार वर्षे वरिष्ठ होते. त्यांपैकीच एका अधिका-याने कॅप्टन नय्यर जे त्यावेळी रेजिमेंटचे Adjutant होते, त्यांनी खास परवानगी घेत, स्वत: जाऊन प्रेमकुमार यांचे रेजिमेंटमध्ये स्वागत केले! एक चक्र पूर्ण झाले होते!

क्रिकेटचे उत्तम खेळाडू असल्याने प्रेमकुमार कुकरेती यांची भारतीय लष्कराच्या क्रिकेट संघात निवड झाली होते, ज्या संघाचे कर्णधार होते कर्नल हेमंत अधिकारी! प्रेमकुमार यांना राष्ट्रीय संघातून खेळण्याची सुवर्णसंधी मिळू शकली असती. पण जिथे धोका अधिक आहे, त्या भागात नेमणूक असल्यास अधिकचे वेतन, भत्ते मिळतात आणि शिवाय शौर्य गाजवण्याची इच्छा असल्याने प्रेमकुमार यांनी ही संधी नाकारली आणि ते लढाईवर रुजू झाले. १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात त्यांनी शौर्य गाजवले! १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात त्यांनी राजपूत बटालियनची धुरा सांभाळली!

त्या आधी त्यांनी आपल्या चारही भावांना लष्करात भरती होण्याची प्रेरणा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले आणि ते चारही बंधू लष्कराच्या विविध विभागांत रुजूही झाले. एकाच आई-बापापोटी जन्मलेले पाच सैनिक भारतीय सैन्यात एकाचवेळी कार्यरत होते, ही एक जगावेगळी बाब ठरली!

या बहादूर सैनिकांची नावे आहेत मेजर जगदीश प्रसाद, मेजर धर्मलाल, लेफ्टनंट कर्नल राकेश, नायब सुबेदार सोहनलाल!

१९७१मध्ये युद्धाचे ढग जमा होऊ लागले होते. त्यावेळी हे पाचही कुकरेती बंधू लष्करात सेवेत होते. थोरला तर आघाडीवर तैनात होता अधिकारी म्हणून. बाकी सुट्टीवर घरी आलेले होते. त्यांच्या मातोश्रींनी या चौघांच्याही कपाळांवर कुंकूम तिलक रेखला आणि सर्वांना आशीर्वाद देत सीमेवर भारतमातेच्या रक्षणासाठी मार्गस्थ केले!

सीमेवर असलेल्या मेजर जनरल प्रेमकुमार यांचे पत्र घरी पोहोचले त्यात ते लिहितात, ”माझी काळजी करू नका. शत्रू लबाड असला तरी आपले जवानांचा निश्चय अभेद्य आहे. आम्ही चिखलातून, जंगलातून, गोळीबाराच्या वर्षावातून पुढे पुढे चाललेलो आहोत… आमचे प्रत्येक पाऊल विजयाच्या दिशेने पडते आहे… घरी आमच्या सर्व मुलांना, भाच्यांना, पुतण्यांना सांगा… तुमचे सर्व काका, तुमचे मामा, तुमचे वडील शत्रूला नामोहरम करण्यात व्यग्र आहेत… आम्ही इतिहास घडवतो आहोत! ”

लेफ्टनंट कर्नल राकेश कुकरेती यांच्या तुकडीवर पाकिस्तानी सेनेच्या मागे जाऊन त्यांच्यावर हल्ला चढवण्याची मोठी जोखमीची कामगिरी सोपवण्यात आली. आपले सैनिक सलग तीन दिवस विना अन्न, पाण्याचे नव्वद पेक्षा अधिक किलोमीटर्सचे अंतर पायी चालले… वरून पाकिस्तानी मारा होत होता, आपले हवाईदल पाकिस्तानवर तुफान हल्ला करीत होते… सर्वत्र प्रचंड धोका होता. त्याही स्थितीत आपल्या थोरल्या भावाला राकेश साहेबांनी रेडीओ संदेश करून गोळीबाराचा आवाज ऐकवला होता आणि अतिशय शांतपणे म्हणाले होते, विजय आपलाच होईल. आणि तसेच झाले. राकेश साहेबांच्या तुकडीने उपाशीपोटी असूनही पाकिस्तानचा कडवा प्रतिकार मोडून काढला.

दुस-या आघडीवर लढणा-या नायब सुबेदार सोहनलाल कुकरेती यांनी सुद्धा तुफान कामगिरी बजावली. त्यांची चौकी पाकिस्तानी आक्रमणाने पुरती घेरली गेली होती. रात्रीचा समय होता. मदतीसाठी दुसरी तुकडी येण्यास काही समस्या होती. या सैनिकांनी रात्रभर ती छोटी चौकी लढवत ठेवली… पाकिस्तान्यांना पुढे येऊ दिलेच नाही. सकाळी मदत पथक आल्यावरपाकिस्तानी पळून जाण्यात यशस्वी ठरले!

उर्वरीत दोघे बंधू मेजर जगदीश प्रसाद आणि मेजर धर्मलाल Corps of Electronics and Mechanical Engineers (EME)मध्ये कर्तव्यावर असताना प्रत्यक्ष सीमेवर तैनात राहून लढणा-या सैनिकांना साहाय्य पुरवीत होते.

१६ डिसेंबर, १९७१ रोजी भारताचा विजय जाहीर झाला. कुकरेती कुटुंबातील हे पाच पांडव विजयी होऊनच रणभूमीवरून माघारी आले होते… मातोश्री त्यांच्या स्वागतास आरतीचे ताट घेऊन उंब-याबाहेर उभ्या होत्या… त्या म्हणाल्या… माझ्या पोरांनी भारतमातेची शान राखली! धन्य ही माता आणि धन्य तिची कूस… जिने एक नव्हे, दोन नव्हे, पाच पाच शूर पुत्र जन्मास घातले!

सर्वांत थोरले प्रेमलाल कुकरेती आसाम रायफल्ससे डायरेक्टर जनरल पदी पोहोचले आणि त्यांना सेना मेडल ने सन्मानित करण्यात आले. सर्वांत धाकटे राकेश कुकरेती लेफ्टनंट कर्नल बनले आणि त्यांनी शौर्य चक्र प्राप्त केले. एवढेच नव्हे तर राकेश कुकरेती साहेबांचे चिरंजीवही, कार्तिकेय कुकरेती सेनेत लेफ्टनंट कर्नल बनले आणि त्यांनीही सेना मेडल पटकावले. दुसरे अर्थ कुकरेतीही लेफ्टनंट कर्नल असून त्यांना Mention in Dispatches हे कौतुक पदक प्राप्त झालेले आहे. जय हिंद.. जय हिंद की सेना!

भारतच्या लष्करी इतिहासात कुकरेती बंधू ही मानाची पाच पानेच आहेत, असे अभिमानाने म्हणावेसे वाटते. त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक तरुणांनी सेनेच्या सेवेचा ध्यास घेतला, ही उल्लेखनीय आहे! जय हिंद… जय हिंद की सेना..

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अनंत स्तोत्र ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ अनंत स्तोत्र ☆  डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆

मार्ग दावी रे अनंता | आज येथे ऐसे भ्रमिता ||

अंधःकारी बुडून जाता | दिशा काही दिसेना ||१||

*

कोण आम्ही कोठुनि आलो | आज येथे ऐसे अडलो ||

काय फळाची आशा राहो | बूज ती राहीना ||२||

*

धरणीखाली बीज सापडे | जळे वेढुनि त्यास टाकिले ||

जगतासाठी जीवन दिधले | तुझियाचि कृपे ||३||

*

बघता बघता अंकुर आला | डोकावूनिया पाहू लागला ||

मार्ग आपुला शोधु लागला | सूर्यप्रकाशी ||४||

*

दिधले जीवन आदिपासुनी | ठेवुनि त्याची जाण ही मनी ||

घट्ट धरुनिया धरणी ठेवी | मुळीया रूपे ||५||

*

परोपकारी धरणीचा हा | वसा घेतला वृक्षलतांनी ||

फळे अर्पुनी जगतासाठी | कृतार्थही जाहले ||६||

*

दिशा दाविशी रे अनंता | तृणांकुरांना पशुपक्षांना ||

पोरकाच मग मानवचि का | चाचपडे तिमिरी||७||

*

कळत असूनि असा राहिलो | वळता नचही ताठ राहिलो ||

स्वार्था धरुनी अंध जाहलो | असा या जगी ||८||

*

परमार्थाची आस लागली | मोहाची पण भूलचि पडली ||

मजविण दृष्टी आड जाहली | काही कळेना ||९||

*

धाव धाव रे भगवंता | कृपाळू होऊन अनंता |

सोडव यातुनिया निशिकांता | तेजा तव दावून ||१०||

☆

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दामोदर लीला ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ दामोदर लीला ☆ शालिनी जोशी ☆

रामावतारात वानरानी श्रीरामांची खूप सेवा केली होती. तेच वानर कृष्णावतारात गोप बनून त्यांचे सवंगडी झाले. भगवंत कधी उपकार विसरत नाहीत. दही, दूध खायला घालून श्रीकृष्णाने त्यांना पुष्ट केले. कोणाच्यातरी घरी लपून छपून जायच शिंकाळ्यातील दही दुधाचे कुंभ फस्त करून प्रसार व्हायचे. हा त्यांचा रोजचा कार्यक्रम होता. आजचा दिवस श्रीकृष्णाच्या घरी ठरला. आपले काम करून मंडळी गायब ही झाली.

हे यशोदेने पाहिले. चोरी करणाऱ्या कृष्णाला बांधून ठेवावे, म्हणून काठी घेऊन धावली. श्रीकृष्ण पुढे आणि काठी मागे अशी पळापळ सुरू झाली. पण यशोदा श्रीकृष्णाला धरू शकली नाही. काठी म्हणजे अहंकार, तो आहे तोपर्यंत भगवंत प्राप्ती नाही. शेवटी दमून यशोदेने काठी फेकली आणि श्रीकृष्ण तिला बिलगला. पण चोरीची सवय लागू नये म्हणून ती त्याला उखळाशी बांधू लागली. अहो आश्चर्य! दोरी दोन बोटे कमी पडू लागली. कितीही एकमेकाला बांधून वाढवली तरी दोन बोटे कमीच. त्या परब्रम्हाला कोण बांधणार? बांधण्याचा स्वभावच दोरीने सोडला. घरातल्या सगळ्या दोऱ्या संपल्या. गोपी थक्क झाल्या. पण यशोदेची फजिती पाहून हसूंही लागल्या. दोन बोटांचे अंतर म्हणजे अहंता आणि ममता. ही ज्याच्यात आहेत तो भगवंताला बांधू शकत नाही. त्रिगुणात्मक दोरीचा येथे उपयोग नाही. तेथे प्रेम रज्जूच हवा. यशोदा घामाने चिंब झाली. भगवंतांना तिची दया आली आणि स्वेच्छेने बांधून घेतले. पोटावरून दोरी बांधली. म्हणून दामोदर झाला. दाम म्हणजे दोरी. आईला प्रसन्न करण्यासाठी स्वतः बंधनात अडकला. दोरीने बांधला गेला. त्याला बांधून यशोदा स्वयंपाक घरात गेली. पण लक्ष कृष्णाकडे होते. आपण केलेले बरोबर का चूक या संभ्रमात पडली.

इकडे कृष्ण बंधनात आणि चारी बाजूने गोप सवंगडी जमलेले. पण कृष्ण वेगळ्याच विचारात होता. कृष्ण उखळाला ओढत अंगणात आला. अंगणातील अमलार्जुन वृक्षांच्या मधून जाऊ लागला. उखळ आडवे होऊन झाडात अडकले. कृष्णाने जोर लावताच दोन्ही रुक्ष उन्मळून पडले. तेथे दोन तेजस्वी पुरुष प्रकट झाले. ते पूर्वजन्मीचे राजा कुबेराचे पुत्र नलकुबेर आणि मणिरत्न होते. नारदांच्या शापाने वृक्षावतार झाले होते. कुबेराच्या धनाचा त्यांना मद झाला. म्हणून नारादाने त्यांना शाप दिलेला होता. भगवंताने दिलेल्या शरीराचा दुरुपयोग आत्मघाताला कारण होतो. तसेच झाले. पण भगवंताच्या चरणस्पर्शानेच त्यांचा उद्धार झाला. देवाने आपण बंधन स्विकारून पश्चाताप झालेल्या त्यांना बंध मुक्त केले.

झाड पडल्याचा मोठा आवाज ऐकून सर्व जमले. कृष्ण वाचल्याचे पाहून सर्वांना आनंद झाला. कृष्ण नंदाला बिलगला. मी तुमचा मुलगा आहे असे कृष्णाने आपल्याला म्हणावे, ही नंदांची इच्छा कृष्णाने पूर्ण केली. आणि आईला सांगितले मी तुझे प्रेमाचे बंधन कधीच विसरणार नाही. त्या बंधनात राहणेच पसंत करेन. देवाला प्रेमरसच आवडतो. तो इतर नऊ रसांपेक्षा श्रेष्ठ. हेच दामोदर लीलेचे फलीत.

कृष्णार्पणमस्तु

 

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सोलापुरातील राणी लक्ष्मीबाई मार्केट… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? इंद्रधनुष्य ?

☆ सोलापुरातील राणी लक्ष्मीबाई मार्केट… ☆ सुश्री शीला पतकी ☆

सोलापुरातील राणी लक्ष्मीबाई मार्केट  – – अर्थात लक्ष्मी मंडई 

सोलापूरकरांचे सर्वात आवडते ठिकाण म्हणजे लक्ष्मी मार्केट या मार्केटचे पूर्वीचे नाव राणी विक्टोरिया मंडई असे होते पण साठ सालानंतर याचे नामकरण राणी लक्ष्मीबाई मंडई असे झाले. गुलामगिरीच्या मुक्ततेला तेरा वर्षे लागली. असो मार्केटची मूळ इमारत पूर्णतः दगडी असून वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांसाठी असणारे ओटे सुद्धा दगडी आहेत. पण आता मात्र दुकानांच्या भाऊ गर्दीत मंडईचे मूळ स्वरूप हरवून गेले आहे.

मंडईतप्रवेश करताना किराणा मालाची भुसार मालाची दुकानं लागत असत आजही ती दुकाने तिथेच आहेत. दुकानाच्या आत मध्ये फळीच्या चौकटीवर बसलेला दुकानदार त्याच्यासमोर ठेवलेल्या पाट्या पोती धान्याने भरलेली असत गिऱ्हाईक त्याच्यासमोर उभारून खरेदी करत असे. लक्ष्मी मार्केटच्या मूळ बिल्डिंग समोरचा भाग नारळ पूजा समान इत्यादीच्या दुकानाने व्यापलेला आहे कॉर्नरच्या बाजूला अजूनही पानाच्या दुरड्या घेऊन बसलेले लोक असतात त्यांच्या दुरड्यामध्ये असलेली विड्याची पाने अत्यंत आकर्षक पद्धतीने मांडलेली असतात एका ट्रे सारख्या कप्प्यात कापडी पिशव्या सुपार्‍या चुन्याच्या डब्या कातडबी इत्यादी साहित्य मिळते त्या पानाच्या टोकऱ्या व त्याच्या मागे पान विक्रेता उभा. आम्ही लहानपणी पान विकत घेत होतो… म्हणजे घरात काही समारंभ वगैरे असेल तर.. एक आण्याला दोन आण्याला शंभर पाने मिळत व एक पैशाला चुन्याची डबी आता त्या किमती अवघड आहे सांगणे.

पानाच्या बाजारचा कॉर्नर संपला की त्याला जोडून बागवानांचे राज्य सुरू असंख्य बागवान बंधूंची फळांची दुकाने मांडलेली ती वंशपरंपरागत चालू आहेत. दुकानाच्या समोरची जागा उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगडाने व्यापलेले असते असंख्य हिरवीगार कलिंगडे… लहान मोठे वर्गीकरण केलेले… त्या कलिंगडाच्या एका ढिगात वरच्या बाजूला ठेवलेला त्याच्यावर एक भला मोठा सुरा. कलिंगडे खरेदी करताना बागवान हातामध्ये कलिंगड घेऊन त्याला थापटून कानाजवळ नेतो आणि खसखन त्याच्या पोटात सुरी खूपसून एक चीर पाडतो.. गुडघ्यामध्ये धरून गिऱ्हाईकाला ते लाल आहे दाखवतो… घरी आल्यानंतर त्याचा रंग फिकट लाल असल्याचे जाणवते… ही हुशारी त्या बागवानांचीच होती. नेटाने धंदा करणारी ती तरुण पोरे आजच्या पिढीला ही आदर्श आहेत दिवसभर त्या ढीगाऱ्या पाशी ते बसूनच असत.

फळवाल्यांच्या मधून आडव्या बोळातन गेला उजव्या बाजूला बटाटे कांदे वांगे, भोपळा त्यांचे मोठे मार्केट त्याच कोपऱ्यावर डाव्या बाजूला एखादी लाकडी चौकट ठेवून त्याच्यावर फडके अंथरून कोथिंबीर आलं मिरची खोबऱ्याचे तुकडे विकणारी मंडळी! बरोबर त्याच्यासमोर डाव्या बाजूला कांदा लसूण चे कट्टे पिरॅमिड सारखा लावलेला कांदा, कांदा सुंदर आहे हे दर्शवतो लसणाच्या पांढऱ्या शुभ्र ढिगाने कांद्याचे गुलाबी पण ही वाढते.

मग प्रत्यक्ष आतल्या भाजी मंडईत आपण येतो तिथल्या अनेक ओट्यावरती कोबी फ्लॉवर काकड्या ढब्बू मिरची पडवळ गोवारी वांगी असे ढीग असतात. मटकी साठी मात्र स्वतंत्र दालनच असते… मूग मटकी हरभरा वाटाणा अशा कडधान्याच्या स्वतंत्र टोपल्या भरलेल्या दरबारासारख्या असतात मटकीचा पांढरा स्वच्छहिमालय पर्वतासारखा ढीग.. बाजूला कागद आणि वर बांधलेला दोरा… तराजूत मटकी मोजून कागदात बांधून दोरा गुंडाळण्याचे त्याचे कसब आणि घाई आजही डोळ्यासमोर आहे…..!

उजव्या हाताचे ओटे पालेभाज्यांचे! असंख्य पालेभाज्यांचे ढिगारे, भरायच्या मिरच्या कडवंच्या लसणाची पात हे त्या ओट्यावर उपलब्ध असे… ‘! आता त्याच्यापुढे आणखीन मार्केट गेले आहे पण ते अत्यंत अस्वच्छ असते आतल्या मार्केटच्या एका बाजूला लिंबाने आपला वेगळाच पक्ष स्थापन केलेला असतो. तिथे फक्त लिंबू म्हणजे लिंबूच मिळतं लिंबा मध्ये असलेल्या आणि आपल्या तयार न होणाऱ्या सी विटामिन चे वैशिष्ट्य दाखवणारे पिवळ्या धमक आणि हिरव्यागार लहानांपासून मोठ्यापर्यंत अशा लिंबाच्या ढिगार्‍याने सजलेले तेओटे म्हणजे हिरव्या बांगड्या भरून हळदीची साडी नेसलेल्या नवविवाहीते सारखेच सजलेले असतात.

त्याच्या बाजूचे चार पाच ओटे म्हणजे खतरनाक… हो हो सोलापुरी भाषेत खतरनाक..! तांबडी मिरची मसाला तिखट आणि मसाल्याचेसर्व पदार्थ आकर्षक पद्धतीने मांडलेले असतात त्या ओट्यांच्या भोवती जाणं म्हणजे एक तर नाकाला रुमाल धरून जा किंवा त्याच रूमालाने नाक पुसत पुसत शिंकांनी हैराण होऊन या. मिरची वाल्याला मात्र काहीच होत नाही तो शांतपणे मिरचीचे ढिगाऱ्यात हात घालून ते ढिगारे वर खाली करत असतो तिथे बायकांची गर्दी जास्त असते आणि असायची सुद्धा कारण तो प्रांत बायकांचा

आता परत आलो त्या मार्गाने बाहेर पडलोच तर पुन्हा काही उंची वरची दुकाने मसाला सामान, टागून ठेवलेले भोपळे कोहाळे त्याच्यापुढे जाऊन उजवीकडून बाहेर पडलात की कांदा बटाटा टोमॅटो इत्यादीची घाऊक दुकाने हॉटेल व्यवसाय लागणारा भाजीपाला आणि आजही घेतला जातो. त्याच्यापुढे वरच्या चौकाकडे निघालात की जुन्या हत्यार सामानाची दुकाने लागतात त्यात खुरप कात्री सुरे अडकिते. ते बाग कापायच्या मोठ्या कात्र्या अशा लोखंडी सामानाचे दुकान लागते रस्त्यावरच असे मांडलेले त्याला वळसा घेऊन पुन्हा मंडईच्या दिशेने आलात तेथे भाजी घेऊन बसलेले शेतकरी आढळतात त्यामध्ये काकड्या कणसेंचा आवळे चीगुर हिरव्यागार चिंचा मुळे इत्यादी अस्सल भाजीचा गावरान नमुना तरटावर किंवा काळपट फडक्यावर मांडलेला असतो. इथे मात्र भाजी ढिगार्‍यावर विकत मिळत असे त्याला खुत्ते हा शब्दही आहे आणि आजही तिथे तशीच भाजी मिळते. इथून पुन्हा मार्केटच्या बाहेर पडायच्या रस्त्यावर डाव्या बाजूला फक्त केळी वाल्यांची जागा आजही आजही पिंपळ तसाच उभा आहे त्याच्या खालचा हनुमान भाजीच्या पिशव्या उचलण्याचे बळ देतो आहे. मार्केट मधील सर्व मंडळी त्याची पूजा करतात रुईच्या पानांचा हार असतो शेंद्राने वर्षातून एकदा तो रंगला जातो ती जागा मात्र फक्त त्याची आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे तो प्रतीकच आहे. हिंदू असो मुसलमान असो हनुमानावर सर्वांची श्रद्धा आहे. हनुमानाच्या समोर उभे राहिलो तर उजव्या हाताला आजही माठा खालचे स्टॅन्ड म्हणजे तिवया दोऱ्याचे शिंके कुलपाच्या किल्ल्यावाली सांडशी चिमटे लोखंडे पाट्या कढई छोटे तवे अशा लोखंडी वस्तू घेऊन बसलेल्या बाया आढळतात. त्याच्याच बाजूला किल्ल्याचे ढीगारे घेऊन बसलेले कुलूप वाले दिसतात आजही तुमचे न उघडणारे कुलूप तिथे उघडून मिळते ह्याला म्हणतात कौशल्य प्रधान एज्युकेशन! केरसुण्या टोपल्या दुरड्या सुपल्या सुप हे विकणाऱ्या बुरुडांची दुकान आहेत तिथेच आहेत मोठे मोठे बांबू ही उभे असतात त्याच्यासमोर उभे राहिलोत की सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन आजही घडते किंबहुना आज ते अधिक चांगले घडते कारण तिथला परिसर व तिथे एक मोठे गेट बांधण्यात आलेले आहे. त्याच लाईनमध्ये सरळ कुंड्या मातीचे डेरे पणत्या परळ खुजे विकणाऱ्या लोकांची दुकाने रस्त्यापर्यंत लावलेले होती आणि आजही आहेत पाठीमागे त्यांची पत्र्याची घरे आहेत आणि तेथून पुढे मात्र जुन्या सामानाची दुकाने लागलेले असतात ते सारं आजही आला तरी जसेच्या तसे दिसेल…. म्हणजे सार्वजनिक संडास बाथरूम महापालिकेने बांधले आहे एवढं सोडलं तर बाकी सारंच आहे तसंच आहे तो परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न महापालिका करते पण ते अवघड आहे 

पूर्वी मार्केट मधील सगळे लिलाव त्या पिंपळाच्या झाडाखाली व्हायचे त्यामुळे टोपले वाल्या बायकांची तिथे वर्दळ असायची लिलाव झालेला माल डोक्यावर वाहून नेणे त्यांचे काम त्यापेक्षा वेगळी व्यवस्था म्हणजे छोटा हत्ती रिक्षा वगैरे काही नव्हते त्यामुळे त्या लोकांना काम मिळत होते.

आता मार्केटच्या आजूबाजूला खूप वर्दळ झाली आहे पण भाजी विक्रीच्या जागा जश्याच्या तशाच आहेत. अगदी दहा पंधरा वर्षांनी आलेला माणूस सुद्धा त्याच जागेवर पुन्हा तीच भाजी खरेदी करू शकतो. त्यात काही फरक नाही भाजीचे लिलाव मात्र आता संपले. ते आता व्यापारी यार्डात होतात. फळबाजारच्या पुढच्या बाजूला पालेभाज्याच्या ढिगार्‍याचे लिलाव आजही चालू असतात आणि किरकोळ विक्री सुद्धा चालू असते. मार्केटचे रेट सकाळपासून दुपारपर्यंत बदलत जातात संध्याकाळी हा भाव अगदीच पडलेला असतो गरीब जनता संध्याकाळी भाजी खरेदी करून घेऊन जात असे

लहानपणी आम्ही लक्ष्मी मार्केटमध्ये भाजी खरेदीला जात असू आठ आण्यामध्ये पिशवी गच्च भरून भाजी येत होती शिवाय एखाद्या पैशाची चिंच विकत घेऊन ती खात खात आम्ही घरी परतत असू.

लक्ष्मी मंडईत फिरून आलात तर भाज्यांचे वैभव त्या काळातही भुरळ पडणारे आणि आजही!

विविध भाज्यांच्या विक्रेत्यांचे ते आवाज…. ” लोटक्यात उड्या मारायची वांगी “… ” लालबुंट तमाटे… हे ओरडणं “पालक शेपू मेथी धा पैसे धा पैसे “हा बेंबीच्या देठा पासून आलेला आवाज… पेंड्या हातात घेऊन नाचवणे.. आजही स्मरणात आहे…!

वर्षानुवर्षे त्या मंडईत गेल्यामुळे सगळ्या विक्रेत्यांशी तयार झालेल नातं हे वेगळंच आहे अगदी मुस्लिम असलेला बागवान सुद्धा “लय दिन मे आप आये नही ताई सब ठीक तो आहे ना? “अशी प्रेमाने चौकशी करतो. कुणाशी तरी काका मामाचं नातं जुळतं कुणीतरी म्हणतात “तुमचीच वाट बघत होतो किती उशिरा आलाव

तुमच्यासाठी कडव्यांच्या बाजूला काढून ठेवल्यात बघा “अशी प्रेमळ वाक्य ही ऐकू येतात. भाजी हे केवळ भाजी विकत घेण्याचे ठिकाण नाही तर माणसा माणसात हिरवकंच नातं तयार करणारी ती छान जागा आहे. किती दिवसांनी तुम्ही गेलात तितक्याच कोवळीकेने तुम्हाला हाका मारतील. ” मॅडम या की वांगी लय चवदार आहेत आपल्या मळ्यातली आहेत “

किंवा आंबे वाला बागवान म्हणतो,.. ” ताई तुम्हारे लिए बाजू मे काढ के रखे है, देखो आज आम बहुत अच्छा है लेके जाओच पैसा आम खाने के बाद कल देना ” ही वाक्य आजही मंडईत ऐकू येतात ही सोलापूरची खासियत आहे. हा आपलेपणा जपणार एकमेव गाव आहे…. पाण्याचा कोरडेपणा असेल पण नात्यातला हा ओलावा मात्र आजही टिकून आहे…! पिशवीत आग्रहान चार काड्या जास्त भाजी भरून देणारी माणसं आजही या मंडईत आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या भुकेल्या पोराला, म्हाताऱ्या माणसाला दोन केळी हातात ठेवणारा भाजीवाला दिसतो.. खेडेगावातून आलेल्या माणसाला भाकरी खाताना आपल्या ढीगातली काकडी जेवायला देणारा भाजीवाला इथेच भेटतो.

सोलापुरात काही नसलंतरौ माणुसकीला मात्र ऊणेपण नाही हेच खरं पैसा खूप नसतानाही समृद्ध असलेले गाव म्हणजे सोलापूर!

ॲमेझॉन वरून ऑर्डर करून कितीही चांगली भाजी येऊ द्या किंवा एखाद्या मॉल मधील आकर्षक पद्धतीने मांडलेली भाजी असू द्या लक्ष्मी मार्केटला जाऊन विकत आणलेल्या, घासाघिस करून चार आणे स्वस्त करून आणलेल्या त्या भाजीची चवच वेगळी कारण त्यात भाजी विकणाऱ्याची माया असते, संवाद असतो, कधी कधी वाद सुद्धा असतो अशीआंबट गोड अविट गोडीची चव त्या भाजीला असते.

मग काय मंडळी चला तर मग लक्ष्मी मार्केटचा फेरफटका मारूयात.. काय म्हणालात या लेखामुळे फेरफटका मारून झाला. ठीक आहे पण उद्या सकाळी मात्र उठून पिशवी हातात घेऊन थेट लक्ष्मी मार्केटला निघायचं बरं..! परगावच्या मंडळींना लेख वाचून फेरफटका मारून आल्याचा फील नक्कीच आला असेल चला तर मग लक्ष्मी मंडईला… निघताय ना?

 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “क्रिकेटच्या भांडणातून जन्माला आलेले “वंदे मातरम्” – मूळ इंग्लिश लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ अनुवादक – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “क्रिकेटच्या भांडणातून जन्माला आलेले “वंदे मातरम्” – मूळ इंग्लिश लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ अनुवादक – श्री मोहन निमोणकर ☆

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय

आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल की ” वंदे मातरम ” या गाण्याचा जन्म क्रिकेट ग्राउंड वरील एका भांडणामधून झालाय.

सुमारे 145 वर्षांपूर्वी, प. बंगाल मधील बेहरामपूर येथील बर्रॅक चौकातील (आता चेस्कवर फील्ड)एका मैदानावर झालेल्या भांडणामुळे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना हे देशभक्तीपर गीत लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. त्या दिवशी जर इंग्रज कर्नल डफीन याने त्या क्रिकेट मॅचमध्ये बंकीमबाबूंवर हल्ला केला नसता तर “वंदे मातरम ” कधीच लिहिले गेले नसते.

१५ डिसेंबर १८७३ची संध्याकाळ.

तेव्हा मुर्शिदाबाद जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर असलेले बंकिमचंद्र चटर्जी पालखीतून घरी परतत होते. अनवधानाने पालखीवाल्यांनी जवळचा रस्ता म्हणून त्या क्रिकेटच्या ग्राउंडमधून पालखी नेली, आणि खेळात अडथळा होईल असा शॉर्टकट मैदानातून घेतला. त्यामुळे साहजिकच खेळामध्ये अडथळा आला.

याचा राग आल्याने बेहरामपूर लष्कराचा अधिकारी असलेला संघाचा कॅप्टन कर्नल डफिनने खेळ थांबवून लगेचच पालखी थांबवली, बंकिमबाबूंना बाहेर खेचले आणि त्यांना ४-५ फटके मारले.

हा प्रकार बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींसमोर घडला. त्या व्यक्तींमध्ये प्रिन्सिपॉल रॉबर्ट हॅन्ड, रेव्ह. बारलो, न्यायमूर्ती बेनरबीज, लालगोळ्याचे राजा जोगेंद्र नारायण रे, दुर्गाचरण भट्टाचार्य आणि इतर बऱ्याच इंग्रजी आणि भारतीय प्रतिष्ठित व्यक्ती होत्या.

अपमानाचा बदला – न्यायालयात लढा

बंकिमबाबून्नी कोर्टात केस दाखल केली आणि या अपमानाचा न्याय मागितला.

16 डिसेंबर 1873 रोजी त्यांनी कर्नल डफीन विरुद्ध मुर्शिदाबाद येथे जिल्हा न्यायाधीश श्री विंटर यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली. प्रत्यक्ष घटना बघितलेल्यांना साक्षीदार केले गेले. परंतु बऱ्याच इंग्रज अधिकाऱ्यांनी असा काही प्रसंग घडल्याचे अमान्य केले. पण प्रिन्सिपॉल रॉबर्ट हॅन्ड, राजा जोगेंद्र नारायण रे आणि दुर्गाचरण भट्टाचार्य यांनी बंकिंगबाबूंच्या बाजूने साक्ष दिली.

पुढची तारीख 12 जानेवारी 1874 ठरली.

त्या सकाळी हजारो भारतीय आणि इंग्रज प्रेक्षक कोर्टात जमले. केस चालू असताना, न्यायाधीश बेन ब्रिज यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या खोलीत बोलावून घेतले आणि केस मागे घ्यायची विनंती केली. सुरुवातीला बंकिमबाबुनी नकार दिला पण नंतर एका अटीवर ते तयार झाले, ‘ ‘ जर कर्नल डफीनने सार्वजनिक माफी मागितली तर मी केस मागे घेतो. ’ अर्थातच कर्नल डफीनने कोर्टात हाताची घडी घालून गुपचूप पणे माफी मागितली.

भारतीय तरुणांनी हशा टाळ्या आणि जयजयकाराने कोर्ट दुमदुमून टाकले. इंग्रज अधिकारी कोर्टाच्या या निर्णयाने संतापले आणि त्यांनी बंकिमबाबूंचा खून करण्याची योजना आखली. राजा जोगेंद्र नारायण रे यांना हे समजताच त्यांनी बंकिमबाबूंना लालगोला येथे बोलावून घेतले. तेथे ते जानेवारी 1874 पर्यंत राहिले.

लालगोला येथील वास्तव्यात बंकिमबाबुनी जगद्धात्रि दुर्गा आणि कालीमातेच्या मंदिरांना भेटी दिल्या. तेथे त्यांनी इंग्रज राजवाटिविरुद्ध सर्व भारतीयांना केवळ एका मंत्राने कसे एकत्र आणता येईल याचे विचारमंथन केले.

अखेर 31 जानेवारी 1874 च्या रात्री, माघी पौर्णिमेला एक बारा अक्षरी गीत “वंदे मातरम ” तयार केलं. (vande mataram =12 लेटर्स.) एका मंत्राने भारतीयांमध्ये देशभक्तीचा ज्वाला पेटवली आणि ब्रिटिशांच्या मनात धडकीही.

नंतर त्यांच्या “आनंदमठ ” या कादंबरीचे काही भाग, “बंग दर्शन “या मासिकात (खंड ७)1881 साली प्रसिद्ध झाले आणि पूर्ण पुस्तक 1882 साली प्रसिद्ध झाले. इंग्रजांनी बंकिमबाबुना काही भाग बदलायला सांगितले आणि त्यासाठी दबावही आणला. पण ब्रिटिशांच्या दबावामुळे परिणामी बंकिमचंद्रांनी त्या सरकारी नोकरीतून सेवानिवृत्ती घेतली.. ते वर्ष होते 1885-86.

वरील प्रसंगावरून हेच सिद्ध होते की अपमान, न्यायासाठीचा लढा आणि स्वातंत्र्याची तळमळ आणि स्वातंत्र्य मिळविण्याची दुर्दम्य इच्छा यांनी “वंदे मातरम् “ ला कसा जन्म दिला!

आज १४५ वर्षांनंतरही “वंदे मातरम्” ऐकताच आपल्या अंगावर शहारे येतात! हे गीत आपल्यात देशभक्ती जागवते.

…. आजही हे गीत आपल्या हृदयात देशभक्तीची ज्योत तेवत ठेवते आहे, यात अजिबात शंका नाही.

“वंदे मातरम्!!!!! “

 

मूळ इंग्लिश लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात

अनुवादक : मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कन्यादान ☆ वीणा कुलकर्णी ☆

वीणा कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ कन्यादान ☆ वीणा कुलकर्णी ☆

माहेरवाशीण येते वर्षातून एकदा 

गौरीच्या सणातून..

तर कधी श्रावणी शुक्रवारच्या 

कहाणीतून!

सासरी रमताच पाहुणी होऊन जाते माहेरची.

बी लावायचे, पाणी घालायचे नित्यनेमाने, मग त्याचे रोपटे तयार होते, जोपासलेल्या रोपट्याला कळी येते अन कळीचे फूल कधी होते कळतच नाही. हे फूल बाजारात विक्रीसाठी देताना मळा? रिकामा होऊन जातो. अशावेळी माळ्याची जी घालमेल होते तीच घालमेल कन्या सासरी जाताना प्रत्येक आईवडिलांची होते. पण काय करणार, आपल्या 16 संस्कारामध्ये विवाह संस्कारास अनन्य साधारण महत्व आहे. परंपरेप्रमाणे प्रत्येक मातापित्यास “कन्यादान” हे करावेच लागते. इथे मी चांगल्या अर्थाने म्हणते बरं का, “आलिया भोगासी असावे सादर” कारण “कन्या हे परक्याचे धन!!

मुलींबरोबर बागडण्यातला आनंद, बालपणीचे लडिवाळ हट्ट, छंद, सतत चाललेला चिवचिवाट हे सगळेच संपते कन्या सासरी गेली की अगदी तीन तासाच्या चित्रपटासारखे. तरी जमाना बदललाय, मुली येऊ शकतात आईबाबांकडे केव्हाही. पण तरीही विवाहित मुलगी त्यांना पाहुणीच वाटत असते. त्यांचे हे वाटणेही स्वाभाविकच असते जनप्रथेनुसार.!!! चालीरीती, परंपरा व रूढी या त्रिसूक्तीचा प्रभाव नगण्य टक्के अपवाद वगळता अजूनतरी आहे असाच आहे.

मुली माहेरी पाहुण्याच होतात.

बरोबर आहे ना ते?

☆

© वीणा कुलकर्णी

संपर्क : G.503 ऋतुरंग श्रावण सोसायटी। अरण्येश्वर, पुणे 411 009

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आज का सगळेच बदललेले ??  ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? इंद्रधनुष्य ?

☆  आज का सगळेच बदललेले ??  ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

“आज सगळेच वेगळे दिसत होते. 

कां ? ते समजत नव्हते, 

मग लक्षात आलं गणपती उत्सवामुळे – – “

सकाळी मी रोजच फिरायला बाहेर पडतो. गणपती उत्सवाचा पहिला दिवस होता. नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो. दार उघडून बाहेर आलो आणि समोरच गेटवर भारद्वाज पक्षी बसलेला दिसला आणि आज काहीतरी शुभ घडणार असा संकेत मिळाला. त्याला हात जोडून मी नमस्कार केला आणि फिरायला बाहेर पडलो.

मेन रोड लागल्यावर, नेहमीचे दृश्य असते, की रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या असतात / कचरा पडलेला असतो / कागदाची खोकी  पडलेली असतात. आज मात्र रस्ता एकदम चकाचक दिसत होता. काही जण कार चालवत असतात / स्कुटर चालवत असतात आणि काहीतरी खात असतात. खाऊन झाले कि कागद / प्लॅस्टिक पिशवी रस्त्यावर टाकतात. आज कुणीच कचरा फेकलेला  दिसत नव्हता. 

कां? ते मात्र समजत नव्हते.

सिटी प्राईड च्या रस्त्यावर आलो, की तिथे, कुत्री घेऊन फिरणारे स्त्री-पुरुष नेहमीच दिसतात. रस्त्यावर कुठेही कुत्र्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे त्यांचे शी – शू करणे सुरू असते. कुत्रे फिरवणाऱ्याला मात्र त्याचे काही देणे घेणे नसते. आज पण कुत्र्याला घेऊन हिंडणारी मंडळी दिसत होती. फुटपाथवर एका ठिकाणी एका कुत्र्यानी शी केली, आणि मालकाने लगेच प्लास्टिकच्या पिशवीत शी गोळा केली. आणि आश्चर्य म्हणजे आज कुत्री फिरवणाऱ्या  सगळ्यांच्याच  हातात प्लास्टिकच्या पिशव्या दिसत होत्या. हा बदल कशामुळे घडला?  ते मात्र समजत नव्हते.

पुढे मेन रोडला आलो. नेहमीचा देखावा म्हणजे, हॉर्नचे कर्कश आवाज, काही चौकांमध्ये सिग्नल सुरू असतात, काही ठिकाणी बंद असतात. सिग्नल पाळणारे अगदी बोटावर मोजण्या इतकेच असतात. सगळ्याच गाड्या बेफाम वेगाने धावत असतात. झेब्रा क्रॉसिंग वर रस्ता ओलांडणारे  जीव मुठीत घेऊन धावत असतात. काहीजण उलटी कडून वेगाने येत असतात. काहीजण फुटपाथवर गाड्या घालत असतात.

आज मात्र सगळेच बदललेले दिसत होते. सगळे सिग्नल चक्क सुरु होते. कोणी हॉर्न वाजवत नव्हते. सिग्नल तोडून जाणारी एकही गाडी दिसत नव्हती. झेब्रा क्रॉसिंग वरून पादचारी आरामात रस्ता ओलांडत होते. सगळ्या गाड्या २० – ३० च्या वेगाने जात – येत होत्या. उलटी कडून येणारी किंवा फुटपाथ वरून जाणारी एकहि टु व्हीलर दिसली नाही. वळणारी प्रत्येक गाडी चक्क साईड इंडिकेटर देत होती. 

हा बदल बघून, मी माझे फिरणे विसरलो, आणि ट्रॅफिकचा हा नवीन रंग बघण्यात रममाण झालो. काहीतरी कारणामुळे माझी तंद्री मोडली आणि मी पुढे निघालो. ट्रॅफिक मध्ये एकदमच ही सुधारणा कशामुळे झाली, ते मात्र काही समजत नव्हते.

पुढे मारुती मंदिर लागते, तिथे फुटपाथवर नेहमीच लोक कबुतरां करता धान्य टाकत असतात. त्यामुळे कबुतरांचे थवे कायम तिथे असतात. कबुतरांमुळे काही आजार पसरतात, त्यांना रस्त्यावर धान्य टाकू नका, असे बरेच वेळा पेपरमध्ये आपण वाचतो. पण त्याची दखल कुणीच घेताना दिसत नसते. आज मात्र फुटपाथ वर कोणीही धान्य टाकले नव्हते. त्यामुळे आज एकही कबूतर दिसत नव्हते. हा बदल कशामुळे  ? हे मात्र समजत नव्हते.

थोडं पुढे गेलं की गणपतीचे मंदिर आहे. रोज मी बाहेरून दर्शन घेतो आणि पुढे जातो.

गणपती उत्सव सुरू असल्यामुळे गणपतीचे दर्शन घेण्याकरता मी मंदिरात गेलो. बाप्पाला नमस्कार करताना एकदम लक्षात आलं की गणपती उत्सवामुळे बाप्पा सगळ्यांना दर्शन देण्याकरता दहा दिवसां करता इथे आले आहेत. आणि आत्ता येताना रस्त्यावर जो बदल दिसत होता तो सगळा त्यांच्या अस्तित्वामुळेच आहे.

मी बाप्पांना नमस्कार केला. डोळे मिटले आणि इतका सुंदर बदल घडवून आणल्याबद्दल देवाचे आभार मानले, आणि असाच बदल कायम ठेव अशी बाप्पाकडे प्रार्थना केली.

आणि चक्क बाप्पा बोलत आहेत असा मला भास झाला – 

बाप्पा : तुमच्या सगळ्यांकरता काय योग्य आहे हे दाखवण्याकरता मी हा बदल दहा दिवस घडवून आणणार आहे. सगळ्यांना जर हा बदल आवडला तर पुढचे सगळे दिवस मात्र तुम्ही त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करायचा आहे. आपण रस्त्यावर असताना आपल्या बेशिस्त  वागण्यामुळे इतरांना त्रास होणार नाही हा विचार सगळ्यांनीच जर केला तर हे सहज शक्य आहे. इतरांमध्ये आपले आई वडील बघा, आपले वयस्कर आजी आजोबा बघा, आपले मित्र बघा, आपले नातेवाईक बघा, आपली लहान मुलं बघा, आपली बायको बघा/ नवरा बघा,’ आणि आपोआपच हा बदल तुमच्यामध्ये घडून येईल. 

तथास्तु…

 

© श्री सुधीर करंदीकर 

मोबाईल नंबर 9225631100

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “कसं रिऍक्ट व्हावं हेच समजत नाही…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “कसं रिऍक्ट व्हावं हेच समजत नाही…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

झालं असं की,

दुपारची वेळ, हॉस्पिटलमध्ये फार गर्दी नव्हती तेव्हा वेदनेनं विव्हळणाऱ्या आजीला घेऊन म्हातारबा आले. आजींची अवस्था पाहून नर्सनं ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं.

“डॉक्टर, म्हातारी लई तळमळतीये. ”म्हातारबांनी हात जोडले. आजींना तपासल्यावर डॉक्टर म्हणाले “बरेच दिवस दुखणं अंगावर काढलेलं दिसतंय. सर्दी ताप, खोकला आणि अशक्तपणा आहे. खूप दिवसांच्या उपाशी दिसतायेत. हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. काही तपासण्या कराव्या लागतील. तुम्ही यांचे कोण?

“कुणी बी नाई. रस्त्यावर तडफडत व्हती माज्याच्यानं बघवलं नाय म्हणून इत घेऊन आलो.”

“आजींचे नाव काय? कोणी नातेवाईक??”

“लई येळा ईचारलं पण म्हातारी काय बी बोल्ली नाय. बहुतेक मुकी हाय.”

“पोलिसांना कळवावं लागेल”

“कशाला? त्यापरिस असं करा. माजी सावत्र बहीण समजा”

“ठीकये. तुम्ही जबाबदारी घेत असाल तर हरकत नाही. फॉर्मवर सह्या कराव्या लागतील. ”

“हा करू की. काही पैशे बी भरू. आधारकार्ड बिर्ड पायजे असलं तर ते बी घ्या पर हीला बरी करा. ” – – 

– – अनोळखी व्यक्तीसाठी धडपडणाऱ्या म्हातारबांचे सगळ्यांना खूप कौतुक वाटलं. “अजूनही माणुसकी शिल्लक आहे. ”असं प्रत्येकाला वाटतं होतं.

आजीना ऍडमिट करून गेलेले म्हातारबा नंतर चार दिवस फिरकलेच नाहीत. फोन केल्यावर पाय मुरगळल्यानं येऊ शकत नाही असं सांगितलं. त्यानंतर काही ना काही कारणं देत म्हातारबा टाळत होते. पंधरा दिवस होऊन गेले तरी म्हातारबा आले नाहीत आणि मोबाइलही बंद. आजीची तब्येतीत सुधारत होती परंतु बोलता आणि लिहिता-वाचता येत नसल्यानं काहीच माहिती मिळत नव्हती. सगळंच अधांतरी आणि त्यात भरीसभर म्हणजे बिल वाढत होतं.  

शेवटी नाईलाजानं पोलिसांना बोलवावं लागलं. म्हातारबांना ओळखता का? विचारल्यावर आजींनी होकारार्थी मान डोलावली. हातवारे करत आजी काही सांगायचा प्रयत्न करत होत्या पण कोणाला समजत नव्हतं. त्याचवेळी दुसऱ्या पेशंटला भेटायला आलेल्या जोडप्याकडं आजींनी बोट दाखवल्यानं गोंधळ अजून वाढला. पोलिसांनी चौकशी केली पण ते जोडपं आणि आजींचा काहीही संबंध नव्हता तरीही आजी सारखं सारखं बाईंच्या कपाळावरच्या टिकलीकडे आणि मंगळसूत्राकडं बोट दाखवत होत्या. तेव्हा एका सीनियर नर्स अंदाजानं ‘नवरा-बायको’ म्हणाल्या तेव्हा आजींनी जोरजोरात मान डोलावली. एक बोट स्वतःकडं आणि दूसरा हात उंचावत इशारा केला तेव्हा गुपित उलगडलं आणि पोलिसांची चक्र हलली. दुसऱ्या दिवशी म्हातारबा हॉस्पिटलमध्ये हजर झाले.

“साहेब, डॉक्टर, माप करा. लई मोटी चुक झाली. मी खोटं बोल्लो. ही माजी पयली बायको. आमचा काडीमोडहून तीस वर्ष झाले. त्यानंतर आमच्यात कायबी संबंध राहिला नाही. म्या दुसरं लग्न केलं. दोन पोरं हायेती पर ही एकटीच राहिली. काई दिसांपूर्वी अचानक दिसली. लय वाईट अवस्थेत व्हती. इच्या गावाकडं ईचारलं तवा कळलं की आता हीचं कुनीबी नाय. लोकांनी फसवून घरदार लुटलं. भीक मागून जगतेय. मिळालं तर खाते नाईतर उपाशी. “

“मग स्वतःच्या घरी जायचं ना” पोलीसांनी खडसावलं.

“लई ईच्चा हाय पन घरी नेता येत नाई कारण मीच पोरांच्या जिवावर जगतोय. म्हणून ही लबाडी केली. बरी झाल्यावर कुठल्या तरी म्हाताऱ्यांच्या आश्रमात ठेवेन. माज्या घरी सांगू नगा नाईतर मीपण रस्त्यावर येईल. बँकेत दोन यप डी हायेत त्यातून दवाखान्याचे पैशे फेडेन. आता वरच्याजवळ एवढंच मागणं हाय की.. हिचं जगणं सुखाचं झालं नाही. निदान मरण तरी… ” बोलता बोलता म्हातारबा ढसाढसा रडायला लागले.

त्यावेळी आजी मात्र एकदम निर्विकार आणि पोलिस, डॉक्टर, हॉस्पिटल स्टाफ सगळे सुन्न.

– – काही वेळा कसं रिऍक्ट व्हावं हेच समजत नाही.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares