प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

☆ संध्यागंध… ☆ प्रा. भरत खैरकर ☆

दूरवरून गावाकडे बघताना विखुरलेली मातीची घरं.. विस्कटलेल्या माणसांचा समूह.. त्यांच्या जिवंत गाथा. निसर्गाने रचलेली.. काळाने घडवलेली आणि माणसाच्या श्रमांनी सजवलेली भूमी मी जेव्हा गावाच्या बाहेर एका कडेला उभा राहून सभोवताली पसरलेल्या या दृश्यांकडे पाहतो, तेव्हा माझ्या डोळ्यांत आयुष्याचा एक खोल अर्थ उलगडतो.

सकाळी उगवलेला सूर्य जेव्हा संध्याकाळी थकलेल्या पावलांनी डोंगरामागे उतरण्याच्या तयारीला लागतो, तेव्हा गावाला एक खास रूप येतं. शेतांच्या पिकांवर.. घरांच्या कौलारांवर.. पडलेली किरणं सोनेरी शाल पांघरतात. भाताच्या पिकावर चमकणारे सायंतीचे रूप.. बाजरीच्या कणसांवर घरी परतण्याआधी बसलेली पाखरं आणि शेतमजुरांच्या कपाळावरचा घाम.. या साऱ्यांचा मनोहर संगम संध्यागंधात एकरूप होऊन जातो.

गावाभोवतीच्या दऱ्याखोऱ्या काळाने कोरलेल्या खोल खोल गावच्याच ललाट रेषा असल्यासारख्या वाटतात. नदीचं वाहणारं पाणी खळखळाट करीत खाली उतरतं आणि त्या पाण्याच्या सुरेल लयीत गावाची धडधड.. धडपड आणि श्रम मिसळतात. हे सगळं एकाच वेळी भव्य.. आपुलकीचं.. आपलंसं आणि हवहवसं वाटतं.. उन्हाळ्यात याच डोंगररांगा गावपायथ्याशी वारा अन् गार सावली आणतात तर हिवाळ्यात डोंगराची शांतता अंगावर घेत गाव झोपून जातं!

गावाजवळच्या जंगलाचा सुगंध वेगळाच आहे. कडुलिंबाच्या पानांतून येणारा कडसर गंध, आंब्याच्या झाडाखाली पिकलेल्या फळांचा गोड वास, तर कधी करवंदाच्या काटेरी झुडपातून येणारी आंबटसर चव—या साऱ्यात माझ्या बालपणाच्या पाऊलखुणा दडलेल्या आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट हे जंगलाचं गीत आहे. कोकीळेचा स्वर संध्याकाळी दुरून ऐकू आला की मनात एक मृदू आठवण दाटून येते.

आणि मग ती वेळ येते.. गुरंढोरं परतण्याची. हीच गावाची खरी संध्याकाळ. धुळीच्या पडद्यातून चालत येणाऱ्या गायी, बैल, म्हशी; त्यांच्या मानेतल्या घंटांचा झंकार; वासरांचे हंबरणे.. हे सगळं पाहिलं की पेंद्या, सुदामासह कृष्ण गाई राखून परतायचा त्याच ते धुळीचे माखलेलं “पांडुरंग “रूप आठवून गावकऱ्यांचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य ऊमलतं. लेकरं धावत अंगणभर हुंदडतात, “माझं वासरू आलं! ” अशी हाक मारत वासरांचे लाड करतात.. गोंजारतात.. घराघरांतल्या बायकाही हातात पाणी, गवत, वैरण घेऊन गोठ्याशेजारी उभ्या राहतात. गुरं-ढोरं अंगणात शिरली की जणू घरात प्राण फुंकला जातो!

याच वेळी गावावर एक वेगळाच गंध पसरतो. कुठे भाकरी भाजल्याचा, कुठे पिठल्याचा, कुठे खमंग फोडणीचा तर कुठे धुरकट लाकडाचा! सगळ्या घरांत चुली पेटतात आणि त्या धुरात कष्टाचा गोडवा मिसळतो. पुरुष मंडळी शेतावरून परततात, दिवसातील कष्ट आणि रानगप्पा घेऊन. कुणी मुलाला खांद्यावर घेतं, कुणी पत्नीला शेताची हकीकत सांगतं. त्या साध्या बोलण्यातही जीवनाचा गाभा.. मतितार्थ.. दडलेला असतो.

गावची ही संध्याकाळ म्हणजे फक्त एक वेळ नाही, तर तो एक संस्कार आहे! कष्टानंतरची विश्रांती, श्रमांतून मिळणारं समाधान, आणि निसर्गाशी एकरूप झालेलं जीवन आहे. शहरातल्या दिव्यांच्या झगमगाटात मला ही शांतता कधीच दिसली नाही. तिथे माणसं गर्दीतही एकटी वाटतात; पण इथे, या गावात, ती एकमेकांच्या जवळ असतात..

मी डोळे मिटून हा क्षण अनुभवतो. सूर्य डोंगरामागे हरवतो, आकाश गडद होतं, आणि तरीही गावाचा आत्मा उजळून निघतो. या क्षणी मला नेहमीच जाणवतं.. गाव म्हणजे फक्त भौगोलिक जागा नाही; गाव म्हणजे जीवनाची खरी शाळा आहे. आणि हा

संध्यागंध जीवनाची कस्तुरी आहे! त्यामुळे इथलं जगणं सुगंधी आणि मोहमयी होऊन गेलं आहे..

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted