मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आमची देवी पूजा…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “आमची देवी पूजा…” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

देवीची प्रतिष्ठापना झाली आहे…

नवरात्र सुरू झाले आहेत…

– – या निमित्ताने आम्ही सुद्धा देवीची पूजा सुरू केली आहे, मात्र आमची पूजा थोडी वेगळी असते… !

  1. आयुष्यभर ज्यांनी परिस्थितीशी लढाई केली, सामना केला, अशा अनंत माता माऊली आज रस्त्यावर त्याच परिस्थितीच्या छाताडावर पाय ठेवून अजूनही उभ्या आहेत…

आम्ही अशा गरजू नवदुर्गा शोधून त्यांना पुरणपोळीचे जेवण आणि काहीतरी स्वीट्स देत आहोत.

(हे मान्य आहे, की रोज त्यांना उपवास घडतात तरीही श्रद्धेने त्या आताही उपवास धरत आहेत, परंतु आम्ही दिलेले ताट त्या दुसऱ्या चिल्ल्या पिल्याना, गरजू अंध अपंग भुकेल्यांना देतील, या आशेने आम्ही हे ताट नैवेद्य म्हणून दाखवत आहोत)

  1. ज्या माऊलीला मूलबाळ, नवरा संसार, कशाचेही पाश नाहीत, अशी माऊली अनंत वर्षे मंदिराच्या बाहेर भीक मागून जगत आहे, तिला या नवरात्रात आपण फुले आणि गजरा विकण्याचा व्यवसाय सुरू करून देत आहोत…
  2. फाटक्या लुगड्यातच जिचं आयुष्य गेलं, भाकरी उलथताना जीचा हात भाजला किंवा चूल पेटवताना जीव गुदमरला… आणि ज्यांच्यासाठी हे केलं ते आज सोबत नाहीत… अशा आईंना नवीन साड्या नेसवणार आहोत, (कुणी वापरलेल्या किंवा जुन्या नाही).

… माऊली ही तुझ्या हातावर मारलेली फुंकर समज, यातून तुझ्या वेदना भरून येणार नाहीत याची जाणीव आहे,

.. पण गोंधळ घालणारं, एक ना लायक कार्ट समजून तरी आमची ही सेवा रुजू करून घे… !

आजपर्यंत आपण जे काही दिलंत, त्यातलं आम्ही जे काही साठवून ठेवलं तेच आता वापरणार आहोत… याचसाठी केला होता अट्टाहास… !

आई… आई ये… गोंधळाला ये…

आई नक्की ये… आ SS हा…

आणखी एक.. सर्वात महत्त्वाचं, माझा एक मुलगा… काही वर्षांपूर्वी नाईलाजाने याचा डावा पाय गुडघ्या खालून तोडावा लागला… मनाची अवस्था काय झाली असेल हे फक्त त्यालाच माहीत, कारण घरात एकटा तोच कमावता…

 काही महिन्यांपूर्वी आपण याला कृत्रिम पाय मिळवून देण्यासाठी मदत केली…

… तरीही त्या पायावर त्याला वजन झेपत नव्हते (No weight bearing) म्हणून त्याला मागील आठ दहा दिवसांपूर्वी एक वॉकर घेऊन दिला…

आता तो बऱ्यापैकी स्थिरावला…

 मग त्याला कानात हळूच खुसपुसत म्हणालो, ‘आता तू बरा झाला आहेस, काहीतरी व्यवसाय करशील का… ? ‘

यावर त्याने जोराने आरोळी मारत, हात उंच करत मला उत्तर दिले, हो sssss सर… !

– त्याची ही आरोळी म्हणजे मला वाघाची डरकाळी वाटली…

… ही डरकाळी म्हणजे आजपर्यंतच्या त्याच्या अपंगत्वावर आणि आलेल्या डिप्रेशन वर त्याने स्वतः मिळवलेल्या विजयाचे प्रतीक होते ते… !

 मी कधी पाहिले नाही परंतु एव्हरेस्ट शिखर सर करणारा माणूस सुद्धा अशीच काहीतरी डरकाळी फोडत असेल…

हे असं शिखर सर करण्यात आणि स्वतःच्या अपंगत्वावर मात करण्यात मला तरी काही फरक वाटत नाही… !

ही डरकाळी आयुष्यभर माझ्या हृदयात राहील… ! कालपर्यंत बिन पायाने रांगत चाललेला बछडा, आज वाघ झालेला कोणत्या बापाला आवडणार नाही…?

असलेल्या निधीमधून यालाही व्यवसाय टाकून देणार आहोत… !

आत्ता लिहिताना जाणवले, देवीचे वाहन खुद्द वाघ आहे, सध्या नवरात्र आहे, देवीची प्रतिष्ठापना झाली आहे…!

खरंच हा निव्वळ योगायोग समजायचा…?

 

© डॉ अभिजित सनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अशी आमची शेवटचीच पिढी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ अशी आमची शेवटचीच पिढी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – गौरी गाडेकर ☆

☆

तेव्हा सायकल तीन टप्प्यात शिकली जायची.

पहिला टप्पा कैची,

दुसरा टप्पा दांडा,

आणि तीसरा टप्पा सीट.

तेव्हा सायकल चालवणं इतकं सोपं नव्हतं कारण तेव्हा घरात एकच सायकल असायची जी फक्त बाबा चालवायचे.

तेव्हा सायकलची उंची चोवीस इंच असायची जी उभं राहिल्यावर आमच्या खांद्या येव्हडी यायची.. अशी सायकल सीटवर बसून चालवणं शक्यच नव्हतं.

कैची ती कला होती ज्यात आम्ही सायकलच्या फ्रेममधल्या त्रिकोणात घुसून दोन पायडलवर दोन पाय ठेवून सायकल चालवायचो.

आणि जेव्हा आम्ही अशी सायकल चालवायचो तेव्हा आम्ही छाती पुढे काढून कमरेतून तिरपं होऊन हँडलच्या मागून आमचा चेहरा बाहेर काढून ट्रींग ट्रींग करून घंटी वाजवायचो जेणे करून रस्त्यावरच्या लोकांना कळेल की आम्ही सायकल चालवतोय.

आजची पिढी ह्या साहसापासून वंचित आहे. त्यांना कल्पनाच नाही करता येणार की आठ दहा वर्षाच्या वयात चोवीस इंची सायकल चालवणं हे विमान उडवण्यासारखंच होतं. आठवत नाही आम्ही कित्येकदा आमचे गुढगे, मांडी आणि तोंड फोडून घेतलं होतं. आणि आश्चर्य म्हणजे तेव्हा त्याने अजीबात दुखायचं नाही. पडल्यावर पटकन इकडे तिकडे बघून चड्डीला लागलेली माती झाडत गुपचुप उभं रहायचो.

आता तंत्रज्ञान खूप प्रगत झालं आहे आता तिसऱ्या वर्षीच मुलं न धडपडता सायकल चालवतात कारण बाजारात दोन दोन फुटी सायकली आल्या आहेत व त्याला side support आले आहेत आणि श्रीमंतांची मुलं तर थेट बाइक चालवतात.. तश्या छोट्या बाईक्स मिळतात बाजारात.

… पण आजच्या मुलांना हे कधीच कळणार नाही की लहान वयात त्या मोठ्या सायकलवर संतूलन मिळवणं हा आयुष्यातला पहिला धडा असायचा.. जबाबदारीची पहिली पायरी असायची जी चढल्यावर तुम्ही गिरणीतून गहू दळूण आणण्यालायक झालेले आहात हे नक्की व्हायचं आणि तुमच्यावर ती जबाबदारी टाकली जायची. जाताना दळणाचा डबा कॅरीयरवर ठेवून सायकल ढकलत चक्कीपर्यन्त जायचं आणि येताना कैची चालवत यायचं.. पण खरंच.. ही कष्टदायक जबाबदारी पार पाडताना खूप आनंद वाटायचा. आता कैची ही प्रथा लोप पावलेली आहे.

– – आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी सायकल ही अशी तीन टप्प्यात शिकली.

आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी घरात बसून परीच्या आणि राक्षसाच्या गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या, जमिनीवर किंवा पाटावर बसून जेवलो.. बशीतून चहा प्यायला.

आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी लहानपणी घराच्या अंगणात किंवा पटांगणात मित्रां बरोबर विटी दांडू, लपाछपी, कबड्डी, खोखो, गोट्या, आंब्याच्या कोया, भोवरे, पतंग, पावसाळ्यात खुपसणी, सूर पारंब्या, लगोरी, डबा ऐस पैस, लंगडी, आट्यापाट्या ह्या सारखे परंपरागत खेळ खेळले आहेत.

आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी मिणमिणत्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात गृहपाठ केला आहे आणि चांदोबा आणि कॅामिक्स वाचली आहेत.

आम्ही त्याच पिढीतले लोक आहोत ज्यांनी आपल्या नातेवाईकांशी मित्रांशी भावनांची देवाण घेवाण पत्रातून केली आहे.

आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी त्यांचं बालपण कूलर एसी फ्रिज फोन गाडी शिवायही आनंदात घालवलं आहे.

आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी दिवाळीत भल्या पहाटे उठून लाल रंगाचं सुगंधी तेल केसांना लावलंय आणि मोती किंवा म्हैसूर सँडल सोपनी अभ्यंग स्नान केलंय.

आम्ही त्याच शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी शाईचं पेन वापरताना वह्या, पुस्तकं, कपडे, दप्तरं आणि हात निळे केले आहेत.

आम्ही शेवटचे लोक आहोत ज्यांनी शिक्षकांचा, कुटूंबातल्यांचा व नातेवाईक, शेजारी यांचा भरपूर मार खाल्ला आहे.

आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी गोदरेजच्या गोल डब्बीतल्या साबणानी दाढी केली आहे. गुळाचा चहा प्यायला आहे. भल्या सकाळी राख, काळ्या, लाल किंवा पांढऱ्या दंतमंजनानी बोटानी दात घासले आहेत, न्हाणीकडच्या चुलीत आग घालून त्यावर ठेवलेल्या हंड्यामधील गरम गरम पाण्यानी आंघोळ केली आहे आणि उन्हाळ्यात विहिरीवर जाऊन थंड पाण्याने आंघोळी केल्या.

आम्ही नक्कीच ते शेवटचे लोक आहोत ज्यांनी चांदण्या रात्री अंगणात झोपून ट्रांझिस्टरवर ॲाल इंडिया रेडिओ, बीबीसीच्या बातम्या, विवीध भारती, बिनाका गीतमाला ऐकलं आहे.

आम्हीच ते शेवटचे लोक आहोत जे रात्री घरासमोरच्या अंगणात चटया टाकायच्या आणि रात्रीचा थंडगार वारा असायचा आणि सगळ्यांना शांत झोप लागायची. सकाळी ऊन आल्यावरही तोंडावर पांघरूण घेऊन झोपून रहायचो. ते पण आबा खाडेने सकाळी येऊन पांघरूणे ओढून नेली नाही तर!!!

आणि हो… न्हाव्यासमोर घरातल्या पाटावर बसून हजामत (haircut) करवून घेतली आहे.

… आता हे सगळं नाही राहिलं डब्यांसारख्या खोल्यांमधे कूलर किंवा एसी लाऊन रात्र होते.. दिवस पुढे सरकतात.

आम्ही त्या शेवटच्या पिढीतले लोक आहोत ज्यांनी नात्यांमधला गोडवा जपणारी आणि वाटणारी माणसं बघीतली आहेत, पाहुणे परत जातांना देवळाकडे किंवा घोगळावर पायी जावून एसटी बसची वाट पाहत बसलो आहोत, आणि त्यांना निरोप देवूनच आलो… अशी माणसं आता दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत.

आम्हीच ते नशीबवान लोक आहोत ज्यांनी नात्यांची गोडी अनुभवली आहे.

आमची पिढी ही अशी एकमेव पिढी आहे जिनी नेहमी आपल्या आई वडिलांचं ऐकलं आणि आता आपल्या मुलांचंही ऐकते आहे.

☆

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नवरात्र.. बहुतेक घरांमधले चलचित्र ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ नवरात्र.. बहुतेक घरांमधले चलचित्र ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

(महिलांचा अनुभव)

आज नवरात्र सुरू होतय्. मी एकदम खुश होते. आधीच ठरवलं होतं, की रोज सकाळी ऑफीसला जाण्यापूर्वी, देवीच्या देवळात जाऊन यायचं. मुलगी यायला तयार झाली, तर तिला पण घेऊन जायचं. ह्यांना विचारण्यात कांहीच पॉईन्ट नव्हता. एकदम नास्तिक माणूस आहे. माझ्या जाण्यात पण त्यांनी खो घातला असता.

आज मुद्दामच सकाळी लवकरच उठले. सगळ्या चपला, सॅन्ड्ल्स उचलून मोठया बॅगेत भरून ठेवल्या. उगीच घालायचा मोह व्हायला नको. आता ‘नो फूट् वेअर फॉर नाईन डेज्’. नो स्लीपरस् ऑलसो’.

आजचा रंग नारंगी (ऑरेंज) होता. नारंगी रंगाची साडी /मॅचिंग ब्लाउज /मॅचिंग पर्स / मॅचिंग गळ्यातले-कानातले घालून तयार झाले. इतर वेळ असती, तर मॅचिंग सॅन्डल्स पण असते, असो. मुलीला येते कां? विचारले, तर चक्क ‘हो’ म्हणाली.

मुलगी : आई, मी येतेय्, पण, साडी बीडी – नो वे, रंगाचे बंधंन – नो वे, आणि मी पायात बुट घालणार. कबूल असेल, तर बोल?

मी : अग, मनू, ९ दिवसांचा तर प्रश्न आहे! इतर वेळा आम्ही तुला काही म्हणतो कां?

मी : (मनात) आणि म्हणूनहि, ही कुणाचं ऐकते कां? ह्यांचे आणि सासूबाईंचे, तिचे नेहेमी अतिच लाड असतात!

मुलगी : अगं, साडीचं फार ओझं होतं. पॅन्ट आणि टी शर्ट नी मोकळं वाटतं. आणि पायात काही नाही, ही तर कल्पनाच करवत नाही. एकतर चालायला सगळीकडे फूटपाथ नाहीत, फुटपाथवरच्या फरश्या बरेच ठिकाणी उखडलेल्या असतात. कुत्री फिरवणाऱ्यांच्या कुत्र्यांनी ठिकठिकाणी शी केलेली असते. परदेशात लोक कुत्री फिरवतात, ते बघून इथे पण लोक कुत्री फिरवायला लागले. ते लोक शी गोळा करायला प्लॅस्टीक पिशवी बरोबर नेतात, पण आपल्याला ते कमीपणाचे वाटते. रस्त्यावर अधे-मधे दारूच्या फुटक्या बाटल्या पडलेल्या असतात. पायात काच गेली म्हणजे संपलेच. आई, अनवाणी चालण्याचं, तू पण जरा जास्तच करते आहेस!

मी विचार केला, मुलगी देवीला यायला तयार झाली, हेच खूप झाले. आम्ही दोघी तयार झालो. निघतांना यांना ‘आम्ही जाऊन येतो’ असे सांगितले. तर, हे म्हणाले, ‘देवीला जाताय, का, फॅशन शो ला जाताय’? मी स्वत:कडे बघितले आणि लक्षात आलं, की गळा आणि पाठ जरा जास्तच मॉडर्न आहेत आणि स्लीव्हलेस प्रकार देवीला आवडेल ना? असा पण विचार मनात डोकाऊन गेला. बाय करून, दोघी बाहेर पडलो. बरेच स्त्री-पुरूष माझ्यासारखेच अनवाणी चालतांना पाहून छान वाटले. दर्शन घेऊन घरी आले.

कपाटातली दुसरी नारंगी साडी काढली. आज रविवार होता पण ऑफिसला आज सुट्टी नव्हती. ऑफीसला गेले. ऑफीसमधे ८-१० जणी नारंगी साडीत होत्या. अनवाणी मात्र मी एकटीच होते. बॉसनी आणि सगळ्यांनीच त्याबद्दल माझं कौतुक केलं.

सगळ्या म्हणाल्या, सकाळी देवीला अनवाणी जाऊन आलो. बाहेर फारच घाण असते. आता इतर ठिकाणी पायात घातलय, का नाही, हे बघायला देवी कशाला येतेय. त्यामुळे इतर वेळेला आम्ही पायात घालणार.

दिवसभर उपास असल्यामुळे, दुपार नंतर पोटात कावळे काव-काव करायला लागले होते, पण रात्रीपर्यंत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. संध्याकाळी भाजी आणायला साडी बदलून बाहेर पडले. आज या-ना-त्या कारणानी नारंगी ५ साडयांना बाहेरची हवा लागली. रात्री दिवसांच्या रंगाप्रमाणे, रोज नेसायच्या साडयांचे गठ्ठे करून ठेवले. रोज ५-६ साडया नक्कीच नेसता येतील. अशा रितीनी नवरात्राची सुरूवात छान सुरू झाली.

 © श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनाच्या वाड्यात गडबड झाली – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ मनाच्या वाड्यात गडबड झाली – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मनाच्या वाड्यात गडबड झाली… जुन्या दुःखांची पंचायत भरली… आली आली ग आठवण बाई… आली ग आठवण बाई…

कोपऱ्यात बसलेले एक जुने दुःख उठले… डोळे चोळीत म्हणाले… अहो, आमचे काय ठरले? आम्ही अजून मनातच राहायचे का?

तेवढ्यात आनंदराव दारातून आत आले… हातात हास्याचे गाठोडे… खांद्यावर समाधानाचे उपरणे…

आनंदराव म्हणाले… काय रे, अजून हीच मंडळी? अजून हीच दुःखे? अजून हाच बाजार? दहा वर्षांपूर्वीचा अपमान… पंधरा वर्षांपूर्वीचा राग… वीस वर्षांपूर्वीचे अपयश… अहो, एवढा जुना माल अजून गोदामात ठेवला आहे?

तेवढ्यात एक दुःख फुगून म्हणाले… आम्ही खास आहोत… आम्ही भावनिक आहोत…

आनंदराव हसले… म्हणाले, भावनिक नाही रे बाबा… तुम्ही आता निर्माल्य झाला आहात… कालची फुले आज निर्माल्य होतात… मग कालची दुःखे आज ताजी कशी?

प्रश्न बरोबर होता… दुःखे गप्प बसली…

एवढ्यात श्रद्धाबाई पुढे आल्या… त्यांनी देवाच्या चरणी फुलांची परडी ठेवली… म्हणाल्या… ही फुले माझी होती… आता त्याची झाली…

मग दुःखांचे काय?

तीही त्याचीच…

देवा… हे राग तुझे… हे अपयश तुझे… ही चिंता तुझी… आता तूच सांभाळ…

हे ऐकताच मनाच्या वाड्यात कुजबुज सुरू झाली… अहो… आपण तर दुःखांना कायमस्वरूपी भाडेकरू ठेवले होते… आता त्यांना नोटीस मिळाली वाटते…

तेवढ्यात भारूड सुरू झाले…

मनाच्या वाड्यात गडबड झाली… जुन्या दुःखांची उचलबांगडी झाली… आली आली ग आनंद बाई… आली ग आनंद बाई…

एक दुःख पुटपुटले… आम्ही जाऊ कुठे?

आनंदराव म्हणाले… गंगार्पण व्हा… निर्माल्य घरात ठेवत नाहीत… मनातही ठेवत नाहीत…

जाता जाता एक जुनी चिंता म्हणाली… माझी आठवण येईल…

मन हसले… म्हणाले… नाही गं… तुझ्या जागी आता आनंदाची पेरणी करायची आहे…

तेवढ्यात शेतकरीबुवा आले… म्हणाले… जमिनीतील तण काढले नाही तर पीक येत नाही… मनातील दुःख काढले नाही तर आनंद उगवत नाही…

वा रे वा… मनाला मुद्दा पटला…

राग बाहेर… मत्सर बाहेर… अहंकार बाहेर… दुःख बाहेर…

आत फक्त प्रेम… आत फक्त विश्वास… आत फक्त आनंद…

तेवढ्यात समाधानराव टाळी वाजवून म्हणाले…

ठरले… ठरले… ठरले…

दुःखांचे निर्माल्य करायचे ठरले… आनंदाची पेरणी करायची ठरली…

मनाच्या वाड्यात पुन्हा उजेड झाला… आनंदाच्या घोषणा सुरू झाल्या…

जय समाधान… जय समाधान…

जय आनंद… जय आनंद…

आणि मनाच्या दारात बसलेला अनुभव नावाचा म्हातारा हसून म्हणाला…

“देवाला वाहिलेली फुले परत मागत नाहीत… मग त्याच्या चरणी ठेवलेली दुःखे पुन्हा उचलून का घ्यायची? “

– – – दुःखांचे निर्माल्य करण्याचा सल्ला देणारा एक साधा निरीक्षक…

☆

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खूप काही दाटून आलंय… ☆ सुश्री सुनीता पाटणकर☆

सौ. सुनीता पाटणकर

? मनमंजुषेतून ?

☆ खूप काही दाटून आलंय… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

खूप काही दाटून आलंय,

नदीच पाणी वहायला लागलंय,

किनारा गवसतो,

पण तो कवेत,

घेईल याची खात्री नाही,

मग मुसंडी मारून,

पुन्हा धावतेय,

सुंदरसा घाट शोधतेय,

धडपड सतत चालूच.

मंदिर उभारायचय,

पण जमिनीला कुसच नाही,

माती हाती येतायेता,

निसटून जातेय.

उरी वेदना खूप आहे,

स्फोट होतो कधीकधी,

शोध अव्याहत चालू,

गवसत मात्र काहीच नाही,

समाधान लाभलंय म्हणतेय,

पुढे, पुढे चालतेय,

बांध सुटला की,

सैरावैरा धावतेय,

आमची माहेर वेगवेगळी,

तरी सासर एकच,

तो रत्नाकर…….

त्याच्याकडे जाताना,

जाऊ ना हातात हात घालून,

जोडा आम्हाला,

साखळी करू आम्ही,

पिकवू सारी शेत,

भरपूर देऊ पाणी.

नाले, प्रवाह,

अडवू नका आमचे,

ऐकलं नाहीत, तर

फेरे आहेतच दुर्दैवाचे.

 

©  सुनीता पाटणकर

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मन… दिसत नसलेलं जग! ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ मन… दिसत नसलेलं जग! ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

मनात खूप काही साठलेलं असतं…

 

काही न बोललेले शब्द,

काही न ओघळलेले अश्रू,

काही हरवलेली स्वप्नं,

तर काही हसऱ्या चेहऱ्यामागे लपवलेलं दुःख…

मन दिसत नाही.

पण ते आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून आणि वागण्यातून कळतं.

कधी मन आभाळाएवढं मोकळं असतं…

तर कधी स्वतःच्याच आत हरवलेलं!

प्रत्येक शांततेला समाधानाचं नाव नसतं. प्रत्येक हास्यामागे आनंद असतोच असंही नाही. काही वेदना शब्दांपलीकडच्या असतात… आणि काही माणसं गर्दीतही एकाकी असतात!

मनालाही हवी असते एक जागा—

जिथे मुखवटा उतरवता येईल,

मन मोकळं करता येईल,

आणि निःशब्दपणेही समजून घेतलं जाईल.

शेवटी, मन निरोगी असणं म्हणजे नेहमी आनंदी असणं नव्हे; दुःखातही स्वतःला हरवू न देणं… आणि गरज पडल्यास आधार स्वीकारता येणं!

आज जागतिक मानसिक आरोग्य दिनी मनात एकच विचार रुंजी घालतो—

– – चेहरे वाचणाऱ्या या जगात, मनं समजून घेणारी माणसं वाढतील का?

🌿 मन जपूया… माणुसकी फुलवूया! 

जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

☆

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बेड्या!!!” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆

मोहिनी किंहिकर हेडावू

??

☆ “बेड्या!!!” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆

☆

एक राजस्थानी लोकगीत पूर्वी कुठेतरी ऐकले असं पुसटस आठवतं.

वडील मुलीला म्हणतात, “तुझ्यासाठी व्यापारी नवरा शोधतो म्हणजे तुला देशोदेशी खूप फिरायला मिळेल’ मुलगी, ” नाही’ म्हणते.

मग ते म्हणतात “तुझ्यासाठी सोनार नवरा शोधतो. , म्हणजे विविध प्रकारचे दागिने तुला घालून मिरवायला मिळेल 

‘मुलगी तरी “नाही “म्हणते.

शेवटीं शेवटीं वडील विचारतात, “तुला कसा नवरा हवाय? ..

मुलगी म्हणते, ” मला लोहाराशी लग्न करायच आहे, जो माझ्या पायातील श्रृंखला तोडून टाकेल ‘”

… लोकगीत पूर्ण आठवत नाही. हे गीत ऐकलं तेव्हा वाटलं त्या श्रृंखला आहेत, समाजाच्या, जातीच्या धर्माच्या, रीतीरिवाजाच्या, कुटुंबाच्या! .

… पण काही आयुष्य जगल्यावर वाटतं की नाही.. तसं नाही,

… त्या श्रृंखला आहेत स्वतःच्या ढळत्या आत्मविश्वासाच्या!

… खचल्या मनोधैर्याच्या!

… दुर्बल मनाच्या!

… आणि स्वतः स्वतःवर लादलेल्या.. काही काही बळजबरीने! …

… आता फक्त नाचावेसे वाटते, पण कसं?

.. आपणच पायात बेड्या ठोकल्या आहेत… त्या आपण तोडायच्या! हो.. हो… का नाही?

हळू… हळू.. एकेक करून… फुगवलेल्या फुग्यातील हवा हळू हळू निघते तसे…

.. तसं निघताना जाणवत नाही, पण नंतर एकदम त्याच्या छोटासा गोळा बनतो तसं…

… स्वतःला व इतरांनाही न दुखावता, पण जाणीवपूर्वक! भान ठेवून!

… बघ नंतर अवघे आकाश आपले होईल… त्या नाचाच्या चा ठेक्यावर नाचणारे जग पाहून कसे वाटेल?

… नुसत्या विचाराने मनात आनंदाचे तरंग उठतात!

 थुई ठुई नाचणाऱ्या कारंजासारख्रे!

… जे स्वतः आनंदित होतात व बघणाऱ्यांना पण आनंदित करतात!

☆

© मोहिनी किंहिकर हेडावू

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दुर्गा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ दुर्गा… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

अश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजे देवीच्या नवरात्र उत्सवाचा, घटस्थपनेचा दिवस. पुढील नऊ दिवस विश्वात देवीचा शक्तिरूपाने वावर होणार. तिचा ‘उदो, उदो’ होणार. भुत्ये नाचणार, दिवट्या फुरफुरणार, कवड्याच्या माळा चकाकणार, संबळी कडाडणार! संध्याकाळी अंगणात मुली-लेकी-सुनांच्या भोंडल्यांचे फेर धरले जाणार. आपले दुखरे गुढगे सांभाळत दुडक्या चालीनं आज्या सुद्धा त्यात सहभागी होणार! आईचे आगमन होणार, ती आमच्या घरी उत्सवाला येणार. भक्तांची केवढी लगबग, धांदल उडालीय पहा. 

☆

उठा, सिद्ध व्हा, चला

दुर्गैचे स्वागत करायला! ।।

☆ दुर्गा ☆

सडे कुंकवाचे दारी, उठा चला घाला

उत्सवास येई “दुर्गा”, चला स्वागताला।।धृ।।

*

हरित वसन ल्याली, माथा शोभतो किरीट

मुक्त कुंतलांची शोभा, मेखला कटीस

हळद-कुंकुमाचे लेपन लाविले कपाळा

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला।।१।।

*

विमल हास्य वदनी विलसे धवल चंद्रिकेचे

विलग अधर, त्यातुन दिसती रदन हीरकाचे

पुष्ट उरोजांवर रुळती कनक, रत्नमाला

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला।।२।।

*

अष्टभुजा धारण करिती विविध आयुधांना

चक्र, खड्ग, अंकुश, पाश, चाप, बाण, भाला

शीघ्र गती चाले माता जणू अग्निज्वाला!

उत्सवास येई दुर्गा चला स्वागताला।।३।।

☆

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “पितृपक्षातील आगळं वेगळं कायमस्वरूपी अन्नदान… !!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “पितृपक्षातील आगळं वेगळं कायमस्वरूपी अन्नदान… !!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नुकतंच गणपती विसर्जन झालेलं, तरीही रस्त्यावर अफाट गर्दी, त्या गर्दीतून मी वाट काढत चाललो होतो, डोक्यात पितृपक्ष, पैशाचे नियोजन, अन्नदान कोणत्या योग्य ठिकाणी करता येईल याची ठिकाणं मनात आठवत चाललो होतो…. एकूण डोक्यात सगळा सावळा गोंधळ….

अंगावरचे दीडशे किलोचे साहित्य, त्यात ही गर्दी आणि उन्ह, मी वैतागून गेलो होतो.

अशात आमच्या भिक मागणाऱ्या परंतु एका चुणचुणीत मुलाने मला सर सर म्हणून हाक मारली आणि मला थांबवलं. मी गाडी बाजूला घेतली.

‘काय रे बोल पटपट पुढे जायचं आहे… ‘ 

‘सर एक बोलायचं होतं… ‘

‘बोल ना पटपट थोडा गडबडीत आहे… ‘

‘सर कसं बोलू? ‘

तो त त प प करायला लागला.

‘बोल रे कसा पण…. पण पटपट बोल’ 

मी हातातल्या घड्याळाकडे पाहत म्हणालो 

‘ते सर कसं आहे ना… ‘

‘अरे मुद्द्याचं बोल ना बाबा… ‘

‘सर मी एक लाकडी टेबल बघितला आहे, कॅम्पमध्ये एक मस्जिद आहे, त्याच्या आड बाजूला एक जागा आहे, तिथे मी एक धंदा लावायचा म्हणतोय, तिथली परमिशन मिळाली आहे, आता तुमची मदत लागेल. ‘ एका दमात आवंढा गिळत तो बोलला.

‘सांग ना काय लागेल? ‘

 ‘सर कसं सांगू? कसं मागू? ‘ 

‘कसं पण सांग रे बाबा, पण बोल ना’ 

– – मी पुन्हा घड्याळाकडे पाहत म्हणालो.

‘नाही म्हणजे तुम्हाला जमेल का? असा विचार करत होतो, आधीच तुमच्या मागे एवढे खर्च आहेत, त्यात तुमच्या अंगावर पुन्हा माझा खर्च…. ‘

‘अरे काय खर्च आहे तो तरी सांग ना बाबा… ‘

‘सर… सर… काय बोलू…. ‘ त्याला पुढचे शब्द आठवत नव्हते.

‘आठवल्यावर बोल, मला आता जाऊ दे गडबडीत आहे. ‘ असं म्हणून मी गाडीला किक मारली.

सर सर म्हणत त्याने गाडीवरचा हात ओढून धरला…. मला पुढेच जाऊ देईना.

त्याची एवढी अजिजी आणि तळमळ पाहून मला लगेच लक्षात आलं, एखादा व्यवसाय टाकण्यासाठी याला अफाट खर्च लागणार आहे आणि तो त्याला माझ्याकडून हवा होता…

मी परत थांबलो…

थांबल्यावरही पुन्हा तेच… ‘सर सर कसा बोलू… ?

आता माझी खात्री पटली, याला अपेक्षित असणारा खर्च खूप मोठा आहे.

लटक्या रागाने मी त्याला म्हणालो, ‘आता बोल नाही तर फटका खाशील.

खूप मोठी ताकद एकवटून शेवटी तो बोलला, ‘सर मला जिथे जागा मिळाली आहे, तिथे इस्त्रीचे एकही दुकान नाही, मी जर हा इस्त्रीचा व्यवसाय तिथे टाकला तर चांगला चालेल. ‘

पैशाचा भला मोठा आकडा ऐकायची तयारी ठेवून मी तोंडावरचा रुमाल काढून त्याच्याकडे रोखून पहात विचारले, ‘यात मी तुला काय मदत करू? ‘

‘सर मला धंद्याला लागते ती इस्त्री फक्त तुम्ही घेऊन द्या…. ‘

मी उडालोच, “ ही इस्त्री मागण्यासाठी तू माझा तास घालवलास? “

‘हां सर धंद्याला लागणाऱ्या इस्त्रीची किंमत जास्त असते, साडेतीन ते चार हजार रुपये तरी लागतात. तुम्ही इतक्या लोकांचे करता त्यात माझा हा खर्च तुमाला झेपेल का, याचा विचार आला, म्हणून तोंडातून शब्द येत नव्हते. ‘

.. अंगठ्याने जमीन टोकरीत तो खाली मान घालून म्हणाला.

मी गाडीवरून खाली उतरून त्याला जवळ घेतले.

बाब एका किरकोळ इस्त्रीची, पण माझ्या अंगावर असणाऱ्या आधीच्या जबाबदाऱ्यांचा विचार करून, त्याने ती सुद्धा किती नम्रतेने मागितली होती…. मला त्याचं कौतुक वाटलं…!

आपल्या आयुष्यात आपण एखाद्याला कोणतीही गोष्ट मागताना, खरंच त्याची आपल्याला काही देण्याची परिस्थिती आहे का? त्याच्या इतर काही व्यथा आहेत का? सध्या आपल्याला काही देण्याच्या मनस्थितीत तो आहे का, याचा आपण विचार तरी करतो का… ?

आणि हा… ???

ज्याला आजपर्यंत लोकांनी भिकारी म्हणून दूर लोटले, अशा या माणसामध्ये समोरच्या व्यक्तीची परिस्थिती जाणून घेऊन मग आपली मागणी पुढे घेऊन येणे, तेही अत्यंत नम्रतेने…. हा संस्कार याच्यात कुठून आला असेल… ?

– – आपली वेदना कुणीतरी संवेदना म्हणून जपतंय याचा आनंद खूप मोठा असतो… !

डोक्यात हे विचार सुरू होते, मी गप्प उभा होतो, माझं हे गप्प बसणं म्हणजे त्याला नकार वाटला. माझ्या हातातून हात सोडवत तो अत्यंत नम्रतेनं पाया पडून निघाला, जाताना म्हणाला हरकत नाही सर, पुन्हा कधीतरी बघू, यावेळी त्याचा चेहरा रडवेला झाला होता…

…. चंदन हे शितल असतंच, पण मनापासून केलेलं वंदन हे त्याहून जास्त शीतल असतं…. !

ऑक्टोबर हिटच्या रणरणत्या उन्हात त्याचं वागणं म्हणजे थंडगार वाऱ्याची झुळूक वाटली मला….

बाब होती एका इस्त्रीची, आपल्या सर्वांच्याच घरात एखादी इस्त्री कुठल्यातरी कोपऱ्यात पडलेली असते, ही इस्त्री एखाद्याच्या जगण्याचं साधन बनून त्याला माणसात आणू शकेल, असा कधी विचारही आपल्या डोक्यात येत नाही.

(अशा अनेक वस्तू आपल्या घरात आजही पडून आहेत, ज्यांचा आपल्याला फारसा काही उपयोग नसतो, परंतु समोरच्या व्यक्तीला दिल्या तर यातून तो सन्मानानं जगू शकतो, असो, याविषयी पुन्हा केव्हा तरी)

मी त्याला प्रेमाने थांबवलं, ‘ इस्त्री ची किंमत काय आहे? ‘ 

‘सर धंद्याला लागणाऱ्या इस्त्रीची (Heavy Duty Commercial) किंमत जास्त असते साधारण साडेतीन ते चार हजार रुपये’ त्याने पुन्हा खाली मान घातली.

त्याला म्हटलं “ इथून पुढे चार दिवस बाजारात फिर, चांगल्यात चांगली heavy duty commercial इस्त्री शोधून ठेव. चांगल्यातल्या चांगल्या चांगल्या कंपनीची असावी, गॅरंटी वॉरंटी असावी, पैसे लागू देत कितीही…. येत्या दोन दिवसात आपण मोटरसायकल वरून जाऊ आणि तुला हवी ती इस्त्री घेऊन येऊ, करू आपण व्यवसाय सुरू…. ”

त्याचा विश्वासच बसेना, ‘खरंच सर? खरंच सर?? ‘ म्हणत चार वेळा तरी त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्याने ते पालथ्या-मुठीने पुसले.

‘दुकानाला नाव पण मी सोहम म्हणूनच देणार आहे सर’, हे बोलताना आनंद त्याच्या चेहऱ्यावर मावत नव्हता.

या जगात आईच फक्त अशी आहे…. जी नऊ महिने सांभाळते…… कळा सोसते, जन्माला घालते आणि जन्म झाल्यानंतर आनंदाने त्या बाळाला दुसऱ्याचं नाव देते… !

…. मला या आई सम हा वाटला…. !

येड्या म्हणत मी त्याला छातीशी लावणार, इतक्यात तो पायाशी झुकला, यावेळी त्याचा हात खरोखर चंदनासारखा भासला…. !

येत्या चार ते पाच दिवसात त्याला हवी ती इस्त्री घेऊन देण्याचे वचन देऊन मी तिथून निघालो.

गाडीवर पुन्हा पितृपक्षातील अन्नदानाचेच विचार…

आपण रोज अनेकांना अन्नदान करत आहोत, परंतु ते एका व्यक्तीला एकाच वेळी पुरते…

.. हा जेव्हा कामाला लागेल त्यावेळी तो रोजच्या रोज सन्मानाने स्वतः खाईल आणि स्वतःची ऐपत निर्माण झाल्यावर इतरांनाही नक्की अन्नदान करेल… !

.. आपोआप एक साखळी निर्माण होईल, अन्नदानाची आणि माणुसकीची सुद्धा… !

एका वेगळ्या अर्थाने पितृपक्षात घडलेले हे एक वेगळ्या प्रकारचे अन्नदान होते.

– – पितृपक्षात खऱ्या अर्थाने घडलेले हे अन्नदान माझ्यासाठी सर्वोच्च होते आणि पुढेही राहील…. !

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैं भी नाना! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

☆ “मैं भी नाना!”  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

☆

मैं भी नाना!

सामान्य जनता एकेरीच संबोधते अशा माणसांच्या यादीत नाना पाटेकरही आहेत. ते आज गेले आणि प्रथेप्रमाणे मिडिया, वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या प्रसिद्ध लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहेत. या प्रतिक्रियांमध्ये नाना कसे होते हे पाव भाग आणि ते मला मी कसा भारी, महान इत्यादी आहे हे म्हणायचे हा उर्वरीत भाग असतो, हे लक्षात येतेच. असो.

जी गोष्ट मी इथं आता लिहितो आहे, ती मला गेल्या कित्येक वर्षांत जाहीर सांगायची होती आणि नशिबात असेल तर प्रत्यक्ष नानांच सांगायची होती! तो प्रसंग आता आयुष्यात येणार नाही!

मी आता ५९ वर्षांचा झालो आहे आणि त्यासाठी मला स्वत:ला काहीही करावं लागलं नाही. पण माझ्या आयुष्यात असा चार-दोन वर्षांचा काळ येऊन गेला की बरेच लोक मला नाना म्हणून संबोधायला लागले… ते का हे मला अगदी सुरुवातीला उमगले नव्हते. १९९३ वर्ष होते आणि मी एका महाविद्यालयात नियमित शिकण्याचा जाण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यावेळी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावेत इतके पैसे जवळ नसायचे. आणि त्यामुळे चित्रपटगृहांकडे फिरकण्याचीही फारशी वेळ येत नसे. नव्याने प्रदर्शित होणार असलेल्या, झालेल्या चित्रपटांची पोस्टर्स तिथेच बाहेर लावलेली असायची. क्रांतिवीर प्रदर्शित झाला त्याचे पोस्टरही त्यामुळे माझ्या पाहण्यात आलेले नव्हते. विविध भारती रेडीओ स्टेशनवर चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी श्राव्य कार्यक्रम लागत असत. त्यातही क्रांतिवीर कानांवर पडला नाही.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या एका युवक महोत्सवासाठी मी अमरावती विद्यापीठात गेलो होतो. या महोत्सवात मी एका नाट्यात भाग घेतला होता आणि निवेदकाचं काम पार पाडलं होतं… नाटक संपलं आणि प्रेक्षकांतून आवाज आला… ए… नाना! ही आरोळी काही चिडवणे या प्रकारातील नव्हती.

नंतर कुणीतरी मला असं सांगितलं की क्रांतिवीर हिंदी चित्रपट आला आहे, त्यात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहेत… आणि तुझा आताच अवतार दिसतो तसाच नानांचाही आहे… अर्थात थोडाफारच! बारीक केस, बारीक दाढी, भेदक डोळे आणि मुख्य म्हणजे वेगवान गोलंदाजासारखं भरभर बोलणं! त्यावेळी माझी शारीरिक ठेवणही जवळजवळ तशीच होती. पण नानांशी साधर्म्य असलंच तर अगदी दोन एक टक्के असावं. पण बोलण्याची पद्धत नाना ज्यावेळी वेगवान संवाद म्हणतात तशी होती आणि आहे. अर्थात संवादाची ती शैली नानांची स्वत:ची आहे… आणि माझा वाचादोष! नानांचे संवाद लोकांना समजत होते म्हणून आवडत होते… तसं माझं नाही…. जे माझ्या दीर्घ सहवासात आहेत त्यांनाच सवयीने माझे बोलणे समजू शकते. इतरांसाठी वंदे भारत जवळून निघून जावी आणि डबे मोजता येऊ नयेत.. अशी स्थिती होते. खरं तर मी भाषण करायला नको… मात्र मला ती करावी लागत. आणि भाषण करताना करताना मानसिक तणावामुळे कदाचित या स्पीडला ब्रेक लागत असावा. अमरावती विद्यापीठाच्या त्या कार्यक्रमात मला गटप्रमुख म्हणून एका विषयावर बोलणे भाग होते… मी बोललो… आणि काही क्षणांसाठी नाना झालो बहुदा.

१९९१ मध्ये नानांचा ‘प्रहार’ येऊन गेला होता.. पण पाहता आलेला नव्हता.. पण विषय माहीत झाला होता… भारतीय लष्कराचा विषय हाताळला होता त्यात. त्यावेळी मलाही लष्करातच जायचं होतं… आणि त्यामुळे बोलण्यात, वागण्यात त्याचं प्रतिबिंब पडणे साहजिकच होतं. त्यावेळी स्वत:चे फोटो फक्त कॉलेज आय कार्डसाठीच काढावे अशी आर्थिक स्थिती होती. पुढे भोपाळ विद्यापीठातही अशाच एका कार्यक्रमासाठी निवडलो गेल्याने जावेच लागले… अर्थात अवतार तसाच होता. मूळात त्या कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा साहेब यायचे असल्याने तपासणी कडक होती. मला पोलिसांनी आत सोडलं नव्हतं सुरुवातीला… विविध कागदपत्रं दाखवावी लागली. याही कार्यक्रमात मी बोललो आणि माझ्यावरच नाना शिक्का त्यावेळेपुरता तरी पक्का झाला. कालांतराने शारीरिक बदल होत गेलेच. आणि माझ्यात नाना आता औषधालाही उरलेले नाहीत!

मी नानांच्या आवाजाची, संवादफेकीची नक्कल करावी, असे मला सुचवले गेले होते. हा प्रयत्न मी कधीच केला नाही. नानांच्या आवाजाची नक्कल सर्वांत जास्त केली जाते हे सर्वांना ठाऊक आहे. याबद्दल विचारले गेले की नाना म्हणायचे… माझ्या आवाजाच्या नकलेमुळे त्यांची घरं चालत असतील तर बरंच आहे की!

आधी प्रहारच्या रूपाने भारतीय लष्करविषयक प्रेम, त्यासाठी त्यांनी बेळगावच्या कमांडो प्रशिक्षण केंद्रात पूर्ण केलेलं प्रशिक्षण, त्यांचं कारगिलमधील प्रत्यक्ष सीमेवर जात सेवा बजावणं, पुढे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांसाठी केलेल्या अतुलनीय कामावर उमटलेली नाम-मुद्रा या वर इतर अनेक गोष्टींमुळे नाना आपले वाटत गेले. त्यांच्या सारखं आपल्याही वागता, बोलता आलं पाहिजे असं अनेकांना वाटतं यात नवल नाही. ANGRY YOUNG MAN म्हणून अमिताभ बच्चन यांनी त्यांची एक IMAGE उभी केली होती. नानांना यासाठी विशिष्ट वयोगट लागला नाही…. ते ANGRY MAN म्हणून जनमानसात रुजून गेले!

नानांना सतत काहीतरी व्यक्त करायचं आहे, असं त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत वाटत राहायचं आणि ते तसं निर्भीडपणे करीतही असत. नाम अर्थात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नावांच्या आद्याक्षरांनी बनलेलं नाम फौंडेशनच्या माध्यमातून नानांनी उभं केलेलं काम त्यांच्याविषयीचा आदर कमालीचा दुणावून गेलं. अशा नानाविध बाबी सांगता येतील आणि येणा-या ब-याच दिवसांत नाना चर्चेत दिसत राहतील.

अशाच एक मुलाखतीत नाना अगदी उद्वेगाने म्हणाले होते… ”विहिरीच्या काठावर बसावं… एकटंच. जवळपास ऐकायला, बघायला कुणीही नसावं, दोन कॅमेरे लावावेत आपल्यावर रोखलेले आणि सांगून टाकावं…. सगळं खरं खरं…. आणि मग.. ! ” पुढचे ते काही बोलले नाहीत…. आपण समजून घ्यायचं!

आता त्यांना जे सांगायचं होतं ते त्यांच्यासोबत चितेत जळून जाईल… ते उठून म्हणतील कदाचित.. आ गये मेरी मौत का तमाशा देखने!

असो. आपण नानांसारखं असावं, असं वाटण्यात काहीही गैर नाही… पण तसं कुणी असू शकतं का?

मी शोधाशोध केली तर माझा नानासदृश अवतारातील एखादा फोटो गावेलही कुठं तरी.. पण तो कुणाला दाखवण्याची हिंमत मी करणार नाही…. कुठं नाना आणि कुठं मी? मी फार तर मनातल्या मनात म्हणून शकेन… मैं भी नाना!

(नानांना भावपूर्ण निरोप देताना मनातलं.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares