मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ ‘असे हे बंधन…’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

श्री अ. ल. देशपांडे

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ ‘असे हे बंधन…’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

हे दृष्य खरोखरच संवेदनशील मनाला आंदोलित करते.

राखीच्या निमित्ताने आलेल्या अनेक पोस्ट एकीकडे व ही एकच पोस्ट एकीकडे अशी तफावत आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी श्रम विकल्या जात आहे, श्रमाचे मोल पदरात केंव्हा पडेल ह्याची निश्चिती नाही.

तेव्हढ्यात आपल्या धाकट्या भावाला राखी बांधायला बहिणीने वेळ काढला आहे.

ना पाट ना थाट, ना निरांजन ना तबक, ना हळद ना कुंकू, ना सेल्फी ना कुल्फी (मिष्ठान्न).

आहे फक्त रेशीम बंध नावाचं लेणं, सुती धाग्याचं.

संस्कृती आणि परंपरेचे खरे पाईक हेच अभावातही स्नेहाची ज्योत तेवत ठेवणारे.

आणि म्हणूनच मी लिहीले आहे

“आइए हम इस मासूमियत का सम्मान करें “.

एव्हढं तरी आपल्याला झेपेल न!

 

© श्री अ. ल. देशपांडे

अमरावती

मो. 92257 05884

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गणपती बाप्पाच्या डायरीतून…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

🌸 विविधा 🌸

☆ “गणपती बाप्पाच्या डायरीतून…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

“चला पुन्हा एकदा १०/११ दिवसांसाठी पृथ्वीवर पाहुणे म्हणून जायची वेळ झाली. आजकाल ना नको वाटतं हे दर दर वर्षी तिथे जाणं. काय काय पाहावं लागतं, फार मनस्ताप होतो. पण काय करू, ठरवल्या प्रमाणे जावे लागेलच… उंदीरमामा, चला तयार आहात ना? “

“हुश्श, पोचलो एकदाचा, काय हे ट्राफिक या शहरात, किती गाड्या रस्त्यावर! काय चाललंय या देशात? मंत्री, पंतप्रधान राष्ट्रपती येणार म्हंटल्यावर रस्ते लोकांसाठी बंद करायची पद्धत आहे, पण माझ्यासाठी नाही, कसाबसा उंदीरमामांबरोबर पोहोचलो. सकाळी ९:३० पर्यंतचा मुहूर्त एका पंडितांनी पंचांगात दिला होता, म्हटलं आपल्यामुळे मुहूर्त चुकायला नको. पण दमलो बुवा. “

“सकाळी कोणी फिरकत नाही. संध्याकाळी कोणीतरी सहा वाजता येते. पडदा सरकवून जाते. दिवा बत्ती करून जाते. पुन्हा कोणी नाही. नगरसेवक नाहीत, आमदार नाहीत, पुन्हा स्वर्गात परत गेलो की इथला एकदा हिशोब पहिला पाहिजे, कोणी काय मागितलं, आणि आपण कोणाला काय काय दिलं ते. मीही विचार करतोय, या लोकांसारखेच, आपणही दर पाच वर्षांनी यावे काय? “

“आज एक नगरसेवक बाई आल्या होत्या सकाळीच. सोबत आमदार होते, त्यामुळे बाईंचे माझ्याकडे लक्षच नव्हते. त्या आमदारांच्याच सरबराईत गुंतल्या होत्या. रक्तदान शिबीर आयोजित केले होते. दोघांनी तिथे पण भाषण केले. शब्दाशब्दाला मला हसू येत होते. अख्ख्या ४ तासात अवघ्या १० लोकांनी रक्तदान केले. पण यांनी का नाही केले, आणि त्यांच्या टग्या कार्यकर्त्यांनी सुद्धा? ते नुसतेच गाड्या उडवत आले आणि गेले. कठीण आहे! पण सांगू कोणाला, १० दिवसांची शिक्षा आहे मला ही दरवर्षी! “

“दर वर्षी लोकमान्य मी स्वर्गात परत गेल्यावर विचारतात इथला इति-वृतांत तेंव्हा त्यांना मी हे काही सांगत नाही. उगीच बिचारे दु:खी व्हावयाचे. त्यांना उगीच अजून वाटते की, त्यांनी सुरु केल्याप्रमाणे हा उत्सव अजूनही चालतो, भजन, पोवाडे, भाव-भक्तीगीते, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, मोठ्या मोठ्या वक्त्यांची भाषणे, अहो लोकमान्य, ते शेवाळकर, शिवाजीराव, वसंतराव, भीमसेन आता तुमच्याच सोबत आहेत ना? मग भाषणे देणार कोण आणि शास्त्रीय संगीत गाणार कोण? “

“खरे तर हे दहा-बारा दिवस माझ्या कानावर उठले असतात आणि हृदयाचे धडधड वाढवत असतात. कारण तिथे फक्त मला कानठळ्या बसवणारा ‘डीजे’चा आवाज ऐकावा लागतोय. त्यांना वाटते माझे कान सुपाएवढे मोठे आहेत, त्यामुळे ते नक्कीच त्यांचा ठाणाणा सहन करू शकतात. त्याबरोबरच मला फालतू सिनेमातली गाणी ऐकावी लागताहेत आणि दारू पिऊन नंगानाच घालणारे दारुडे राजकीय कार्यकर्ते पहावे लागत आहेत. असो. आलिया भोगासी असावे सादर… “

“आज नववा दिवस. सत्यनारायणाची पूजा झाली. हुश्श जायचा दिवस जवळ आला म्हणायचा. आता शेवटचा एक दिवस स्पीकर वरून कोणतीही गाणी ऐकवून घेतील, असो, पण उद्या परत जायचे आहे. पूजेला पुन्हा नगरसेवक बाई आणि त्यांचे पतीदेव आले होते. जात पडताळणीच्या केस मधून सलामत सुटू दे असं काहीसे म्हणाल्या. हे काय असतं मला माहित देखील नाही. आणि श्रीमान नगरसेवक म्हणाले बाप्पा मध्यावधी निवडणुका होवू देत म्हणजे, हिलाच आमदारपदासाठी उभे करतो. सोबत त्यांचे चिरंजीव होते… म्हणाले, बाप्पा तेवढी जमीन लाटल्याच्या प्रकरणातून सोडव बाबा, आणि कित्येक दिवस आई-बाबांकडे एक ऑडी मागतो आहे, या वर्षी तरी मिळूदे बाप्पा. पूजा झाली, धार्मिक कार्यक्रम संपले, आता आयटम नंबरची गाणी सुरु. दरवर्षी माझ्या माहितीत भर पडते, इथे येऊन. मग मी ती स्वर्गात जावून इतर देवांना ऐकवतो. तसा माझ्या इतका मुक्काम एक देवी सोडल्यास कोणीच करत नाही ना इथे. ”

“अजून वाजले की बारा आहेच का? नवीन काय तर म्हणे हलकट जवानी? हे काय प्रकरण? बाकी शीला, मुन्नी, जलेबीबाई आता जुन्या झाल्या आहेत. सोबत गौतमी पाटील आणि त्यांची उत्तान लावणी होतीच. अरे भक्तांनो, मला उद्या जायचे आहे, तेव्हा आज तरी शांत झोपू द्या रेss. पण कसचे काय आणि कसचे काय! त्यांचा रात्रभर गोंधळ आणि धुडगूस चालूच होता. काय करणार सामान्य भाबड्या भक्तांसाठी सारे सहन करतो झाले. “

“आज जायचे म्हणून भल्या पहाटे उठून तयार होऊन बसलोय, पण अजून कोणी फिरकले नाही. आठ वाजले आता… “

“सकाळी ९ वाजता कोणीतरी आले. भूपाळ्या लावून गेले. सगळ्या देवांना उठवून झाले… घनश्याम सुंदरा… उठी श्रीरामा… उठ पंढरीच्या राया… उठा उठा हो गजानना… अरे देव म्हणजे काय तुमच्यासारखे आहेत का ९/९ वाजे पर्यंत झोपून राहणारे? “

“जायचे जायचे म्हणता, रात्रीचे ९ वाजलेच. संध्याकाळी सात वाजल्या पासून इथे नुसतेच एक ढोल पथक आणि झांज पथक वादन करतंय. पण जायचं कुठे अडलंय? समोर रांगोळी काढून झाली, मग निघालो, हळू हळू ठिकठिकाणी थांबत, महापौर, उप-महापौर, अनेक राजकीय पुढारी यांना दर्शन देत निघालो. महत्वाची माणसे ना ती! त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांना नारळ दिला, तो कशाला? या वर्षी इको फ्रेंडली म्हणत गुलाल नव्हता. ते एक बरे झाले, इतका उधळत असत तो, नंतर चार दिवस डोळे नुसते चुरचुरत माझे. एकदाचा नदीवर पोहचलो. मोठा जयघोष झाला. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! कुठेतरी आजी आजोबांचे डोळे पाणावले, काकूंना वाईट वाटले, बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावरचे हास्य मावळले मला निरोप देताना, त्या साऱ्यांसाठी तरी मला परत यायलाच हवे. मनात म्हटलं येतो बाबांनो! “

“पुनरागमनायच… ”

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाप्पाचा खरा संदेश – लेखक : श्री विनोद नाठे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ बाप्पाचा खरा संदेश – लेखक : श्री विनोद नाठे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

आज नाशिकमध्ये द्वारकेवरून नाशिक रोडकडे जात होतो.

द्वारकेच्या थोडं पुढे आलो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गणपती बाप्पांच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या दिसल्या. वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या रूपातल्या सुंदर मूर्ती होत्या.

लोकांची प्रचंड गर्दी होती.

कोणी आपल्या आवडीचा बाप्पा निवडत होतं, कोणी मूर्ती गाडीत बसवत होतं… कुठे वाजंत्री वाजत होती, कुठे ढोल-ताशे होते, तर कुठे बँड-बाजा सुरू होता.

लोक अगदी आनंदाने, उत्साहाने बाप्पांना घरी घेऊन जात होते.

ते सगळं दृश्य पाहून मी गाडी थोडी बाजूला घेतली आणि तिथेच उभा राहून ते सगळं बघत होतो.

 

तेवढ्यात तिथून माझा एक ख्रिश्चन मित्र जात होता.

त्याचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यानेही गाडी बाजूला घेतली आणि माझ्याजवळ येऊन उभा राहिला.

थोड्या इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या.

 

आणि अचानक तो मला म्हणाला,

“नाठे साहेब, तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारू का? ”

 

मी म्हटलं,

“अरे, राग कसला? विचार की! ”

 

तो म्हणाला,

“मला खरंच खूप दिवसांपासून एक प्रश्न पडला आहे. ”

 

मी म्हटलं,

“काय प्रश्न? ”

 

तो म्हणाला,

“हे बघा साहेब… तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना किती वाजत-गाजत घरी घेऊन जाता. एवढा उत्साह असतो… पूजा करता, आरती करता, धूप दाखवता, नैवेद्य दाखवता… दहा दिवस अगदी मनापासून त्यांची सेवा करता. ”

 

“पण माझा एक प्रश्न आहे…”

“दहा दिवस ज्यांना तुम्ही देव मानून एवढ्या श्रद्धेने पूजा करता, त्याच गणपती बाप्पांना अकराव्या दिवशी नदीत, विहिरीत किंवा पाण्यात नेऊन विसर्जित का करता? ”

“म्हणजे मला हेच कळत नाही…”

“ज्यांना तुम्ही देव मानलं, त्यांची पूजा केली, त्यांच्यासमोर डोकं टेकवलं… आणि नंतर त्याच मूर्तीला पाण्यात बुडवता… हे चुकीचं वाटत नाही का? ”

 

त्याचा प्रश्न ऐकून मला खरंच खूप छान वाटलं.

कारण प्रश्न अगदी मनापासून विचारलेला होता.

 

मी त्याला म्हटलं,

“अरे वा! खूप छान प्रश्न आहे तुझा. ”

“आणि तुझ्या या प्रश्नाचं उत्तर तुला मिळायलाच पाहिजे. ”

 

तिथे खूप गर्दी आणि वाजंत्री सुरू होती. म्हणून आम्ही दोघं जरा बाजूला गेलो.

एका चहाच्या टपरीवर बसलो.

दोन चहा मागवले.

चहा घेत घेत मी त्याला म्हणालो,

 

“बघ मित्रा… गणेशोत्सव हा फक्त बाप्पांना घरी आणायचा, पूजा करायची आणि विसर्जन करायचं एवढाच विषय नाही. ”

“यामध्ये आपल्या आयुष्याचा एक खूप मोठा अर्थ दडलेला आहे. ”

तो माझ्याकडे बघत होता.

 

मी म्हणालो,

“तो अर्थ म्हणजे जन्म आणि मृत्यू. ”

“या जगात जो जन्माला आला आहे ना, त्याला एक दिवस जायचंच आहे. ”

“माणूस असो, राजा असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असो… कितीही मोठ्या पदावरचा माणूस असो… किंवा अगदी साधा सामान्य माणूस असो…”

– – जन्म झाला आहे म्हणजे मृत्यू अटळ आहे.

 

“पूर्वी काय होतं, माहिती आहे? ”

“आतासारख्या रेडिमेड गणपतीच्या मूर्ती दुकानात मिळत नव्हत्या. ”

“माती आणायची… त्यातून गणपती बाप्पांची मूर्ती स्वतः बनवायची… गणेश चतुर्थीच्या दिवशी तिची स्थापना करायची. ”

“दहा दिवस त्या मूर्तीमध्ये देव पाहायचा. ”

“मग मनापासून पूजा करायची, आरती करायची, नैवेद्य दाखवायचा, सेवा करायची. ”

“आणि दहा दिवस झाल्यानंतर…”

ज्या मातीपासून ती मूर्ती बनली, त्याच मातीत किंवा पंचमहाभूतांमध्ये ती पुन्हा विलीन करायची.

– – “यालाच आपण विसर्जन म्हणतो. ”

“म्हणजे आपण बाप्पांना पाण्यात बुडवत नाही आहोत…”

आपण आपल्याला एक गोष्ट आठवण करून देत असतो — जे आलं आहे, ते एक दिवस जाणार आहे.

 

मी त्याला म्हणालो,

“गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला हेच शिकवते. ”

– – “गणेश चतुर्थीला बाप्पा आले. ”

“दहा दिवस आपण त्यांच्यासोबत आनंदाने राहिलो. ”

“त्यांची पूजा केली, गोडधोड केलं, नैवेद्य दाखवला…”

“आणि मग अकराव्या दिवशी त्यांना निरोप दिला. ”

आपलं आयुष्यही अगदी असंच आहे.

 

“आपण या जगात येतो…”

“काही वर्षं राहतो…”

“घर बांधतो, पैसा कमावतो, मोठं होतो, पदं मिळवतो…”

“कधी सुख येतं, कधी दुःख येतं…”

“कधी आपली माणसं सोबत असतात, तर कधी ती आपल्याला सोडून जातात…”

“आणि शेवटी…”

आपल्यालाही सगळं इथेच सोडून जायचं असतं.

 

– – मग एवढा अहंकार कशाचा?

कशाचा गर्व करायचा?

कशासाठी कोणाचा द्वेष करायचा?

कशासाठी कोणावर राग धरायचा?

आपण या पृथ्वीवर कायमचे राहायला आलोच नाही आहोत.

आपण इथे काही दिवसांचे पाहुणे आहोत.

 

जसं आपण एखाद्याच्या घरी चार दिवस पाहुणे म्हणून जातो…

मस्त राहतो, आनंद घेतो, सगळ्यांशी प्रेमाने वागतो आणि वेळ आली की परत निघून जातो…

तसंच आपलंही आहे.

 

आपण या पृथ्वीवर आलो आहोत, काही ठराविक काळासाठी.

मग जोपर्यंत आहोत…

स्वतः आनंदाने जगा आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू द्या.

 

मी त्याला एक अजून गोष्ट सांगितली – – 

आपल्या ग्रामीण भागात पूर्वी अनेक ठिकाणी स्मशानभूमी गावाच्या जवळ किंवा अगदी गावाच्या मध्यभागी असायची.

त्यामागेही एक विचार होता.

माणसाला मृत्यूचं भान असावं.

रोजच्या रोज ती स्मशानभूमी दिसली की मनात एक गोष्ट यावी—

 

“एक दिवस माझ्याही देहाची माती होणार आहे. ”

मग कशाचा एवढा गर्व?

कशाचा एवढा अहंकार?

 

आज ज्याच्यावर रागावलोय, उद्या त्याच्याशी बोलण्याची संधी मिळेलच असं नाही.

आज ज्याच्याशी भांडलोय, उद्या तो आपल्यात असेलच असं नाही.

 

म्हणून…

मनातलं वैर ठेवू नका.

ज्याच्यावर प्रेम करता, त्याला आजच सांगा.

ज्याच्याशी भांडण झालंय, त्याला शक्य असेल तर आजच माफ करा.

कारण आयुष्य खरंच खूप छोटं आहे.

 

आणि गणपती बाप्पांचं विसर्जन आपल्याला दरवर्षी याच गोष्टीची आठवण करून देतं.

“आलो आहोत, एक दिवस जायचं आहे… म्हणून तोपर्यंत प्रेमाने राहूया. ”

 

मी हे सगळं सांगत होतो आणि माझा मित्र शांतपणे ऐकत होता.

शेवटी काही क्षण तो माझ्याकडे बघतच राहिला.

मग त्याने अक्षरशः हात जोडले आणि म्हणाला,

 

“नाठे साहेब… आज माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. ”

 

आणि तो म्हणाला,

“वा… धन्यवाद! ”

मी त्याला म्हटलं,

“मला धन्यवाद देऊ नकोस मित्रा. ”

“हा विचार फक्त माझ्यापर्यंत आणि तुझ्यापर्यंत ठेवू नकोस… पुढे घेऊन जा. ”

 

कारण गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणजे फक्त एका मूर्तीला पाण्यात विसर्जित करणं नाही…

 

ते आपल्याला जीवनाची जाणीव करून देतं – – 

जन्म आहे, म्हणून मृत्यू आहे.

मृत्यू आहे, म्हणून जगण्याला किंमत आहे.

 

म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे…

प्रेमाने जगा…

आनंदाने जगा…

दुसऱ्याला त्रास न देता जगा…

आणि शक्य असेल तितकं दुसऱ्याच्या आयुष्यातही आनंद निर्माण करा.

 

कदाचित…

हाच गणपती बाप्पांचा आपल्याला दरवर्षी मिळणारा खरा संदेश असेल.

 

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! !

☆

लेखक : श्री विनोद नाठे

भूमिपुत्र फाऊंडेशन  मो  098909 79097

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘सांवर सभा…’ ☆ राधिका -माजगावकर- पंडित ☆

राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘सांवर सभा…’ ☆ राधिका -माजगावकर- पंडित ☆

आमचं एक छोटसं ज्येष्ठ कनिष्ठ मंडळींचं एक मंडळ आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे आनंदी, उत्साही, निराश झालेले तरुण वर्ग आणि त्रासलेले, तसेच विविध स्वभावाचे हंसतमुख उमद्या व्यक्तिमत्त्वाचे आजीआजोबा आजी पण आमच्या हया ‘सांवर’ नावाच्या मित्र मंडळात आहेत.

आज अन्वयचा मूड ठीक दिसत नव्हता तर हात पाय गुडघे दुखतात म्हणून कार्लेकर आजोबा त्रासलेले होते. अशा बऱ्याच जणांची तब्येतीबद्दल कुरकूर तक्रार चालू होती.

मानकर काका म्हणाले “माझ्याच नशिबी कां ही गुडघेदुखी? आजी म्हणाल्या ह्या कमरदुखीने मी हैराण झाले आहे, देवा परमेश्वरा हे जीणं नको रे बाबा! कधी वर बोलावतोस नारायणा? ज्येष्ठांचे हे दुःख तर तरुण तगडाबाज अमर कुरकुरला,

” तुमचं ठीक आहे आजी वय झालंय तुमचं पण आमच्या पुढे उभं आयुष्य पडलय त्यातून एक्सीडेंटमध्ये माझं मनगट मोडलय, माझं का नशीब असं? माझाच कां एक्सीडेंट व्हांवा?

मी म्हणाले, अमर असा निराश होऊ नकोस.

अरे! झाला एक्सीडेंट, व्हायचं ते होऊन गेलंय आता तीच ती गोष्ट उगाळत न बसता पुढे काय करता येईल ते बघ. असाही पॉझिटिव्ह विचार कर की हातावरचं मनगटावर निभावलं जीव वाचला तुझा. लगेच दवाखान्यात उपचारही झाले आणि आता प्लॅस्टर काढल्यावर तुझं मनगट मोकळं होऊन, फिजोओथेरपी होऊन तु दणकट होणार आहेस. तरुण पोरं तुम्ही! म्हाताऱ्यांची काठी व्हायचेय तुम्हाला, मग ती काठी मजबूतच असायला हवी आहे हो ना? मोडून कसं चालेल 

तरी पण अमर निराशेने पुटपुटला, “आमचं नशीबच फुटकं माझ्या इतका त्रास कुणाला झाला नसेल” त्याला शांत करताना मला एक वाचलेली आदर्श कथा आठवली आणि ती अनुभव सिद्ध सत्यकथा ऐकायला जेष्ठांनी उत्सुकतेने कानात मशीन सरकवलं. तरुण मंडळी उतावळी होऊन पुढे सरकली.

मी म्हणाले तुमच्यासारख्याच तरुण जिद्दी तडफदार लेडीज डॉक्टरांची ही आदर्शवादी कहाणी आहे. अनेक जीवघेण्या संकटांशी सामना तिला करावा लागला सुरुवात झाली ती डोळ्यापासून, तुम्हा आम्हाला तरी देवाने हात पाय दिले आहेत. सुंदर डोळे दिलेत.. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.. म्हणतात ना ते अगदी खरं आहे. तिची नजरशक्ती कमी झाली नंतर डोकेदुखी सुरू झाली निदान होईना असहय डोकेदुखी पिच्छा सोडेना, निदान होईना. डोकेदुखी तिला सहन होत नव्हती. डोक्याचा MRI काढला 

ऐक अरे! सुधीर दुर्दैव तिच्या हात धुवून पाठीशी लागलं होतं. मेंदूच्या अगदी तळाशी कठीण जागी ट्यूमरची गाठ होती ती कमालीची हबकली कसली पण हा लढा तिला एकटीलाच द्यायचा होता की नाही! तिने स्वतःला सावरलं. डॉक्टरच होती ती पेशंटला सावरण्याची कला तिला चांगलीच अवगत होती आपण मनाचे गुलाम नाही व्हायचं तर मनाला लगाम घालून त्यालाच आपलं गुलाम बनवायचं. हे वाक्य तिने मनात ठसवलं आता स्वतःला सावरण्याची वेळ तिच्यावर आली होती डॉक्टर स्नेह्यांनी तिला फार मोठी मदत केली. त्यांनी तिला दिलासा देऊन कॉन्फरन्स मध्ये सामील केल. तू लवकरच पूर्ण बरी होशील हे आश्वासन देऊन ती गाठ काढण्यात आली.

पूर्ण हॉलमध्ये कमालीची शांतता होती मग पुढे काय झालं ही उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती मकरंदला रहावले नाही त्यानी सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारला, ” सांगा ना मॅडम पुढे काय झालं? कसली गाठ होती ती कॅन्सरची तर नव्हती ना? मी हसून सगळ्यांची उत्सुकता उलगडली. ” मकरंद नाही रे बाळा! जमेची बाजू ही की, गाठ कॅन्सरची नसून ब्रेन ट्यूमर होता.

सगळ्यांनी एकदम निश्वास सोडला इतकी आमची ही मंडळी प्रसंगाशी एकरूप झाली होती. मी कथेची गाडी पुढे चालू ठेवली मानसिक संतुलन सांभाळताना ती बहाद्दर डॉक्टर, छन्दाकडे वळली. मेंदूची आणि छंदाची सांगड घालून ती चित्रकलेकडे वळली छंदाच्या माध्यमातून तिने भावनेची वाट मोकळी केली.

” मॅडम निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे रेखाटली का त्या डॉक्टर मॅडमने? अनघाला कमालीची उत्सुकता होती.

” नाही अनघा ते वेगळे चित्र होतं आपण मनातलं शब्दात, कागदावर उतरवतो. तिने ते चित्रात उतरवलं. आणि बरं का! त्याचं वैशिष्ट्य, वैविध्य म्हणजे तिने मेंदुचे चित्रकाढलं. गाठ अवघड ठिकाणी होती पण ही अत्यंत कठीण शस्त्रक्रिया तिच्या डॉक्टर मित्रांनी किती कौशल्याने काढली, हे चित्र तिने

रेखाटलं इतर पेशंट पुढे मांडल तिचं उद्दिष्ट एकच होतं की कुठलाही रोग दुर्धर नसतो. संकटावर मात करून त्याला मागे सारून पुढे जाण्यातच सार्थकता असते.

नाना आजोबा म्हणाले,

” किती धैर्याची आहे पोरगी डॉक्टरांचेही आभार बोटातल्या कलेतून तिने मांडले ही पद्धत फार आवडली मला. अगदी वेगळ्या पद्धतीने कृतघ्नता व्यक्त केली आहे या कुशल आणि हुशार डॉक्टर महिलेने. “

मी म्हणाले, “नाना काका एवढंच नाही तर तिने हे पेंटिंग सेंटरला भेट दिलंते बघून इतर डॉक्टरटीम मग प्रेमाने जोमाने, पुढील यशस्वी कारकीर्दीसाठी सज्ज झाली. इतर निराश पेशंटनाही तिनेअसं दाखवून दिलं डॉक्टरमंडळींना अवघड केस यशस्वी करण्यात केवढं कसब पणाला लावावं लागतं, विज्ञान खूप खूप पुढे गेलं आहे. विज्ञान प्रगती खरंच कौतुक करण्यासारखीचं आहे” 

दातार आजी, “म्हणाल्या धन्य आहे ग बाई त्या डॉक्टरणीची आणि तिच्या चित्रकलेची. इतर पेशंटला एक नवीन धडा घालून दिला आहे तिने. पुढचं ऐकामंडळी तिने भेट दिलेलं चित्र हॉस्पिटलला हॉलमध्ये उभं आहे त्याखाली तिचं नाव गाव आणि शस्त्रक्रियेचा इतिहास तिने लिहिलाय. हॉलमध्ये प्रवेश करताना निसर्ग चित्राऐवजी हे आगळ वेगळं तैलचित्र माणसं बघतात. खाली लिहिलेला इतिहास वाचून अंतर्मुख होतात. ” 

हे सगळं ऐकून सुधांशु उस्फूर्तपणे म्हणाला, “खरं सांगू मॅडम माझ्या मनात आलंय जणू काही ते मेंदूचं चित्र सगळ्यांना सांगत असेल निराश होउ नका संकटाचा डोंगर ओलांडल्यावर आशेची सूर्यकिरणे समोर येतीलच. आम्हा तरुणांनाही हा बोध घेण्यासारखा आहे. मिस्कीलपणे हंसत पुढे तो म्हणाला, बरं का मित्रानो, पेशंट म्हणून नाही हं जायचं त्या दवाखान्यात पण ते ©®बोधचित्र पाहण्यासाठी आपण नक्कीचतिथे जाऊ आणि त्या हॉस्पिटलला भेट देऊ. सगळीकडून भरभरून होकार आला. अशा प्रकारे हसत खेळत कार्यक्रमाची सांगता झाली आणि आमची सांवर सभा संपली 

धन्यवाद.

© राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय सेनेचे पाच पांडव!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतीय सेनेचे पाच पांडव!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

☆

महाभारतात शंभर कौरवांचा पराभव करणारे सर्वच्या सर्व पाच पांडव एकाच आईच्या पोटी जन्मले नव्हते. युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन हे कुंतीचे तर नकुल आणि सहदेव हे माद्रीचे पुत्र होते.

परंतू आधुनिक महाभारतात अर्थात १९७१मध्ये पाकिस्तानी कौरवांविरोधात प्राणपणाने लढून विजयश्री खेचून आणणारे आपले हे पाच पांडव मात्र एकाच आईच्या पोटी जन्मले होते!

तो डोक्याने पहिल्यापासून बराचसा तापट पण अभ्यासात, खेळांत अतिशय वाकबगार होता. वडील लष्करी विभागात कनिष्ठ लिपिकाची नोकरी करीत इंग्रज आमदनीमध्ये. त्यामुळे या मुलाला ब्रिटीश आणि पुढे भारतीय लष्करी अधिकारी, त्यांचा रुबाब जवळून अनुभवता आला. डेहरादून येथे स्थापन झालेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (N. D. A.)मध्ये पहिल्याच तुकडीत लष्करी अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून हा नवतरुण त्याच्या अंगभूत कौशल्यांच्या बळावर गुणवत्तेवर निवडला गेला! त्याचे वडील आणि आई यांचा आनंदात गगनात मावेनासा झाला.

यथावकाश प्रशिक्षण सुरु झाले. आणि एक दुर्दैवी घटना घडली. एका अधिका-याने या नवोदित, प्रशिक्षणार्थी तुकडीतील एका गटाला जरा जास्तच शिक्षा दिली. त्याचा सूड म्हणून या तुकडीतील प्रशिक्षणार्थी तरुणांनी त्या अधिका-याच्या कार्यालयाची रात्री चोरून तिथे घुसून नासधूस केली. याचा तपास करताना अधिका-यांनी सर्व तुकडीवरच निलंबन कारवाई करण्याचे निश्चित केले. या गुन्ह्यात आपला कथानायक खरा नायक होता. पण आपल्यामुळे सर्वांचे नुकसान होऊ नये म्हणून याने सर्व दोष आपल्या शिरावर घेतला आणि अकादमीमधून निष्कासित अर्थात काढून टाकले जाण्याची शिक्षा स्वीकारली!

या धक्क्याने त्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले! आई खूप दु:खी-कष्टी झाली. हा थोरला मुलगा होता. त्याच्या पाठीवर आणखी चार भाऊ आणि दोन बहिणी होत्या. थोरल्यावर कुटुंबाचा भार आणि आशा-आकांक्षा होत्या, पण त्याच्या या कृतीने सर्व झाकोळले गेले! पण म्हणून या मुलाच्या आईने हिंमत गमावली नाही. तिने मुलाच्या प्रामाणिकपणाचे कौतुकच केले. आणि त्या मुलानेही मग लष्करात भरती होण्याचे स्वप्न साकार करण्याच्या जिद्दी पायी ‘शिपाई’ म्हणून लष्करी जीवन अंगिकारण्याचा निर्णय घेतला. परंतु NDA मधून झालेले निलंबन यात मोठा अडथळा असल्याने सर्वं मार्ग बंद झालेले होते! पण एका चमत्कार घडला!

प्रेमकुमार यांनी इंग्रजी भाषेत उत्तम प्राविण्य संपादन केले होते. त्यांनी त्यांच्या इतर भावांना आणि मित्रांनाही इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न केला होता. एकेदिवशी प्रेमकुमार जळणासाठी लाकूडफाटा गोळा करण्यासाठी मित्रांसमवेत डोंगरावर गेलेले असताना चांगल्या इंग्रजीत मित्रांशी संवाद साधत असताना लष्करी वसाहतीच्या एका इंग्रज लष्करी अधिका-याने त्यांचे बोलणे ऐकले. आणि त्या सर्व मुलांना क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी आमंत्रित केले. त्या सामन्यात उत्तम कामगिरी केल्याने त्याची तिथल्या ब्रिटीश कमांडंट साहेबांशी परिचय करून देण्यात आला.

पुढे लष्करी जवानांची भरती निघाली. प्रेमकुमार यांचा अर्ज अर्थातच त्यांच्या आधीच्या प्रकरणामुळे नाकारण्यात आला होता, पण विशेष बाब म्हणून ब्रिटीश कमांडंट साहेबांनी त्यांची शिफारस केली आणि अशा रीतीने प्रेमकुमार कुकरेती शिपाई म्हणून का असेना अंगावर लष्करी गणवेश परिधान करते झाले! त्यांना गढवाल रेजिमेंट मिळाली. पण तेथील अधिका-यांनी प्रेमकुमार यांना त्यांची क्रीडा पार्श्वभूमी, इंग्रजी संभाषण कला आणि अधिका-याला साजेसे नेतृत्वगुण लक्षात घेऊन त्यांना कुठल्याही बटालियनमध्ये न पाठवता रेजिमेंटमध्येच ठेवले. पण येथील जवान प्रेमकुमार यांना त्यांचे सहकारी जवान त्यांच्या पूर्वीच्या आयुष्यावरून चिडवत असत. यावर गांभीर्याने विचार करून प्रेमकुमार यांनी लष्करी अधिकारी होण्याचे मनावर घेतले. खूपच कष्ट घेत त्यांनी शेवटी IMA Indian Military Academy मध्ये प्रवेश मिळवला आणि ते अधिकारी बनले! त्यांना गढवाल रेजिमेंटमध्येच सेकंड लेफ्टनंट म्हणून नेमणूक मिळाली. त्यांचे NDA तुकडीतील प्रशिक्षणार्थी मित्र आता त्यांच्यापुढे चार वर्षे वरिष्ठ होते. त्यांपैकीच एका अधिका-याने कॅप्टन नय्यर जे त्यावेळी रेजिमेंटचे Adjutant होते, त्यांनी खास परवानगी घेत, स्वत: जाऊन प्रेमकुमार यांचे रेजिमेंटमध्ये स्वागत केले! एक चक्र पूर्ण झाले होते!

क्रिकेटचे उत्तम खेळाडू असल्याने प्रेमकुमार कुकरेती यांची भारतीय लष्कराच्या क्रिकेट संघात निवड झाली होते, ज्या संघाचे कर्णधार होते कर्नल हेमंत अधिकारी! प्रेमकुमार यांना राष्ट्रीय संघातून खेळण्याची सुवर्णसंधी मिळू शकली असती. पण जिथे धोका अधिक आहे, त्या भागात नेमणूक असल्यास अधिकचे वेतन, भत्ते मिळतात आणि शिवाय शौर्य गाजवण्याची इच्छा असल्याने प्रेमकुमार यांनी ही संधी नाकारली आणि ते लढाईवर रुजू झाले. १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात त्यांनी शौर्य गाजवले! १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात त्यांनी राजपूत बटालियनची धुरा सांभाळली!

त्या आधी त्यांनी आपल्या चारही भावांना लष्करात भरती होण्याची प्रेरणा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले आणि ते चारही बंधू लष्कराच्या विविध विभागांत रुजूही झाले. एकाच आई-बापापोटी जन्मलेले पाच सैनिक भारतीय सैन्यात एकाचवेळी कार्यरत होते, ही एक जगावेगळी बाब ठरली!

या बहादूर सैनिकांची नावे आहेत मेजर जगदीश प्रसाद, मेजर धर्मलाल, लेफ्टनंट कर्नल राकेश, नायब सुबेदार सोहनलाल!

१९७१मध्ये युद्धाचे ढग जमा होऊ लागले होते. त्यावेळी हे पाचही कुकरेती बंधू लष्करात सेवेत होते. थोरला तर आघाडीवर तैनात होता अधिकारी म्हणून. बाकी सुट्टीवर घरी आलेले होते. त्यांच्या मातोश्रींनी या चौघांच्याही कपाळांवर कुंकूम तिलक रेखला आणि सर्वांना आशीर्वाद देत सीमेवर भारतमातेच्या रक्षणासाठी मार्गस्थ केले!

सीमेवर असलेल्या मेजर जनरल प्रेमकुमार यांचे पत्र घरी पोहोचले त्यात ते लिहितात, ”माझी काळजी करू नका. शत्रू लबाड असला तरी आपले जवानांचा निश्चय अभेद्य आहे. आम्ही चिखलातून, जंगलातून, गोळीबाराच्या वर्षावातून पुढे पुढे चाललेलो आहोत… आमचे प्रत्येक पाऊल विजयाच्या दिशेने पडते आहे… घरी आमच्या सर्व मुलांना, भाच्यांना, पुतण्यांना सांगा… तुमचे सर्व काका, तुमचे मामा, तुमचे वडील शत्रूला नामोहरम करण्यात व्यग्र आहेत… आम्ही इतिहास घडवतो आहोत! ”

लेफ्टनंट कर्नल राकेश कुकरेती यांच्या तुकडीवर पाकिस्तानी सेनेच्या मागे जाऊन त्यांच्यावर हल्ला चढवण्याची मोठी जोखमीची कामगिरी सोपवण्यात आली. आपले सैनिक सलग तीन दिवस विना अन्न, पाण्याचे नव्वद पेक्षा अधिक किलोमीटर्सचे अंतर पायी चालले… वरून पाकिस्तानी मारा होत होता, आपले हवाईदल पाकिस्तानवर तुफान हल्ला करीत होते… सर्वत्र प्रचंड धोका होता. त्याही स्थितीत आपल्या थोरल्या भावाला राकेश साहेबांनी रेडीओ संदेश करून गोळीबाराचा आवाज ऐकवला होता आणि अतिशय शांतपणे म्हणाले होते, विजय आपलाच होईल. आणि तसेच झाले. राकेश साहेबांच्या तुकडीने उपाशीपोटी असूनही पाकिस्तानचा कडवा प्रतिकार मोडून काढला.

दुस-या आघडीवर लढणा-या नायब सुबेदार सोहनलाल कुकरेती यांनी सुद्धा तुफान कामगिरी बजावली. त्यांची चौकी पाकिस्तानी आक्रमणाने पुरती घेरली गेली होती. रात्रीचा समय होता. मदतीसाठी दुसरी तुकडी येण्यास काही समस्या होती. या सैनिकांनी रात्रभर ती छोटी चौकी लढवत ठेवली… पाकिस्तान्यांना पुढे येऊ दिलेच नाही. सकाळी मदत पथक आल्यावरपाकिस्तानी पळून जाण्यात यशस्वी ठरले!

उर्वरीत दोघे बंधू मेजर जगदीश प्रसाद आणि मेजर धर्मलाल Corps of Electronics and Mechanical Engineers (EME)मध्ये कर्तव्यावर असताना प्रत्यक्ष सीमेवर तैनात राहून लढणा-या सैनिकांना साहाय्य पुरवीत होते.

१६ डिसेंबर, १९७१ रोजी भारताचा विजय जाहीर झाला. कुकरेती कुटुंबातील हे पाच पांडव विजयी होऊनच रणभूमीवरून माघारी आले होते… मातोश्री त्यांच्या स्वागतास आरतीचे ताट घेऊन उंब-याबाहेर उभ्या होत्या… त्या म्हणाल्या… माझ्या पोरांनी भारतमातेची शान राखली! धन्य ही माता आणि धन्य तिची कूस… जिने एक नव्हे, दोन नव्हे, पाच पाच शूर पुत्र जन्मास घातले!

सर्वांत थोरले प्रेमलाल कुकरेती आसाम रायफल्ससे डायरेक्टर जनरल पदी पोहोचले आणि त्यांना सेना मेडल ने सन्मानित करण्यात आले. सर्वांत धाकटे राकेश कुकरेती लेफ्टनंट कर्नल बनले आणि त्यांनी शौर्य चक्र प्राप्त केले. एवढेच नव्हे तर राकेश कुकरेती साहेबांचे चिरंजीवही, कार्तिकेय कुकरेती सेनेत लेफ्टनंट कर्नल बनले आणि त्यांनीही सेना मेडल पटकावले. दुसरे अर्थ कुकरेतीही लेफ्टनंट कर्नल असून त्यांना Mention in Dispatches हे कौतुक पदक प्राप्त झालेले आहे. जय हिंद.. जय हिंद की सेना!

भारतच्या लष्करी इतिहासात कुकरेती बंधू ही मानाची पाच पानेच आहेत, असे अभिमानाने म्हणावेसे वाटते. त्यांच्याकडून प्रेरणा घेत अनेक तरुणांनी सेनेच्या सेवेचा ध्यास घेतला, ही उल्लेखनीय आहे! जय हिंद… जय हिंद की सेना..

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ DJ तर वाजलाच पाहिजे – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ DJ तर वाजलाच पाहिजे – लेखक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ ☆

☆

विसर्जन मिरवणुकीत बाप्पा चार दिवस ताटकळत बसला तरी चालेल,

पण DJ वाजला पाहिजे

 

स्पीकरच्या भिंतीआड बाप्पा कुठेतरी कोपऱ्यात दिसेनासा झाला तरी चालेल,

पण DJ वाजला पाहिजे

 

बावळट भाविकांना हात जोडण्यासाठी बाप्पाचं दर्शन होण्या आधी DJ चं नाव वाचता वाचता लेझर लाईटने डोळे फुटले तरी चालेल,

पण DJ वाजला पाहिजे

 

लोकांचे कान फुटले तरी चालतील, नाचताना रील बनवण्यासाठी हजारो लाखो जण येऊन चेंगराचेंगरी झाली तरी चालेल,

पण DJ वाजला पाहिजे

 

दारू पिऊन गुटखा आणि ड्रग्ज खाऊन शिवीगाळ करत आई माई काढत मिरवणुकीत पोरं नाचली पाहिजेत,

त्यासाठी DJ वाजला पाहिजे,

 

बाकी मूर्ख नागरिकांना इलेक्शनला हीच पोरं पैसे वाटायला आणि बाकी कामांना मदत करतील,

 मग त्यांच्यासाठी हा DJ वाजला पाहिजे

 

बिचाऱ्या महिला- पुरुष पोलीस बांधवांचे ब्लडप्रेशर वाढू देत नाहीतर त्यांच्या पायांचे, कंबरेचे तुकडे पडू देत, त्यांना झोप, आराम मिळाली नाही तरी चालेल,

पण DJ वाजला पाहिजे,

 

सव्वाशे दीडशे वर्षापासूनच्या चालत असलेल्या मिरवणुकीत 20-30 वर्षांपासून सुरू झालेल्या DJ संस्कृतीचा आदर आणि मान राखायला पाहिजे

आणि DJ वाजला पाहिजे,

 

दहा पंधरा लाख वोटिंगमधले शे दीडशे बहिरे झाले, हार्टफेलनी मेले तरी काय फरक नाही पडत,

म्हणून किमान, सोळा बेस सोळा टॉपचा फुल्ल मिड लावलेला, पाच पन्नास हजार वॅटच्या शे दीडशेच्या लेझर लाईटवाला

DJ तर वाजलाच पाहिजे

 ☆

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग ११ – ‘पती-पत्नी’ (संसार रथाची दोन चाके) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ महावस्त्राचे पदर – भाग ११ – ‘पती-पत्नी’ (संसार रथाची दोन चाके) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

‘संसार हैं इक नदिया, दुख-सुख दो किनारे हैं, ना जाने कहाँ जाएं हम बहते धारे हैं… ‘ जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं हे एक अतिशय सुंदर गाणं! मला नेहमी असं वाटतं की या गाण्यातील दोन किनारे म्हणजे पती आणि पत्नी; जणू संसाररूपी नदीचे दोन भक्कम काठ. संसार नावाची जीवनदायिनी नदी या दोघांमधून वाहत असते. सुख-दुःखाचे एकमेकांचे सोबती असलेले हे किनारे एकमेकांना सदैव सांभाळून घेत असतात. कोणीतरी खूप छान म्हटलं आहे, “संसार दोघांचा असतो, दोघांनी आवरायचा असतो; एकजण चुकला तर दुसऱ्याने सावरायचा असतो! ” काही काही वाक्ये सहजपणे संपूर्ण जीवनाचं सार सांगून जातात. पण हे तत्त्वज्ञान जोपर्यंत आपल्या अंतरंगात पोहोचत नाही, तोपर्यंत या सुंदर अशा सहजीवनाला प्रेमाचा खरा गोडवा प्राप्त होत नाही.

‘नात्यांच्या महावस्त्रा’तील हा असा एक मूलभूत पदर आहे, ज्यामुळे या महावस्त्राला एक देखणी चौकट प्राप्त होते; आणि त्यातूनच महावस्त्रातील पुढची सर्व नाती जोडली जातात. लग्न ठरवून केलेले असो की प्रेमविवाह, लग्नानंतर दोन वेगवेगळ्या घरांत, वातावरणात आणि संस्कारांत वाढलेले दोन स्वतंत्र जीव एकत्र येतात. ते प्रेमाच्या रेशमी धाग्याने असे काही घट्ट बांधले जातात की, नंतर त्यांना एकमेकांशिवाय एक क्षणही करमत नाही! जेव्हा पत्नी चार दिवस माहेरी जाते, तेव्हा पतीच्या मनातील व्याकुळता या शब्दात व्यक्त होते –

“नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो,

जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो… “

लग्नानंतर थोड्याच दिवसांत सुरुवातीचे रम्य आणि मोहक वातावरण ओसरून संसारातील वारा, ऊन आणि पावसाचे वास्तव समोर दिसायला लागते. मग जीवनात असे कितीतरी प्रसंग येतात, ज्यावर केवळ एकमेकांच्या भक्कम साथीनेच मात करता येते. मुलांच्या शाळा, त्यांची दुखणी-खुपणी, संसाराची ओढाताण आणि नातेवाईकांकडील सुख-दुःखाचे प्रसंग या सगळ्यांना ते दोघे एकत्र सामोरे जातात. घरात मूल आजारी असेल, तर दोघेही त्याच्या उशाशी रात्र-रात्र जागून काढतात. अशा वेळी पत्नीचे जागरण झाले असेल, तर पती मायेने म्हणतो, “तू थोडं खाऊन घे आणि विश्रांती घे; मी बसतो त्याच्याजवळ. ” कधी एखाद्या संकटात तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तेव्हा तो विश्वासाने पाठीवर हात ठेवून म्हणतो, “अगं, मी आहे ना… काळजी कशाला करतेस? ” आणि त्याच्या एका आश्वासक मिठीत ती स्वतःचे सगळे दुःख विसरून जाते. अशा वेळी पती जर कुटुंबाचा भक्कम आधारवड असेल, तर पत्नी त्या घराला ‘घरपण’ देणारी मंगलमय नंदादीप असते!

या नात्यात प्रेम जितके महत्त्वाचे, तितकाच आदर आणि एकमेकांच्या स्वातंत्र्याची जपणूकही मोलाची असते. ‘मी’ पणाचा त्याग करून जेव्हा दोघे ‘आम्ही’ होतात, तेव्हा संसाराचा हा रथ अतिशय सुरळीत चालतो. लहान-सहान भांडणे, रुसवे-फुगवे आणि पुन्हा एका मिश्कील संवादाने सर्व विसरून एकत्र येणे, हीच या नात्याची खरी गोडी असते.

‘नटसम्राट’ नाटकात मुले जेव्हा आई-वडिलांना घराबाहेर काढतात, तेव्हा अप्पा बेलवलकर आपल्या पत्नीची समजूत घालतात. तिला ते प्रेमाने ‘सरकार’ म्हणतात. त्या नाटकात दोघांनी शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना दिलेली साथ पाहिली की पती-पत्नीच्या नात्याची अलौकिक ताकद लक्षात येते.  

संसार तर सगळेच करतात; पण स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या पत्नी माई यांनी पती-पत्नीच्या या नात्याला केवढ्या तरी उत्तुंग उंचीवर नेऊन ठेवले! नुकतेच लग्न झालेले असताना, माईंच्या डोळ्यांत सुखी संसाराची स्वप्ने तरळत असताना सावरकरांनी स्वतःला मातृभूमीच्या स्वातंत्र्यसंग्रामात झोकून दिले. सावरकरांना अंदमानच्या काळ्या पाण्याची जन्मठेप झाल्यानंतर माई जेव्हा त्यांना तुरुंगात भेटायला जातात, तेव्हा पतीला बेड्या घातलेल्या अवस्थेत पाहून त्यांचे डोळे पाणावतात. त्यावेळी त्यांची समजूत घालताना सावरकर म्हणतात—

“माई, काटक्या एकत्र करायच्या आणि घरटं बांधायचं, त्या घरट्यात पोराबाळांची वीण वाढवायची ह्यालाच जर संसार म्हणायचा असेल, तर असा संसार कावळे आणि चिमण्या देखील करतात! पण जर अवघ्या देशाचा संसार सुखी करण्यासाठी, आपल्या सुखी संसाराची होळी करून स्वतःला यज्ञकुंडात आहुती म्हणून द्यावं लागत असेल, तर तो खरा संसार आहे! “

पतीच्या या राष्ट्रयज्ञात स्वतःच्या संसाराची समिधा करणाऱ्या माई आणि सावरकरांचे हे नाते त्यागाचे सर्वोच्च शिखर आहे.

लग्न झाल्यानंतर मुलाबाळांचे करता करता संसाराची अनेक वर्षे निघून जातात आणि आयुष्याचा पैलतीर दिसायला लागतो. उतारवयात कधी पती आजारी पडतो, तर कधी पत्नी. मुले जवळ असली तर चांगलेच; पण त्यांच्या भरवशावर न राहता दोघे एकमेकांना मायेने सांभाळून घेतात.

माझ्या डोळ्यांसमोर माझ्या काका-काकूंचे उदाहरण नेहमी येते. दोघेही सेवानिवृत्त झालेले होते. पुढे काकूंना अर्धांगवायूचा (पॅरालिसिस) झटका आला आणि त्यांचा कमरेखालचा भाग लुळा पडला. त्यांना चालता येत नव्हते, घरातील कामे करणे तर दूरच राहिले. अशा वेळी काकांनी त्यांची अपार सेवा केली. बाहेरगावी जायचा प्रसंग आला, तरी काका त्यांना व्हीलचेअरवर बसवून गाडीतून सोबत न्यायचे. काकूंना त्यांनी कधीही एकटे सोडले नाही; आमच्या डोळ्यांसमोर त्यांचा हा आदर्श कायम राहिला.

माझे वडीलही आपल्या आयुष्यातील शेवटच्या एक-दीड वर्षात अंथरुणाला खिळलेले होते. त्यांच्याकडून काही होत नसे; अशा बिकट वेळी माझ्या आईने त्यांची दिवसरात्र केलेली सेवा मी पाहिली आहे. एखाद्या लहान मुलाची काळजी घ्यावी, तशी त्यांची काळजी तिने घेतली. हेच खरे पती-पत्नीचे निस्सीम प्रेम!

जेव्हा आयुष्यभर साथ देणारा जीवनसाथी अचानक हे जग सोडून निघून जातो, तेव्हा मात्र पती असो की पत्नी, त्यांच्या आयुष्यात एक प्रचंड पोकळी निर्माण होते. मग उर्वरित आयुष्य ते केवळ ‘काढतात’; जोडीदाराशिवाय ‘जगणं’ त्यांच्यासाठी एक मूक अग्निदिव्य बनून जातं.

मला इथे पूर्वी वाचलेली एक सत्यकथा आठवते. एकदा एक वयोवृद्ध गृहस्थ हाताची जखम शिवून घेण्यासाठी डॉक्टरांकडे जातात आणि म्हणतात, “डॉक्टर, मला जरा घाई आहे, कृपया पटकन टाके काढा. ” डॉक्टरांनी विचारले, “का हो, कुठे जायची घाई आहे? ” ते म्हणाले, “मला माझ्या आजारी पत्नीला भेटायला जायचे आहे. ” डॉक्टरांनी सहज विचारले, “त्या कुठे आहेत? ” त्यावर ते गृहस्थ म्हणाले, “त्यांना ‘अल्झायमर’चा आजार आहे. त्या एका शुश्रूषागृहात उपचार घेत आहेत. मी रोज सकाळी त्यांच्यासोबत बसून नाश्ता करतो, आज मला थोडा उशीर झालाय. ” डॉक्टरांनी विचारले, “पण त्या तुम्हाला ओळखतात का? ” ते शांतपणे म्हणाले, “नाही, ती मला ओळखत नाहीत. ” डॉक्टरांना आश्चर्य वाटले, ते म्हणाले, “तरीही तुम्ही रोज न चुकता त्यांच्यासोबत नाश्ता करायला जाता? ” त्यावर त्या गृहस्थांनी दिलेले उत्तर काळजाला भिडणारे होते—”होय, ती मला ओळखत नसल्या म्हणून काय झाले? मी तर तिला ओळखतो ना! ” डॉक्टर नंतर म्हणाले की, हा रुग्ण मला आयुष्यातील प्रेमाचा आणि समर्पणाचा सर्वात मोठा धडा देऊन गेला.

आपल्या भारतीय संस्कृतीत या नात्याला ‘अर्धनारीश्वर’ संकल्पनेचे उदात्त अधिष्ठान लाभले आहे. शिव आणि शक्ती जसे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत, तसेच पती आणि पत्नी एकमेकांशिवाय अपूर्ण असतात. श्रीराम-सीता, विठ्ठल-रखुमाई यांच्यापासून ते इतिहासातील महर्षी कर्वे आणि बाया कर्वे, महात्मा गांधी आणि कस्तुरबा, सावित्रीबाई आणि जोतीराव फुले, बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्यापर्यंत… एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून समाज घडवणाऱ्या दांपत्यांची अनेक प्रेरक उदाहरणे आपल्यासमोर आहेत.

आजच्या धकाधकीच्या आणि विभक्त कुटुंब पद्धतीत पती-पत्नीचे नाते अधिक संवेदनशील झाले आहे. आज दोघेही नोकरी आणि संसाराची तारेवरची कसरत करत असताना एकमेकांना दिलेला वेळ, संयम आणि विश्वास हीच या नात्याची खरी ताकद ठरते. उतारवयात जेव्हा मुले आपापल्या विश्वात रमतात, तेव्हा हातात हात घालून एकमेकांची काठी बनणारे आणि आठवणींत रमणारे हेच पती-पत्नीचे नाते अखेरपर्यंत सोबत राहते.

कविवर्य बा. भ. बोरकर आपल्या एका कवितेत जोडीदाराच्या विरहाचे दुःख मांडताना म्हणतात—

“तू गेल्यावर, घरात देखील पाऊल माझे अडखळते,

आणि आटुनी हवा भवतीची, श्वासास्तव मन तडफडते.

. 

तू गेल्यावर, या वाटेने चिमणी देखील नच फिरके,

कसे अचानक झाले न कळे, सगळे जग परके परके… “

पती-पत्नीच्या नात्याचा हा पवित्र आदर्श भारतीय संस्कृतीने शतकानुशतके जपला आहे. नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा ‘पती-पत्नी’ नावाचा पदर विश्वासाचा, समर्पणाचा आणि अथांग प्रेमाचा सुगंध असाच सदैव दरवळत ठेवो!

 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आटपाटनगर… ☆ सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆

सुरेखा सुरेश कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ आटपाटनगर… ☆ प्रस्तुती – सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆

“ऐका गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मने, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे. तिथे विनायकाची देवळे. मनाचा गणेश मनी वसावा आणि त्याचा वसा घ्यावा.. ” चातुर्मास सुरू झाला की घरोघरी कहाणी संग्रह घेऊन त्याचे वाचन सुरू होई. सारे कुटुंब एकत्र येऊन बसायचे, वेळ संध्याकाळची. कामधाम उरकून कुटुंबीय निवांत होण्याची ही संधी असे. सांजवात लावून देवाला व ज्येष्ठांचा वंदन करावे. आणि कहाणीची सुरुवात करावी.

विशेष तर आषाढ अमावास्येपासून कहाण्या सलग येतात. श्रावण महिन्यात तर प्रत्येक वाराची कहाणी आहेच. रविवार आदित्य राणूबाईचा, सोमवार महादेव शंकरांचा, मंगळवारी मंगळागौर! बुधवार, बृहस्पती या बुद्धीच्या देवता. शुक्रवार जिवतीपूजन व लक्ष्मीचा वार, तर शनिवार हा शनि व मारुती यांचा पूजेचा वार. या सर्व वारांच्या कहाण्या खरंच वाचनीय आहेतच. त्यात जीवनाचा बोध असून तो रंजनात्मक आहे 

– – वसा म्हणजे व्रत. ते घेतले तर निभवावे. घेतला वसा टाकू नये. हेच रविवारची कहाणी सांगते.

– – सोमवारच्या दोन तीन कहाण्या आहेत. त्यात खुलभर दुधाची कहाणी साधी तरी बोधप्रद!

देवधर्म श्रद्धेने करावा, पण तो कुटुंबाला तृप्त करून व्हावा. गायीची वासरं, मुलंबाळं याना देऊन राहिलं ते दूध गाभारा भरायला पुरेसं झालं. ते अनुभवी आजीनी करून दाखवलं.

– – मंगळवारची कहाणी सांगते की नशीबात आहे तेवढंच घेऊन समाधानी असावं, हव्यास करू नये. तसेच गौरीचा पूजा ही निसर्ग पूजा आहे, पत्री, फुलं यांची छान माहिती करून घ्यावी व त्याचा उपयोग करावा. आहार, विहार, खेळ, रंजन याची स्त्रियांनीही योग्य सांगड घालावी. बुद्धी हे मानवाला मिळालेले वरदान आहे, त्याचा सदुपयोग करावा, ज्ञान मिळवून उपयोजन व्हावे. जिवतीची पूजा मुलांसाठी, त्यांना ओवाळून आयुरारोग्याचा आशीर्वाद मागावा.

कुटुंब आणि नाते संबंध यामुळे दृढ होतात. कुटुंब हा समाजाचा पाया होय. सुदृढ, उत्तम समाज ही आजही काळाची गरज आहे. ती या कहाण्यामधून पूर्ण होऊ शकते.

– – तसेच लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा, संपत्ती, दागदागिने नव्हे. ती तर चंचल असते. आज आहे, पण उद्या नसेलही! घरातील स्त्री ही खरी गृहलक्ष्मी, मग ती आई, पत्नी, बहीण, कन्या यापैकी असेल. तिला तिचा योग्य सन्मान मिळाला पाहिजे, हेच शुक्रवारच्या कहाणीत गोष्टीरूप सांगितले आहे.

– – शनिवार.. शनिदेवांची कहाणी. आपला देश शेतीप्रधान! कुटुंब सारे शेतीकाम व तेच उत्पन्न. या कहाणीत देव कुष्ठ्याच्या रूपात आले. त्यांचा पाहुणचार करावा, तर कोणी तयार नाही, ते काम धाकट्या सुनेने केले, मग घर समृद्ध झालं, धनधान्याने घर भरलं! कारण तिने देव ओळखला. गरीब, गरजू व निराधार याना मदत, हीच ईश्वर सेवा असते. हाच तर मानवता धर्म होय. माणूस म्हणून कसे असावे, आणि कसे नसावे हेच तर या कहाण्या सांगतात.

कहाण्या सांगितल्या, लिहिल्या तो काळ वेगळा, मान्य! आजच्या काळाची सूत्रे, मूल्ये काही प्रमाणात बदलली असतील, आहेत. तरीही माणूस तोच, त्याचे कुटुंब तेच आहे. त्याला संकटात आधार, पाठिंबा हवा असतो. ते मानसिक बळ त्याला यातूनच मिळू शकते. काही गोष्टी अतिरंजित वाटल्या तरी त्या रंग व रंजनासाठी असतात.

फलश्रुती वाचून आपणही हे करावे असे श्रद्धावान माणसाला वाटते. या नेम धर्मामुळे इंद्रिय निग्रह होतो.

मानसिक ताकद व आत्मविश्वास वाढतो. शिस्त व नियमितता वर्तनात सहज येते. साधे गाव, साधे कुटुंब यांच्या कथा आपल्याच वाटतात. यात कुटुंब, त्यातील व्यक्ती असतात. त्याचबरोबर चतुष्पाद प्राणी आपले सहाय्य करतात. त्यांचेही भले चिंतले आहे.

देव व पूजा या शब्दातच पावित्र्य, शुद्धता आहे. तिथे अमंगल येतच नाही. म्हणून घरचे वातावरण प्रसन्न होते. स्वयंपाक व प्रसाद खूपच गोड लागते. नेहमीपेक्षा अधिक स्वादिष्ट लागतात, कारण आपण देवपूजेकडे लक्ष देतो. देवाला नैवेद्य अर्पण करतो. (फक्त दाखवायचा नसतो.)देण्याचा आनंद फार मोठा असतो. हीच तर आपली घेतला वसा टाकू नये.. संस्कृती व परंपरा आहे. ती टिकवणे व पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे.

म्हणूनच हा वसा घ्यावा.

 

सुरेखा सुरेश कुलकर्णी

सातारा

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लंडन ब्रिज… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

डॉ. नेहा भटकर

? मनमंजुषेतून ?

☆ लंडन ब्रिज… ☆ डॉ. नेहा भटकर ☆

गोष्ट तशी लहानशीच, अगदी ध्यानीमनी नसताना कित्येक वर्षात पूर्णपणे विस्मरणात गेलेला, माझ्या लहानपणीचा म्हणजे ६० ते ७० च्या दशकातला एक खेळ, परवा मला माझ्या लहानग्या नाती सोबत खेळताना आठवला. त्याचं झालं असं की टीव्हीवर सुरू असलेलं “लंडन ब्रीज इज फालिंग डाऊन” हे बालगीत नाती सोबत एन्जॉय करत असतांना डोक्यात तार लकाकली अन् ध्यानी आलं की, आपण लहानपणी असंच काहीसं गाता गाता खेळायचो. आणि हो, हळूहळू मला तो खेळ व त्यासोबतच्या गाण्याची अगदी लख्ख आठवण झाली. कित्येक वर्षांनंतर ते गाणं कानी पडल्यामुळे खूप आनंद झाला परंतु आनंदाचं मुख्य कारण हे होतं की मला त्या गाण्यातील शब्द नेमकेपणाने काय आहेत हे कळलं. मला आजही आठवतं, लहानपणी त्या गाण्यातील कितीतरी शब्द आम्ही गाण्याच्या विशिष्ट चालीवर अगदी बिनधास्तपणे चुकीच्या पद्धतीने म्हणायचो व त्या गाण्याची पार वाट लावायचो (हे आमचा इंग्रजी सोबत परिचय झाल्यानंतर कळले). त्याला कारणही तसंच होतं म्हणा कारण बरीचशी गाणी मुखोद्गत पद्धतीने एका व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाकडून दुसऱ्या व्यक्ती वा समूहाकडे संक्रमित होत असताना शब्दांचे अपभ्रंश होत होत एक वेळ अशी येते की मूळ शब्दांचा थांगपत्ता लागणं फार अवघड होऊन जातं. असंच काहीसं या लंडन ब्रीज इज फॉलींग डाऊन किंवा माय फेअर लेडी या खेळामध्ये गायल्या जाणाऱ्या गाण्याचंही आमच्या बाबतीत झालंय; हे अगदी उघड होतं. आता तर ते शब्द तितकेसे स्पष्टपणे आठवतही नाहीत कारण ते त्या गाण्यातलेच काय पण तसेही खरेखूरे अर्थपूर्ण शब्द नव्हतेच मुळी. पुढे मोठेपणी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि भूमिका निभावताना निरनिराळ्या कामांच्या भाऊगर्दीमध्ये संपूर्णपणे विसरलेल्या अथवा कुठेतरी खूप लांबवर मागे सुटलेल्या खेळाची अशी आठवण झाली. पुन्हा एकदा त्या काळात रमायला मिळालं. आणखी एक महत्त्वाचं कारण असं की, कुतुहल चाळवलं आणि डोक्यात किडा वळवायला लागला आणि मी गुगलला हाताशी घेतले. गुगलनेही आपली भूमिका इमानेइतबारे पार पाडली. आज दुनिया मेरी मुठ्ठी मे असं आपल्या सर्वांना म्हणायला लावणाऱ्या गुगलबाबाच्या गुहेमध्ये मला हे गाणं व त्यासोबतचा खेळ आणि गाण्यामध्ये वारंवार उल्लेख होणाऱ्या लंडन ब्रीज बद्दलही आणखीन काही जाणून घेण्याचा योग आला. या तिनही बाबींची (गाणं, गाण्यातील लंडन ब्रीज आणि त्यासोबतचा खेळ) खरोखरीच अत्यंत मनोरंजक माहिती वेचता वेचता अगदी पार मागे बाराव्या शतकातील इंग्लंड पर्यंत कधी पोहोचले हे कळले सुद्धा नाही.

लंडन ब्रीज हा इंग्लंडमधील लंडन आणि साऊधक (Southwark) या दोन शहरांना जोडणारा थेम्स नदीवरील पूल. थेंम्स नदीवर रोमन काळात या दोन शहरांना जोडणारे बाराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत बरेच लाकडी ब्रीज होते. त्या सर्वांना लंडन ब्रीजच म्हणायचे परंतु या सर्वपरिचित बालगीतातील लंडन ब्रीज हा यापैकी कुठलाही लाकडी ब्रीज नव्हे. या बालगीतातील लंडन ब्रीज हा खरोखरीच बऱ्याच दुरुस्त्या वा प्रसंगी अगदी पुन्हा नव्याने देखील बांधलेला असून, लंडनच्या थेम्स नदीवर आजही आपलं ऐतिहासिक महत्त्व जपत संपूर्ण कार्यक्षमतेसह संपूर्ण लंडन निवासी आणि अगणित पर्यटक यांच्या सेवेत जवळपास दोन हजार वर्षांपासून ते आजतागायत दिमाखाने उभा आहे.

“लंडन ब्रीज इज फालिंग डाउन… ”, शेकडो वर्षे मागे, कुण्या अनामिक कवीने १७ व्या शतकात किंवा त्याही आधीच रचलेलं ‌हे बालगीत; मात्र ते पहिल्यांदा १८ व्या शतकाच्या मध्यात कवी टॉमी थंब यांच्या बालगीतांच्या पुस्तकामध्ये प्रसिद्ध झालं आणि हळूहळू जगभरातील इंग्रजी जाणणाऱ्या बहुतांश भागांमध्ये पोहोचलं. तसं नाही म्हणायला या गाण्याचीही स्थलकालपरत्वे बरीच वेगवेगळी शब्दरूपं बघायला मिळतात; मात्र “लंडन ब्रीज इज फालिंग डाऊन” ही ओळ सर्वत्र सारखीच आहे. थेम्स नदीवरील लंडन ब्रीजच्या वेळोवेळी होणाऱ्या दुरुस्त्या ध्यानात घेता कवीला सुचलेलं हे बालगीत असावं असा एक मतप्रवाह आहे. या बालगीताच्या जन्माच्या आधीही आणि नंतरही लंडन ब्रीजने स्वतःच्या रूपामध्ये व सोबतच आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये झालेली अनेक स्थित्यंतरे अनुभवलेली आहेत. इ. स. १२०९ मध्ये कोलचर्चमधील धर्मगुरू आणि आर्किटेक्ट असलेले पीटर यांनी प्रथमतः दगडांचा वापर करून बांधलेला थेम्स नदीवरील अठरा टोकदार कमानी असलेला हा देखणा लंडन ब्रीज. त्याने रहदारीची सोय तर झालीच, पण एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि लंडनच्या वैभवात आणि सौंदर्यात भर टाकणारं वास्तुशिल्प म्हणून सुद्धा तो नावारूपास आला. त्याच्या अरुंद कमानी खालून नदीपात्रातून बोटी पळवताना खलाशांना एक थरारक अनुभव येत असे. हा संपूर्ण इंग्लंडमधीलच पहिलावहिला दगडी लंडन ब्रीज इ. स. १२०९ पासून ते १८३२ पर्यंत एकंदरीत ६२२ वर्षे इतक्या प्रदीर्घ काळ सेवेत होता. या लांबलचक कालखंडामध्ये दोनदा तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला तर कधी प्रचंड हिमवर्षावाने देखील खचला तर अशी कित्येकदा त्याची पडझड झाली. कित्येक दुरुस्त्या नी डागडूज्यांना सामोरा गेला. नेमक्या याच ब्रीजला अनुसरून कवीने हे बालगीत रचलयं. कोणे एकेकाळी लंडनची शान असलेला तसेच या जगप्रसिद्ध बालगीताने अजरामर केलेला पण कालांतराने क्षीण झालेला, शिकस्त अवस्थेतील लंडन ब्रीज इसवी सन १८३२ मध्ये नष्ट करण्यात आला. मात्र तो जमीनदोस्त करण्यापूर्वीच ई. स. १८३० मध्ये जॉन रेनी नावाच्या स्कॉटिश इंजिनिअरच्या कल्पनेतून साकारलेल्या आराखड्यानुसार अधिक मजबुत परंतु दगडांच्याच पाच रूंद कमानी असलेला लंडन ब्रीज बांधून तयार होता. दोन्ही जागतिक महायुद्धांची झळ सोसलेला हा रेनीचा लंडन ब्रीज, सातत्याने १४० वर्षे सेवा देऊन कमकुवत झाला. पुढे बेसुमार वाढणाऱ्या जल आणि रस्ते वाहतुकीचा रेटा लक्षात घेता, अपुऱ्या भासणार्‍या या ब्रीजला सुद्धा मोडीत काढून पर्यायी ब्रीज बांधण्याची कल्पना समोर आली. १९६८ ते १९७२ या कालावधीमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानानुसार संपूर्णपणे काँक्रीट आणि लोखंडाचा वापर करून नव्याने बांधूनही झाला आणि त्याचे उद्घाटनही इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितिय आणि राजे एडवर्ड यांच्या हस्ते १६ मार्च १९७३ रोजी संपन्न झाले. लंडनच्या थेम्स नदीवरील लंडन ब्रीज म्हणून तो आजही प्रशस्त आणि भक्कमपणे उभा आहे. गोष्ट इतकी साधी सरळ असेल तर ते इंग्लंड कसले. इथेच एका रंजक प्रवासाची सुरुवात होतेय. त्याचं झालं असं की अपुऱ्या पडणाऱ्या रेनींच्या लंडन ब्रीजला पाडण्यापूर्वी, त्याला लंडन शहराच्या शासकीय यंत्रणेने लिलावात विकायला काढला आणि आश्चर्य म्हणजे तो अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतातील रॉबर्ट मॅक कुल्लोक नावाच्या व्यापाऱ्याने १९६८ मध्ये विकतही घेतला. गोष्ट येथे थांबत नाही तर त्या ब्रीजच्या दर्शनी भागात लागलेला एकेक ग्रॅनाईटचा तुकडा (ब्लॉक) अगदी काळजीपूर्वक सुटा केला, प्रत्येक तुकड्याला अनुक्रमांक दिला. ते संपूर्ण संख्येने दहा हजाराचे वर असलेले ग्रॅनाईटचे तुकडे समुद्रमार्गे, अटलांटिक महासागर, जगप्रसिद्ध पनामा कालव्यातून व पुढे प्रशांत महासागर असा मैलोनमैल लांबचा पल्ला पार करत अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील बंदरात वाहून नेले. येथून पुढे ग्रॅनाईट ब्लॉकची मध्य अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतापर्यंतची यात्रा भू मार्गाने व्हावयाची होती. रॉबर्ट मॅक कुल्लोक या व्यापारी महाशयांनी आधीच १९६४ मध्ये अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतामध्ये लेक हवासू सिटी नावाची वसाहत वसवली होती. तेथील हवासू सरोवरावर इंग्लंडहून विकत आणलेल्या या लंडन ब्रीजच्या ग्रॅनाईटच्या तुकड्यांचा अगदी नेमक्या क्रमवारीने अगदी जसाच्या तसा वापर करीत नवीन लंडन ब्रीज अर्थात न्यू लंडन ब्रीज उभारून १० ऑक्टोबर १९७१ रोजी रहदारीसाठी खुला करण्यात आला. जगभरातील पर्यटकांना अमेरिकेतील ॲरिझोना प्रांतातील लेक हवासू सिटी मधील कोलॅराडो नदीच्या हवासू सरोवरावरील हा वैशिष्ट्यपूर्ण न्यू लंडन ब्रीज, त्याच्या निर्मितीच्या मागे असलेल्या अनोख्या कथेमुळे, फार मोठ्या संख्येने आजही आकर्षित करतोय, त्यात नवल ते काय?

लहानपणीचा लंडन ब्रीज इज फालिंग डाऊन… , हा खेळ कदाचित कोणाला आठवत असेल किंवा नसेलही परंतु गंमत अशी की जेव्हा मी आंतरजालावरील वेगवेगळ्या संकेतस्थळांवर जाऊन बघितलं तर काय आश्चर्य, जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी अगदी आम्ही लहानपणी ज्या पद्धतीने खेळायचो अगदी तसल्याच प्रकारे खेळल्या जातोय; याची सचित्र माहिती वाचताना फार मजा वाटली. दोन मुलींनी समोरासमोर उभे राहून एकमेकींच्या हाताची बोटे एकमेकांमध्ये फसवून म्हणजेच चिक्की करून हात वर न्यायचे जेणेकरून त्यांची एक कमान होईल जी की जणू काही थेम्स नदीवरील सुप्रसिद्ध लंडन ब्रीजचीच कमान आहे असे मानायचे. हाताच्या कमानीचा ब्रीज बनवणाऱ्या दोघींनी लंडन ब्रीज इज फॉलींग डाऊन फालींग डाऊन माय फेयर लेडी… हे गाणं गायचं आणि त्याचवेळी खेळात सामील इतर सवंगडी कमानी खालून ओळीने एक एक करून जात असताना हळूहळू ती कमान खाली खाली घेत राहायची. कमानी खालून जाणारा एक एक गडी, संपूर्ण खाली आलेल्या हातांच्या ब्रीजमध्ये अडकवला जायचा. अडकवलेल्या गड्याला दोघींपैकी कोणाच्या बाजूला जायचे आहे, ते विचारायचे. इथे त्या दोघींना काल्पनिक नावे दिलेली असत. अशा तऱ्हेने संपूर्ण गडी दोघींमध्ये विभागल्यानंतर त्यांच्या शक्ती प्रदर्शनाचा खेळ सुरू व्हायचा. असा तो खेळ, उत्कंठावर्धक आणि तितकाच शक्तिवर्धक देखील. गाणं गाता गाता खेळताना केलेली धमाल मस्ती आणि प्रचंड हल्लागुल्ल्यासोबत आम्ही संपूर्ण वेटाळ अगदी डोक्यावर घेतलेल्या कितीतरी संध्याकाळी आज आठवतांना भारीच मौज वाटतेय. हे वेगळे सांगणे न लगे. या आठवणींच्या गुंताळ्यामध्ये मी रममाण झालेली असतांना लहानग्या नातीने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली “आजी तूला परत परत हेच गाणं का बरं ऐकायचं आहे ग, आता दुसरं काहीतरी नवीन खेळू या का आपण” आणि मी लंडन ब्रीज इज फॉलींग डाऊन, फॉलींग डाऊन, माय फेअर लेडी…. च्या आठवणीतून बाहेर आले.

 ┉❀꧁꧂❀┉

©  डॉ. नेहा विनोद भटकर

अमरावती

मो ९९७५०३०६२७ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दामोदर लीला ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ दामोदर लीला ☆ शालिनी जोशी ☆

रामावतारात वानरानी श्रीरामांची खूप सेवा केली होती. तेच वानर कृष्णावतारात गोप बनून त्यांचे सवंगडी झाले. भगवंत कधी उपकार विसरत नाहीत. दही, दूध खायला घालून श्रीकृष्णाने त्यांना पुष्ट केले. कोणाच्यातरी घरी लपून छपून जायच शिंकाळ्यातील दही दुधाचे कुंभ फस्त करून प्रसार व्हायचे. हा त्यांचा रोजचा कार्यक्रम होता. आजचा दिवस श्रीकृष्णाच्या घरी ठरला. आपले काम करून मंडळी गायब ही झाली.

हे यशोदेने पाहिले. चोरी करणाऱ्या कृष्णाला बांधून ठेवावे, म्हणून काठी घेऊन धावली. श्रीकृष्ण पुढे आणि काठी मागे अशी पळापळ सुरू झाली. पण यशोदा श्रीकृष्णाला धरू शकली नाही. काठी म्हणजे अहंकार, तो आहे तोपर्यंत भगवंत प्राप्ती नाही. शेवटी दमून यशोदेने काठी फेकली आणि श्रीकृष्ण तिला बिलगला. पण चोरीची सवय लागू नये म्हणून ती त्याला उखळाशी बांधू लागली. अहो आश्चर्य! दोरी दोन बोटे कमी पडू लागली. कितीही एकमेकाला बांधून वाढवली तरी दोन बोटे कमीच. त्या परब्रम्हाला कोण बांधणार? बांधण्याचा स्वभावच दोरीने सोडला. घरातल्या सगळ्या दोऱ्या संपल्या. गोपी थक्क झाल्या. पण यशोदेची फजिती पाहून हसूंही लागल्या. दोन बोटांचे अंतर म्हणजे अहंता आणि ममता. ही ज्याच्यात आहेत तो भगवंताला बांधू शकत नाही. त्रिगुणात्मक दोरीचा येथे उपयोग नाही. तेथे प्रेम रज्जूच हवा. यशोदा घामाने चिंब झाली. भगवंतांना तिची दया आली आणि स्वेच्छेने बांधून घेतले. पोटावरून दोरी बांधली. म्हणून दामोदर झाला. दाम म्हणजे दोरी. आईला प्रसन्न करण्यासाठी स्वतः बंधनात अडकला. दोरीने बांधला गेला. त्याला बांधून यशोदा स्वयंपाक घरात गेली. पण लक्ष कृष्णाकडे होते. आपण केलेले बरोबर का चूक या संभ्रमात पडली.

इकडे कृष्ण बंधनात आणि चारी बाजूने गोप सवंगडी जमलेले. पण कृष्ण वेगळ्याच विचारात होता. कृष्ण उखळाला ओढत अंगणात आला. अंगणातील अमलार्जुन वृक्षांच्या मधून जाऊ लागला. उखळ आडवे होऊन झाडात अडकले. कृष्णाने जोर लावताच दोन्ही रुक्ष उन्मळून पडले. तेथे दोन तेजस्वी पुरुष प्रकट झाले. ते पूर्वजन्मीचे राजा कुबेराचे पुत्र नलकुबेर आणि मणिरत्न होते. नारदांच्या शापाने वृक्षावतार झाले होते. कुबेराच्या धनाचा त्यांना मद झाला. म्हणून नारादाने त्यांना शाप दिलेला होता. भगवंताने दिलेल्या शरीराचा दुरुपयोग आत्मघाताला कारण होतो. तसेच झाले. पण भगवंताच्या चरणस्पर्शानेच त्यांचा उद्धार झाला. देवाने आपण बंधन स्विकारून पश्चाताप झालेल्या त्यांना बंध मुक्त केले.

झाड पडल्याचा मोठा आवाज ऐकून सर्व जमले. कृष्ण वाचल्याचे पाहून सर्वांना आनंद झाला. कृष्ण नंदाला बिलगला. मी तुमचा मुलगा आहे असे कृष्णाने आपल्याला म्हणावे, ही नंदांची इच्छा कृष्णाने पूर्ण केली. आणि आईला सांगितले मी तुझे प्रेमाचे बंधन कधीच विसरणार नाही. त्या बंधनात राहणेच पसंत करेन. देवाला प्रेमरसच आवडतो. तो इतर नऊ रसांपेक्षा श्रेष्ठ. हेच दामोदर लीलेचे फलीत.

कृष्णार्पणमस्तु

 

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares