श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ सामाजिक जाणिवेचा एक दुर्मिळ आविष्कार…– लेखक : श्री शिरीष वा. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

गेल्या शुक्रवारी सकाळी ग्राहक पंचायतीच्या न्यायालयीन कामासाठी फोर्टला कोर्टात जात होतो. त्या दिवशी कोर्टात फारसं काही होणार नव्हतं. त्यामुळे वाटेत मोबाईल वरचे मेसेजेस वाचायाला भरपूर वेळ होता. आलेल्या मेसेजेस मधे एक Hindustan Times मधे प्रसिद्ध झालेला लेखही होता. त्या लेखातील फोटो बघुन मी आश्चर्यचकितच झालो. अरे, हा तर आपला राघव! आणि तो चक्क एका Ambulanceमधे ड्रायव्हरच्या सीटवर बसून मस्त खुशीत हसतोय. आता अशा या Ambulanceमधे राघव हसत काय करतोय आणि तेही ड्रायव्हरच्या सीटवरुन? लगेच लेख झरझर वाचून काढला आणि मी अक्षरशः थक्क झालो. राघव प्रत्यक्ष समोर असता तर मी त्याला चक्क मिठीच मारली असती.

न राहवून मी राघवला फोन‌ केला आणि त्याचं भरभरून कौतुक केलं. पण तरी सुद्धा माझे शब्द कुठे तरी कमी पडत होते असं‌ वाटत होतं. मी त्याला तसं बोलूनही दाखवलं.

साहजिकच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राघवने असा काय पराक्रम केला की माझी ही स्थिती व्हावी.

राघवने स्वतःच्या खिशातले १७ लाख खर्च करुन चक्क एक ambulance विकत घेतली होती आणि १०० रुपयांत अॅम्ब्युलन्स सेवा नवी मुंबईतील रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिली. गेले तीन महिने राघव ही सेवा ड्रायव्हरच्या मदतीने नवी मुंबईतील रुग्णांना देतोय आणि त्याबाबत त्याला अतीव समाधान आहे.

राघवला हे सगळं करण्यासाठी नक्की काय कारण झालं? ड्रायव्हरसकट ambulanceच्या देखभालीचा महिन्याचा खर्चच साधारणपणे ३० हजार रुपये! असा आतबट्ट्याचा व्यवहार राघव किती काळ करणार?

राघव मला सांगत होता, चार‌ वर्षांपूर्वी त्याच्या आईला हाॅस्पिटल मधे नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स बोलवावी लागली. त्यावेळी त्याला ambulance साठी भरमसाठ किंमत मोजावी लागली होती. त्यावेळीच त्याच्या मनाने घेतले की या ambulance सेवेबद्दल काहीतरी करायला हवं. आणि चार वर्षांनंतर राघवला स्वतःलाच करोना संसर्ग झाला तेव्हा त्याने निश्चयच केला. करोनातून बरा होताच राघवने थेट स्वतःच्या पैशातून ambulance खरेदी केली आणि ठरवलं की नवी मुंबईत रुग्णांना १०० रुपयांत ही सेवा मी रुग्णांना उपल्ब्ध करुन देईन.

आणि आता गेले ३ महिने राघव नवी मुंबईतील रुग्णांना १०० रुपयांत ही ambulance सेवा उपलब्ध करुन देतोय. गेल्या तीन महिन्यांत ७७ फेऱ्या झाल्यात. कसा काय आहे राघवचा आजवरचा अनुभव? अतिशय मानसिक समाधान देणारा, राघव मला सांगत होता. रात्री खुप छान झोप लागते. आपण कोणासाठी काहीतरी मदत करु शकतो हे खुप सुखावणारं आहे. पण त्याहीपेक्षा ज्यावेळी त्या रुग्णांना आणि त्यांच्या नातलगांना भेटतो तेंव्हा त्यांच्या भावना ते ज्या शब्दांत व्यक्त करतात ते खूप सुखावणारं असतं.

राघव सांगत होता, एक २२ वर्षांचा कॅन्सरचा रुग्ण होता. रेडिएशन थेरपी साठी त्याला नवी मुंबईतील उळवे येथून सानपाडा येथे १३ वेळा जाऊन परत यायचे होते (१४ km चे अंतर). त्यासाठी त्याच्या वडिलांना एका ambulance सेवा देणार्याने खास सवलतीचा दर म्हणून प्रत्येक रिटर्न ट्रिपसाठी ७००० रुपये सांगितले. म्हणजे १३ ट्रिप्स साठी चक्क ९१ हजार रुपये! अर्थात या गरीब वडीलांना हे परवडणारे नव्हते. म्हणून अखेर त्यांनी एका cargo van ने त्या मुलाला रेडिएशन थेरपी साठी नेण्याची व्यवस्था करायचे ठरवले. पण सुदैवाने त्यांना त्याचवेळी राघवच्या १०० रुपयांच्या ambulance सेवेची माहिती मिळाली. आणि त्यांना राघवने (१३X२) २६ फेऱ्यांसाठी केवळ २६०० रुपयांत अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करुन दिली. कुठे तथाकथित विशेष सवलतीतील ९१ हजार रुपये आणि कुठे नाममात्र २६०० रुपये!

राघव ही अॅम्ब्युलन्स सेवा अत्यंत वाजवी किंमतीत उपलब्ध करुन देऊन थांबला नाहीये. अनेक वेळा तो रुग्णांबरोबर त्या अॅम्ब्युलन्स मधून त्यांच्या मदतीसाठी स्वतःसुद्धा जातो.

रुग्णांना अशी १००रुपयांत ambulance सेवा देऊन समाजाप्रती आपले देणे देणारा हा राघव नक्की कोण आहे? ४७ वर्षांचा तरुण राघव आज एका बहुराष्ट्रीय कंपनीचा Managing Director आहे. राघवच्या या अनोख्या सामाजिक योगदानाबद्दल मी त्याला आणखी बोलता केला तेंव्हा राघव म्हणाला आर्थिक दृष्ट्या मी खूपच चांगल्या परिस्थितीत आहे. माझ्यापुढे दोन पर्याय होते. एक पर्याय स्वतःसाठी नवी कोरी मर्सिडीज घ्यायची आणि दुसरा पर्याय ambulance विकत घ्यायची. मी दुसरा पर्याय निवडला, मी ambulance विकत घेतली आणि आज मी खुप सुखात आहे, राघव सांगत होता. व्यावसायिक स्पर्धेत टिकून करीअर करुन सर्वोच्च पदावरील एखादा तरुण असाही विचार करु शकतो आणि त्यापुढे जाऊन कृतीही करु शकतो हे आजच्या जगात खरंच दुर्मिळ आणि म्हणूनच कौतुकास्पद.

राघवला मी म्हटलं राघव तू जे करतोयस हे फार दुर्मिळ आहे. तुझ्या वयातले तरुण आज फक्त करीअर आणि पैशाच्या मागे लागलेले दिसतात. मोठमोठे 3 BHk, 4 BHK luxury अपार्टमेंट, बाहेर कुठे तरी फार्म हाऊस, मर्सिडीज, BMW ही त्यांची आजची स्वप्नं आणि status symbols असतात. सभोवतालच्या अशा वातावरणात तुझ्याकडे हे सर्व समाजासाठी करण्याची संवेदना कशी काय आली? 

राघव त्याचं श्रेय अर्थात त्याच्या आई-वडिलांना, त्याच्या पत्नीला आणि बहिणीला न विसरता देतो. साने गुरुजींची शिकवण, आई-वडिलांनी केलेले न पुसले जाणारे संस्कार, पत्नीची तगडी साथ आणि बहिणीचाही भक्कम पाठींबा यांच्या जोरावर मी हे सगळं करु शकलो असं राघव नम्रपणे सांगतो. आणि त्याचबरोबर मुंबई ग्राहक पंचायतीच्या मुशीत मी वाढलोय याचीही मला न विसरता आठवण करुन देतो.

होय, हा राघव म्हणजे आपला राघव नरसाळे. आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि आपल्या गिरगाव विभागाच्या अध्यक्षा अनुराधाताई नरसाळे यांचा सुपुत्र. ही राघवची एक ओळख. पण दुसरी ओळख म्हणजे राघव आपल्या संस्थेचा बरेच वर्षे सक्रीय कार्यकर्ताही होता. मला वाटतं साधारणपणे १९९१ ते १९९५ या काळात मी, विवेक पत्की, वर्षा राऊत यांनी तरुणाईला ग्राहक पंचायतीत आणण्यासाठी Young Consumer’s Club (YCC) स्थापन केला होता. त्यातील एक स्वयंप्रकाशी तारा म्हणजे राघव नरसाळे आणि दुसरा म्हणजे पराग रेडकर (सध्याचा कार्यकारीणी सदस्य).

राघव आज अभिमानाने सांगतो त्याचा हा ambulance प्रकल्प त्याने “शून्य अनुभव आणि अपार उत्साह” या जोरावर सुरु केलाय. तरुणांना त्याचं सांगणं आहे की एखादी कल्पना डोक्यात आली तर त्याचा नुसता विचार करत बसु नका. Just do what you believe in and the things will fall in place. And secondly, don’t wait for some one to help you. First help yourself and then see how people rush to help you.

असा आपला हा राघव नरसाळे. एका बहुराष्ट्रीय कंपनीचा MD असुनही समाजासाठी आपलं नि:स्वार्थी योगदान देण्यासाठी १०० रुपयांची ambulance सेवा गरजू, गरीब रुग्णांसाठी राबवून आजच्या तरुण, यशस्वी नवश्रीमंतांना एक चांगली दिशा दाखवतोय. सर्वच तरुणाईला यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे.

राघवचे संपूर्ण मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे जाहीर कौतुक करताना मला आज खूप आनंद होतोय आणि सार्थ अभिमानही वाटतोय. त्याचबरोबर अनुराधाताईंचे खास अभिनंदन. पुत्र असावा तर असा, असंच कोणाही मातेला वाटेल असे हे राघवचे समाजाप्रती योगदान. राघवला त्याच्या या संवेदनशील सामाजिक प्रकल्पाच्या भविष्यातील यशासाठी खुप खुप शुभेच्छा.

(या १०० रुपयांच्या ambulance सेवेसाठी 9820770021 या क्रमांकावर गरजूंनी संपर्क साधावा. ही सेवा सध्या नवी मुंबई क्षेत्रासाठीच उपलब्ध आहे.)

लेखक : श्री शिरीष वा. देशपांडे

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted