श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पाऊणशे वर्षापूर्वीची पुणेरी विद्यार्थ्यांची दिवाळी – –‘ ☆ श्री दिवाकर बुरसे

अदमासे सत्तर-पंच्चाहत्तर वर्षापूर्वी पुण्यात दिवाळीच्या आधी घरपोच फटाके आणि दिवाळीच्या अभ्यंगाचे साहित्य उदा. सुगंधी तेले, उटणी, अत्तरे, उदबत्त्या वगैरे विकण्याचे काम विद्यार्थी उत्साहाने करत असत. त्यावेळी ‘पाॕकेट मनी’ ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. मुलांना सहसा हातखर्च करावासा वाटत नव्हता. त्यांच्यासमोर फारशी प्रलोभने नव्हती. पालकही त्याला प्रोत्साहन मिळेल असे वागत नव्हते.

दिवाळीच्या आधी काही दिवस मुले वही पेन घेऊन घरोघर फिरून ऑर्डरी घेत. ग्राहकांच्या एकूण मागणीनुसार घाऊक बाजारातून माल खरेदी करून तो नंतर घरोघर पोचवला जात असे. यात आगाऊ नोंदणी, मालाची खरेदी, मागणीप्रमाणे प्रत्येक ग्राहकाच्या सामानाचे स्वतंत्र संच करणे, पॕकिंग, वितरण इ. प्रक्रियांचा समावेश असे.

ह्यात केवळ होतकरू, गरीब विद्यार्थीच असत असे नाही. सुस्थितीत असलेल्या घरांमधली मुलेही हा व्यवसाय करत. त्यांचे पालक याला प्रोत्साहन देत. शाळांमधून यासाठी उत्तेजन दिले जायचे. मुलांच्या या उद्यमशीलतेला प्रतिष्ठा होती.

यातून मुलांमध्ये धीटपणा, वाणिज्य, व्यवहारचातुर्य, संभाषणचातुर्य, पैश्यांची हाताळणी, हिशेब ठेवणे, प्रामाणिकपणा, समयाचे नियोजन व महत्व, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, उद्यमशीलता, स्वाभिमान, स्वयंपूर्णता अशा अनेक चांगल्या जीवनोपयोगी सवयींचे व श्रेष्ठ जीवनमूल्यांचे प्रशिक्षण मिळत असे.

पुणे आणि पुणेकरांची टवाळी करणारांनी पुणेरी सर्वसामान्य पेठक-यांची शिक्षणाविषयीची जाण आणि भान लक्षात घ्यावे. पुण्याला ‘शिक्षणाची पंढरी’ का म्हणत असत ते समजून घ्यावे.

शुभ दीपावली!!!!!

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted