मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “समर्पण” – संकल्पना – श्री अरूण पुराणिक ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆
सौ राधिका भांडारकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “समर्पण” – संकल्पना – श्री अरूण पुराणिक ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆
पुस्तकाचे नाव: समर्पण
लेखक:श्री.अरुण पुराणिक
प्रकाशक :आर्या पब्लिकेशन अँड डिस्ट्रीब्यूटर.
प्रथम आवृत्ती:६ऑक्टोबर २०२२
किंमत :१००/—
श्री.अरुण पुराणिक यांचे, ” समर्पण “ हे नुकतेच प्रकाशित झालेले छोटेखानी पुस्तक मी वाचले आणि अक्षरशः मन गहिवरलं.
समर्पण ही, अरुण पुराणिक यांच्या स्वतःच्या सहजीवनाची कहाणी आहे. ती वाचत असताना, पती-पत्नीचं नातं कसं असावं, याचा पावलोपावली बोध होतो.
या कहाणीची सुरुवातच ," आज जो काही मी आहे तो तिच्यामुळे " या वाक्याने ते करतात. पत्नीने आयुष्यातल्या चढउतारात, सुखात, दुःखात, अडचणीत, अत्यंत प्रेमाने केलेल्या सोबतीविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता, त्यांच्या या पहिल्या वाक्यातच वाचकाला जाणवते. एका सुंदर नात्याचीच ही कहाणी आहे. ही कहाणी परस्परावरील प्रेमाची, विश्वासाची, आधाराची, आहे.
समर्पण हे पुस्तक वाचताना, वाचक या कथेत मनोमनी गुंतून जातो. लेखकाबरोबरच तोही भावनिक होतो, हळहळतो. हे सारं यांच्याच बाबतीत का घडावं? असं सतत वाटत राहतं. दोघांच्याही हिम्मतीला आणि गाढ प्रेमाला, भरभरून दाद द्यावीशी वाटते.
एका सामान्य शिक्षकी पेशापासून आयुष्याची सुरुवात झालेल्या एका युवकाची ही कथा. तसं पाहिलं तर सर्वसाधारणपणे, मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याची ही एक साधी कहाणी. नोकरी, लग्न, संसार, मुलंबाळं,...