मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ स्वातंत्र्याच्या इतिहासातील हरवलेली स्त्री-पाऊलवाट…कुयिली! (राणी वेलू नाचीयार) – लेख क्र. २ ☆ मंजिरी येडूरकर ☆

कुयिली! (राणी वेलू नाचीयार)

मी आज तुम्हाला एका राणीची गोष्ट सांगणार आहे. तामिळनाडूमधील शिवगंगाई संस्थानची राणी वेलू नाचियार हिची.

१७७२ साली शिवगंगाई संस्थानाचे दुसरे राजे मुथुवडुगनथ थेवर जवळच्या अर्किटच्या नवाबाशी युद्ध करीत होते. एरवी त्यांच्यासाठी ही लढाई किरकोळ होती कारण त्यांचे सैन्य युध्दात पारंगत व शस्त्रसज्ज होते. पण नवाबाला ब्रिटिश सैन्याचा पाठिंबा असल्याने व त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे असल्यामुळे शिवगंगाई संस्थानाचा पराभव झाला. युद्धात राजा मारला गेला. राणी वेलू नाचियार हिने सूड घेण्याची प्रतिज्ञा करून जवळच्या डोंगरात पलायन केले.

कुडचावडी येथे राहणारे शेतात काम करून स्वतःची गुजराण करणारे पेरियामुथन व राकू हे दांपत्य होते. यांच्या पोटी कुयिलीचा जन्म झाला. राकू ही शौर्यासाठी प्रसिद्ध होती. पण कुयिली लहान असतानाच एका जंगली बैलाकडून शेताचे होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करताना राकू मरण पावली. वडील पेरियामुथन दुःखाने खचून गेले. ते कुयिलीला घेऊन शिवगंगाई जवळ राहायला गेले. आणि परंपरागत येत असलेले चांभार काम करू लागले. असे म्हणतात की वडिलांकडून, आई राकूच्या शौर्याच्या कथा ऐकतच कुयिली मोठी झाली.

वेलुनाचीयार च्या माणसांना पेरियामुथन भेटला व त्याचा गुप्तहेर म्हणून उपयोग करून घेता येईल असे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी राणीला सांगून त्याला कामावर ठेवून घेतले. हेरगिरीसाठी पेरियामुथनला बाहेर जावे लागे. कुयिली घरी एकटीच असल्याने तिला राणीकडे कामाला बोलावले जाई. वनवासात गेलेल्या राणीला कुयिली बद्दल प्रेम निर्माण झाले. कारण तिने एकदा झोपेत असलेल्या राणीवर वार करणाऱ्या घुसखोराला प्रसंगावधान राखून मारले व राणीला वाचवले. यात कुयिली गंभीर जखमी झाली. पण राणीने तत्काळ आपल्या अंगावरची साडी फाडून जखमांवर मलम पट्टी केली आणि दोघींमध्ये प्रेमबंध निर्माण झाले.

मग राणीने कुयिलीला युद्धाचे म्हणजेच शस्त्राचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. तिला सिलंबम, (ही एक शस्त्रावर आधारित युद्धकला आहे,) शिकविणारे शिक्षक येत होते. त्यांच्या हालचालींवरून कुयिलीला वेगळीच शंका आली. मग तिने व्यवस्थित त्यांच्यावर लक्ष ठेवून पाहिले तेव्हा तिची खात्रीच पटली की ते शिक्षक फक्त राणीवर लक्ष ठेवण्यासाठी आलेले होते. म्हणजे शत्रूच्या गोटातील एक गुप्तहेर होते. तिला शंका आल्या क्षणी तिने योजनाबद्ध रित्या शिक्षकांना मारले. आणि राणीला वाचवले. अशा घटना घडल्यामुळे कुयिलीला राणीने सैन्याच्या महिला तुकडीची सरसेनापती बनवले.

ब्रिटिशांनी राणीच्या योजना कळाव्यात म्हणून कुयिलीवर निरनिराळ्या प्रकारे दबाव आणला. पण कुयिली बधली नाही. त्यामुळे मग त्यांनी दलितांवर अत्याचार करायला सुरुवात केली.

आता राणीने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी सुरू केली. ती धूर्त, राजकारणी होती. तिने सैन्य जमविले. आसपासच्या टिपू सुलतान, हैदर अली, मदुराईचा राजा अशा राजांबरोबर युती केली. प्रशिक्षित, शिस्तबद्ध सैन्य तयार केले. फक्त अडचण एवढीच होती की ब्रिटिशांकडे आधुनिक शस्त्रे असल्यामुळे, त्यांच्या माऱ्यासमोर आपली शस्त्रे टिकत नव्हती.

कुयिलीने आपली रणनीती आखली. शिवगंगाई कोट्टाई मध्ये (किल्ला) राजराजेश्वरी आम्माचे मंदिर होते. तिथे कुणालाही प्रवेश नव्हता कारण मंदिरात ब्रिटिशांचे शस्त्रागार होते. पण फक्त नवरात्रीमध्ये, फक्त स्त्रियांना, मंदिरात प्रवेश दिला जात होता. कु्यिलीने याचा फायदा घेण्याचे ठरविले. इकडे राणीने ब्रिटिशांवर अचानक हल्ला करण्याची तयारी केली. सर्व महिला सैनिक सामान्य वेशात होत्या. त्यांनी फळे फुले असणाऱ्या टोपल्यांमध्ये शस्त्रे लपविली होती. महिला सैनिक किल्यात शिरल्या. राणीचा इशारा होताच सैनिकांनी ब्रिटिशांवर हल्ला चढविला. अचानक हल्ला झाल्याने ते तयार नव्हते. शस्त्रे शस्त्रागारात होती. ती त्यांना मिळू नयेत म्हणून कुयिलीने तेथे असलेले तेल, तूप आपल्या अंगावर ओतून घेतले, शस्त्रागारात गेली, व स्वतःला पेटवून घेतले. सर्व शस्त्रे नष्ट झाली. ब्रिटिश सैन्य हतबल झाले. त्यामुळे राणीने नुसती लढाईच जिंकली नाही तर आपला किल्ला व आपले राज्यही परत मिळविले. कुयिली पहिला मानवी बॉम्ब ठरली. पण हा विजय राणीला आनंद देऊ शकला नाही. कारण गड आला होता पण सिंह गेला होता.

केवढा हा त्याग! केवढे हे धैर्य! केवढे हे समर्पण!!

– क्रमशः भाग २   

© मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted