प्रा. भरत खैरकर

? इंद्रधनुष्य ?

श्री सचिन कुटे

☆ एक ‘सच्चा‘ कलावंत!! ☆ प्रा. भरत खैरकर ☆

चित्रकला मनातील भावना रेषा व रंगांत उतरवते, तर ॲनिमेशन त्या भावनांना आवाज व हालचाली देऊन जगासमोर उभं करते. चित्रकला म्हणजे आत्म्याची भाषा, आणि ॲनिमेशन म्हणजे त्या भाषेचा चालता-बोलता अनुवाद असं बोलल्या जातं. आणि हाच चालता बोलता अनुभव घ्यायचा असेल तर लोणावळा येथे दीड दोन वर्षांपूर्वी सुरू झालेले ट्रिक विजन संग्रहालय एकदा तरी बघावे असे आहेच.

ट्रिक विजन संग्रहालय लोणावळा हे थ्रीडी आर्ट आणि आभासी प्रतिमा यांचा सुरेख संगम असलेलं संग्रहालय आहे. ह्या ठिकाणी असलेल्या ५० हून अधिक अद्वितीय थ्रीडी सेटअप मुळे येणाऱ्या अभ्यागतांना किंवा पाहुण्यांना खूप मजा येते. परस्परांशी संवाद आणि मनाला मोहून टाकणारे फोटो आणि व्हिडिओ शूट ह्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करते. वैयक्तिक मार्गदर्शनासह.. संस्मरणीय छायाचित्रे काढण्यासाठी या ठिकाणी मदतनीस ठेवले असल्याने अजूनच मजा येते.

ह्या ठिकाणी डायनोसॉर पासून बचाव करत करत संपूर्ण कुटुंबासह बाहेर निघणे.. थ्रीडी इलेव्हशनचा वापर करून केलेल्या दऱ्याखोऱ्या पार करणे.. इजिप्त मधील पिरॅमिडला भेट देऊन तेथील मम्मीज सोबत फोटो काढणे.. खोल दरीमध्ये असलेल्या व्हर्टिकल पिलर वरून उड्या मारत पलीकडे जाणे.. आणि हे सर्व करत असताना किंचित एक्टिंग करणे म्हणजे केवळ मजा आणि मजाच आहे. डिज्नी वर्ल्ड किंवा समुद्र तळाची दुनिया ऑक्टोपस सह अनुभवणे.. जादूगाराच्या मदतीने काचेच्या बॉटलमध्ये स्वतःला बंद करून घेणे.. समुद्राच्या लाटेवर सरफिंग करणे.. ढगांमध्ये असलेल्या बर्फाच्छादित गावामध्ये सफर करणे.. समुद्राच्या तळाशी माशांसोबत केक कँडी आईस्क्रीम खाणे.. इत्यादी अद्भुत अनुभव तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता.. आता तर या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तुम्ही संपूर्ण संग्रहालयाचा सजीव असा अनुभव घेऊ शकता.. आणि ह्या सगळ्या गोष्टी करणारा.. करवून घेणारा जो कलावंत ह्या पाठीशी आहे.. तो आहे चित्रकार, वॉल आर्टिस्ट, ॲनिमेटर, एक शिक्षक सचिन कुटे!!

सचिन कुटे निगडी येथील सिटी प्राईड स्कूल ह्या नामवंत शाळेमध्ये मागील दहा वर्षापासून ॲनिमेशन डिपार्टमेंट सांभाळतात.. तत्पूर्वी ते हैदराबाद येथील फिल्म स्टुडिओमध्ये आर्टिस्ट म्हणून कार्यरत होते.. लोणावळा सौंदर्यीकरणामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.. त्यांनी रोटरी क्लब लोणावळा च्या माध्यमातून अनेक ठिकाणी जसे की लायन्स पॉईंट, भुशी डॅम, पोलीस ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी सौंदर्य करण्यासाठी मदत केलेली आहे. त्यांनी तुंगार्ली तलावाला स्वच्छ करण्यासाठी व परिसरामध्ये वृक्षारोपणासाठी आपला मित्रपरिवार व विद्यार्थ्यांची मदत घेऊन कार्य केले आहे. सचिनने आपल्या अनेक हॉटेल व्यवसायिक मित्रांना त्यांचे हॉटेल इंटेरियर डेकोरेशन करण्यासाठी.. हॉटेलला आर्टिस्टिक लूक देण्यासाठी मदत केलेली आहे.. लोणावळ्यातील अनेक राजकीय फ्लेक्स सचिनच्या चित्रकारितेतून साकारलेले आपणास पाहायला मिळतील.. चौका चौकातील झालेलं सौंदर्यीकरण किंवा कचऱ्यातून.. लोखंडी भंगारातून तयार झालेले ‘वेस्ट टू बेस्ट ‘विविध देखावे किंवा शिल्प त्यामागे सचिनचा मोठा वाटा आहे.

तसे पाहिले तर सचिनला कुटुंबामध्ये कोणतेही कलावंताचे बॅकग्राऊंड नाही.. फक्त जिद्द आणि आवड ह्या दोनच गोष्टींच्या बळावर ह्या पठ्ठ्याने साध्या पेन्सिलने सुरू केलेला हा प्रवास आता ए आय ॲनिमेटरपर्यंत पोहोचविला आहे.. तो एवढ्यावरच थांबला नाही तर थ्रीडी म्युझियम उभारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.. ह्यामागे त्याची अपार मेहनत कष्ट आणि जिद्द.. तसेच कुटुंबातील पत्नी अर्पिता हिचा व मुलगी गार्गी ह्या दोघींचा महत्वाचा वाटा आहे. येणाऱ्या काळामध्ये सचिनच्या हातून अद्भुत अशा गोष्टी डिझाईन थिंकिंग.. प्रोडक्ट डेव्हलपमेंट.. यांच्या माध्यमातून येणार आहे हे आम्हाला चांगले माहिती आहे!! म्हणूनच आमच्या ‘सच्च्या‘ला सचिनला त्याच्या पुढील प्रवासास हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments