श्री अनिल वामोरकर
इंद्रधनुष्य
☆ कवी आणि पाऊस… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
☆
पावसाकडे प्रत्येक कवी कसा वेगवेगळ्या सुंदर नजरेने पाहतो…
आणि कविता प्रत्येक पिढीनुसार कशी तरुण होते…
☆
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली;
*
नको नाचू तडातडा
असा कौलारावरून :
तांबे-सतेली-पातेली
आणू भांडी मी कोठून?
☆
– इंदिरा संत
कालचा पाऊस आमच्या
गावात आलाच नाही,
आम्ही आसवांनी शेते भिजवली…
*
– यशवंत मनोहर
☆
ए आई मला पावसात
जाऊ दे ।
एकदाच ग भिजुनी
मला चिंब चिंब होऊ दे ।।
मेघ कसे बघ
गडगड करिती ।
विजा नभांतुन
मला खुणविती ।
त्यांच्यासंगे अंगणात मज
खूप खूप नाचु दे ।।
☆
– वंदना विटणकर
☆
नभं उतरू आलं,
चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं,
हिरव्या बहरात ।।
अशा वलंस राती,
गळा शपथा येती ।
साता जल्मांची प्रीती,
सरंल दिनरात ।।
वल्या पान्यात पारा,
एक गगन धरा ।
तसा तुझा उबारा,
सोडून रीतभात ।।
नगं लागंट बोलू,
उभं आभाळ झेलू ।
गाठ बांधला शालू,
तुझ्याच पदरा ।।
– शांताबाई शेळके
☆
भेट तुझी माझी स्मरते
अजुन त्या दिसाची ।
धुंद वादळाची होती
रात्र पावसाची ।।
कुठे दिवा नव्हता,
गगनी एक ही न तारा ।
आंधळ्या तमातुन वाहे
आंधळाच वारा ।
तुला मुळी नव्हती बाधा
भीतिच्या विषाची ।।
☆
– मंगेश पाडगांवकर
☆
मन चिंब पावसाळी
झाडात रंग ओले ।
घनगर्द सावल्यांनी
आकाश वाकलेले ।।
पाऊस पाखरांच्या
पंखांत थेंब थेंबी ।
शिडकाव संथ येता
झाडे निळी कुसुंबी ।।
मन चिंब पावसाळी…
– ना. धों. महानोर
☆
ढग दाटून येईल,
झाड नवीन होईल…
☆
– अरुणाताई ढेरे
☆
मोकळा उदासीन वारा,
नभ भरून आले वरती,
गाण्याच्या जन्मासाठी,
अन मनात भिजते माती…
☆
– अरुणाताई ढेरे
☆
आला आला वारा
संगे पावसाच्या धारा ।
पाठवणी करा सया
निघाल्या सासुरा ।।
– सुधीर मोघे
☆
नाही कधी का तुम्हास म्हटलं,
दोष ना द्यावा फुका ।
अन् राया मला, पावसात नेऊ नका ।।
लई गार हा झोंबे वारा ।
अंगावरती पडती धारा ।
वाटेत कुठेही नाही निवारा ।
भिजली साडी भिजली चोळी,
भवतील ओल्या चुका ।।
अन् राया मला,
पावसात नेऊ नका ॥
– (लावणी) – वसंत सबनीस
☆
थेंबांना सावरलेल्या,
त्या गवताच्या काडांचा,
पाऊस पडून गेल्यावर,
मी भिजलेल्या झाडांचा…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





