श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “स्वप्न-वणव्याचा पाठलाग करणारा ‘वैशाख’!”  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

☆

त्याचं नाव ठेवताना आईवडिलांनी काय विचार केला होता कुणास ठाऊक… पण देवांच्या सैन्याचा सेनापती असलेल्या मुरुगन देवाच्या अनेक नावांपैकी एक नाव त्यांनी त्याला दिलं… वैसाख!

वैशाख हे एका महिन्याचेही नाव आहे… आणि वैशाखाची वणव्याशी अधिकची जवळीक!

तो नऊ वर्षांचा होता तेंव्हा त्याचे वडील हरिकुमार देवाघरी निघून गेले. त्याच्या मागे आता आई आणि बहीण ही दोनच माणसं उरली होती. वडिलांचं कर्ज घर, शेती विकून भागवलं गेलं आणि ही तिन्ही माणसं भाड्याच्या घरात राहायला गेली.

चिरंजीव वैसाख अर्थात वैशाखला लहानपणापासून बुलेट मोटारसायकलचं आणि वेगाचं खूप आकर्षण. कधी एकदा मोठा होतोय आणि बुलेटवर स्वार होऊन दूरच्या प्रवासाला निघतोय.. असं त्याला व्हायचं! जस जसं वय वाढलं तस तसं त्याच्या ध्यानात आलं की त्याची स्वप्नं खूप दूरवर उभी आहेत… त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप मुश्कील आहे!

आई कुठं तरी कामं करून घर चालवत होती आणि बहिणीचं शिक्षण, लग्न सगळंच व्हायचं होतं.

वैसाखला तसंही सेनेतच भरती व्हायचं होतं… त्याचं हेही स्वप्न होतं लहानपणापासूनचं. कारण त्याच्या जवळच्या नात्यात कुणीही तो गणवेश परिधान केलेला नव्हता तोपर्यंत. वयाची अठरा वर्षे पूर्ण झालीत… आता पैसे कमवायला लागले पाहिजेच आणि त्यासाठी जवळचा मार्ग म्हणजे फौजेत जाणे.

सडपातळ बांध्याचा असला तरी वैसाख मजबूत दम, श्वास असलेला केरळी पोरगा. त्यात उत्साहाने परिपूर्ण भरलेला. त्याला भरती प्रक्रियेनंतर मराठा रेजिमेंट मध्ये सहभागी करून घेण्यात आलं.

सेनेतून मिळणारं वेतन हे सैन्य शिपाई वैसाख यांच्या आईसाठी, बहिणीसाठी खूप मोठा आधार ठरलं. बहीण शिल्पा आता कॉलेजात जाऊ शकत होती.

वैसाख यांनी बहिणीच्या लग्नासाठी पैसे साठवायला सुरुवात केली होती, पण राहतं घर स्वत:चं असणं हेही गरजेचे होते. नोकरीला चार वर्षे पूर्ण झाली होती. घरासाठी त्यांनी कर्जही घेतलं. घराचं बांधकाम सुरु झालं. वर्षातून एकदा दोन महिन्याच्या रजेवर आलेले असताना वैसाख सुट्टी संपत आलेली असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली.. परंतू त्यातून ते बाहेर आले! यात एक महिन्याची रजा वाढवून घ्यावी लागली.

कितीही झालं तरी हा बावीस तेवीस वर्षांचा तरणा गडी. कोणत्याही तरूणाच्या मनात असतात तशाच गोष्टी याच्याही मनात होत्याच… एक छानशी बुलेट मोटार सायकल असावी… आईसाठी, बहिणीसाठी एक छोटी का होईना मोटार असावी… कारण ही दोनच माणसं होती त्याच्या आयुष्यात. त्यांचं सुख हेच त्याचं सुख होतं. त्याने त्याच्या whatsapp about page वर एकदा चार इमोजी ठेवल्या होत्या… लष्करी वेशात असलेला सैनिक, एक छान घर, एक कार आणि एक बुलेट! फार मोठी, अशक्यप्राय नव्हती ही स्वप्नं… पण एका सैनिक शिपायचा पगार तो केवढा… म्हणून त्याने पुढे लिहिलं होतं… Chasing my dreamz! … स्वप्नांचा पाठलाग सुरु होता त्याचा!

काढलेल्या कर्जाचे हफ्ते सुरु होते. घराचं बांधकामही अंतिम टप्प्यात आलं होतं. एक छोटी कार विकत घेण्याएवढे पैसे शिल्लक होते… त्याने ते स्वप्नही पूर्ण केलं.

इकडे फौजेतही त्याचं एक स्वप्न होतं… प्रत्यक्ष समोरासमोर लढायचं.. देशाच्या शत्रूंशी. त्याने विशेष विनंती करून जम्मू-काश्मीरमध्ये नेमणूक मागून घेतली… त्याला राष्ट्रीय रायफल्समध्ये धाडण्यात आले. इथे जेमतेम काही महिनेच उलटून गेले होते तोच… भारतीय लष्कराचे त्यावेळी तब्बल दहा दिवस चाललेले अतिरेकी विरोधी अभियान सुरु करण्यात आलं!

राजौरीमधल्या थानामंडी-शहादरा भागात सुमारे आठ-नऊ किलोमीटर लांबीचं घनदाट जंगल आहे. इथं मोठ-मोठ्या नैसर्गिक गुहा आहेत. अतिरेक्यांचे खूप मोठे गट पाकिस्तानातून इथं घुसखोरी करून लपून बसले होते. त्यांनी या जंगलात त्यांचा एक मोठा तळच बनवला असावा. कारण त्या परिसरात त्यावेळी खूप अतिरेकी कारवाया झाल्या होत्या. त्यामुळे लष्कराला त्यांच्या विरोधात एक मोठी मोहीमच उघडावी लागली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये याच भागात झालेल्या चकमकीत पाच भारतीय सैनिक हुतात्मा झाले होते. इथल्या डेरा दी गली भागात तर खूपच घनदाट जंगल होते.

१० ऑक्टोबर, २०२१ रोजी भारतीय सैनिकांची तुकडी या भागाकडे निघाली होती. अनेक अतिरेकी एका ठिकाणी लपून बसल्याची पक्की खबर असल्याने आपल्या सैनिकांची तयारीही मोठी होती. पत्रकारांना या भागातल्या दहा किलोमीटर्स भागाजवळ येण्यास मनाई करण्यात आली होती. परिसरातल्या शेतात गेलेल्या लोकांना घरी परतण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ड्रोनच्या साहाय्याने पाहणी केली जात होती.

रात्र झाली. राष्ट्रीय रायफल्सची एक गस्ती तुकडी अंधारात पुढे निघालेली होती. एच. वैसाख या तुकडीत तैनात होते. इथं पराक्रम गाजवून मोठ्या अभिमानाने ते सुट्टीवर जाणार होते… घराचं बांधकाम पूर्ण झालं होतं… आई, बहिण तिथे नुकतेच राहायलाही गेले होते… आणि आता वैसाख यांच्या वाटेकडे त्यांचे डोळे लागलेले होते!

एका अंधा-या गुहेला या तुकडीचा वेढा पडला. मिट्ट अंधार.. कुठूनही गोळीबार सुरु होऊ शकत होता… पण आता आपल्या सैनिकांनी पावलं पुढं टाकली होती… माघार नाही आता!

आणि गुहेतून गोळीबार झालाच… परिसरात असलेल्या सैन्य तुकड्यांनी त्यांच्या त्यांच्या जागा घेतल्या… तुकडी प्रमुख नायब सुबेदार जसविंदर सिंग (कपूरथला, पंजाब) नाईक मनदीप सिंग (गुरुदासपूर) शिपाई गज्जन सिंग, (रोपड), शिपाई सराज सिंग (उत्तर प्रदेश) आणि वैसाख एच. (केरळ)… यांनी गुहेला वेढा दिला!

तिथल्या आसपासच्या गुहांमधूनही जोरदार गोळीबार होऊ लागला… या पाचही जणांनी प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली… डोंगर आवाजाने हादरून गेला. जबर जखमी होण्यापूर्वी या पाच जणांनी मिळून काही अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यात यश मिळवले… वैसाख यांच्या रायफलने दोघांना टिपले होते…! अतिरेकी मागे जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. घनदाट जंगल, डोंगर, पाऊस सुरु झाला होता. या जखमी वाघांपर्यंत वैद्यकीय साहाय्य पोहोचवण्याचा प्रयत्न झाला… त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वी यातील काहींनी वाटेतच प्राण सोडले तर बाकीच्यांनी रुग्णालयात उपचार सुरु असताना जगाचा निरोप घेतला… यात एच. वैसाख होतेच… त्यांच्या उघड्या डोळ्यांत त्यांचं नवं घर… नवी स्वप्नं तशीच तरळत होती!

नव्या घराच्या अंगणात वैसाख यांचं पार्थिव ठेवलं गेलं तेंव्हा ते घरही शहारून गेलं असावं. प्रचंड पावसातही शेकडो नागरिक वैसाख यांना अंतिम निरोप द्यायला जमा झाले होते.

 मरणाच्या वणव्यात वैसाख जळत होता तेंव्हा त्याच्या आईला, बहिणीला सर्वस्व गमावल्याची जाणीव दु:खाच्या खोल दरीत आणखी खोल नेऊन ठेवत होती. वैसाखच्या स्वप्नांचा पाठलाग… आता थांबला होता!

 सामान्य कुटुंबांतून असे हजारो वैसाख तळहातावर प्राण ठेवून लष्करात येतात… आणि रणभूमीने हाक मारली की मरणाला आणि सरणाला न भिता तिच्याकडे धावत जातात! ११ ऑक्टोबर, २०२१ या दिवशी एक स्वप्न सरणावर गेले… पण अमर होऊन.

 घराचे कर्ज तर फेडावे लागणारच होते. भारतीय लष्कराने वैसाख यांना देय असलेली रक्कम त्वरीत अदा केली, त्यातून ते कर्ज फेडले गेले. वैसाख यांच्या बहिणीला शिल्पाला स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात लेखनिक म्हणून नोकरी देण्यात केरळ सरकारने विलंब लावला नाही…!

 देश राखायचा झाल्यास बलिदाने अपरिहार्य आहेत. आणि ती देण्यासाठी आपले तरुण तयारही असतातच. त्यांच्या बलिदानांची जाणीव ठेवून शासनकर्त्यांनी, प्रशासकीय व्यवस्थेने त्यांच्या कुटुंबियांना कबूल केलेल्या गोष्टी अविलंब कराव्यात… ही अपेक्षा काही चूक नाही!

 

 वैसाख एच. आणि त्यांच्या समवेत प्राणार्पण केलेल्या नायब सुबेदार जसविंदर सिंग, नाईक मनदीप सिंग, शिपाई गज्जन सिंग, शिपाई सराज सिंग यांच्याही स्मृतींना अभिवादन. सैनिक-कल्याणासाठी कार्यरत असलेल्या, त्यांचे जनतेला स्मरण करून देणा-या कार्यकर्त्यांना नमस्कार.

जय हिंद. जय हिंद की सेना!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted