प्रा.भारती जोगी
इंद्रधनुष्य
☆ “समिधाच सख्या या!!” – यशोदाबाई आगरकर – लेख क्र. २० ☆ प्रा.भारती जोगी ☆
यशोदाबाई आगरकर
पुण्यातील एक प्रसंग… १८९२ साल. फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य शिक्षणतज्ज्ञ श्री. वामन शिवराम आपटे… यांच्या निधनानंतर त्यांचा एक मित्र गोपाळराव त्यांच्या पत्नीला भेटायला गेला. पण त्यांच्या पत्नी रमाबाई नेहमीप्रमाणे समोर आल्या नाहीत. त्या दरवाजा आडूनच बोलत राहिल्या. गोपाळरावांना प्रश्न पडला… काय झाले असे?
मग त्यांना कळले की, वामनरावांच्या भावाने रमाबाईंना त्याकाळच्या रूढी नुसार केशवपन करण्यास भाग पाडले होते. असा विद्रुप चेहरा गोपाळरावांसमोर येऊ नये म्हणून त्या टाळत होत्या. “नको जीणे हे लाजिरवाणे”… हीच वेदना, व्यथा असावी त्यांच्या मनात!!
गोपाळरावांना प्रचंड धक्का बसला. स्त्रियांवर होणा-या, या धार्मिक आणि सामाजिक अत्याचाराचे अस्वस्थ झाले ते! याचा इतका खोलवर परिणाम झाला की, घरी आल्यावर आपल्या पत्नीला जवळ बोलावले आणि अत्यंत भावुक होत सांगितले, ” माझ्या मृत्यूनंतर तू रमाबाईंसारखे केशवपन करणार नाहीस. असे वचन मला आत्ताच दे. त्या शिवाय माझ्या जीवाला शांतता लाभणार नाही. ”
.. पत्नी आपल्या पतीला इतकं भावुक झालेलं बघते आणि त्याच क्षणी त्याला वचन देऊन वचनबद्ध होते. त्या काळात सनातनी रुढी परंपरांच्या विरोधात, सामाजिक सुधारणा आणि स्त्री उन्नती च्या अग्नी पथावरून चालणारा हा धीरोदात्त, खंबीर, काळाच्या पुढचा दूरदर्शीपणा दाखविणारा ‘पथिक ‘ होता… ‘ *गोपाळ गणेश आगरकर! * आणि त्याच अग्नीपथावर चालण्याचे वचन देणारी त्याची सहचारिणी, सहप्रवासिनी होती… *यशोदाबाई आगरकर*!
पूर्वाश्रमीच्या अंबू फडके! वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी गोपाळरावाशी विवाह होऊन ‘यशोदा’ झाल्या. आपल्या पत्नीने केवळ चूल आणि मूल यात अडकू नये, सुशिक्षित व्हावं, जगाचं ज्ञान मिळवावं… असं सुधारक विचारांच्या गोपाळरावांना वाटले. आणि त्यांनी यशोदाबाईंना शिकवले. गोपाळरावांना दम्याचा आजार होता. त्यामुळे च त्यांना यशोदाबाईंना स्वावलंबी बनवून, मानसिक दृष्ट्या खंबीर बनवायचे होते. कारण आयुष्याची दोरी कधी तुटेल याचा भरवसा नव्हता त्यांना.
गोपाळरावांना सुधारणेच्या अग्नी पथावरून चालतांना पुण्यातील कर्मठ लोकांनी केलेल्या छळाचे चटके सोसावे लागले. विरोधकांनी टोक गाठले आणि आगरकरांची जिवंतपणीच प्रेतयात्रा काढत, त्यांच्या घरासमोरून नेली. ” आपुले मरण पाहिले म्यां डोळा! काय वाटले असेल त्यांना? यशोदाबाईंसाठी तर हा केवढा वेदनादायी प्रसंग!
तुटलंच असेल ना त्यांचं काळीज?
वाटलंच असेल त्यांना की, एवढं सोसून आपण काय मिळवतोयं?
त्यावेळी या धैर्याच्या महामेरूने अतिशय शांतपणे म्हंटलं,…
” यशोदे, आज ज्या अंधारात लोक चाचपडत आहेत, तिथे दिवा लावायचा प्रयत्न केला की सुरूवातीला हाताला चटके बसणारच. पण आज ना उद्या, या समाजाला माझ्याच तत्वांचा मार्ग स्विकारावा लागेल. तू फक्त खचू नकोस. “
हे मानसिक बळ देणारे शब्द ऐकले… त्या क्लेशदायक, अपमानकारक प्रसंगी, मग… खचून न जाता धीर धरला. पतीच्या सुधारणावादी विचारांवरील निष्ठा ढळू दिली नाही.
गोपाळराव आणि यशोदाबाई या दोघांचे नाते निग्रहाचे होते… अद्वैती होते!! त्यामुळेच तर… सोबत दोन मुले, एक मुलगी, घरात सतत आर्थिक चणचण, बाहेर पडल्यावर ” सुधारकाची बायको “… या निंदा व्यंजक शब्दाचे सतत झेलावे लागणारे वाक्बाण, सर्व पातळ्यांवरची सामाजिक उपेक्षा…
पण सोशिक यशोदाबाईंनी, या निराशा, उपेक्षा, दु:ख, वेदना याच्याशी अत्यंत संयमाने लढा दिला.
यशोदाबाई म्हणजे… मानसिक बळ, कणखरपणा आणि आगरकरांच्या विचारांना दिलेली खंबीर साथ!!
तसे पाहिले तर… यशोदाबाईंना पतीबरोबर चे सहजीवन खूप कमी वाट्याला आले. पण तरीही गोपाळरावांचे सुधारणावादी विचार यशोदाबाईंच्या मनात मुरले… रूजले खोलवर. “सुधारका ची बायको”… या उपहासाच्या लाटे समोर त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि गोपाळरावांच्या पाठीशी ही उभ्या राहिल्या… अगदी सावली सारख्या!!
आगरकरांचा केवळ ३९ व्या वर्षी अकाली मृत्यू झाला… आणि वचनबद्ध यशोदाबाई आपल्या पतीला दिलेल्या वचनाला जागल्या. केशवपनास खंबीर विरोध करत, ठामपणे नकार दिला आणि आगरकरांच्या स्त्री सुधारणेच्या विचारांचा सन्मान केला.
त्यानंतर आगरकरांच्या मामा दत्तोपंत भागवत यांनी ही गोपाळरावांना दिलेले वचन पाळले आणि यशोदाबाईंना आश्रय आणि सहकार्य दोन्ही दिले. वडिलांनी लढण्याचा धीर दिला, तर दत्तोपंतांनी धीर आणि आधार दोन्ही दिलं. यशोदाबाई अकोल्याला रहायला गेल्या दत्तोपंतांकडे.
यशोदाबाईंच्या वेदनांना विद्रोहाचे धुमारे फुटू लागले. तसं पाहिलं तर विद्रोहाचा अवकाश मर्यादितच होता ; पण तरीही महत्वाचा होता. स्वतः च्याच दु:खात न बुडता… आगरकरांनी रोवलेले स्त्री सुधारणेचे बीज संवर्धनासाठीचे प्रयत्न सुरू केले. दोघांचे केवळ १३ वर्षांचे सहजीवन पुढील ४४ वर्षांच्या स्वतंत्र सामाजिक संघर्षाची शिदोरी ठरले.
आणि सुरू झाली एका समिधेच्या समर्पणाची सुरूवात!
सभोवतीचा अंधार कितीही गडद, व्यापक, गहन, भीषण असला ना तरीही… इवलीशी पण… वेदनेच्या अंधारात जळणारी ही विद्रोहाची वात… निघाली त्या अंधारावर विजय मिळवण्याच्या विश्वासाने… मिटवायला; स्त्रियांच्या वाट्याला आलेला अवहेलना, दास्यत्वाचा अंधार!!!
जळत राहिली ही *यशोदाबाई* नावाची इवलीशी वात!! संथ, मंदपणे जळत राहिली.
यशोदाबाईंना अकोल्याला *मनुताई बापट* नावाची बालविधवा भेटली… आणि तीच त्यांची पहिली विद्यार्थिनी झाली. यशोदाबाईंनी आगरकरांकडून मिळालेला शिक्षणाचा वारसा पुढे चालवला. विधवा महिलांना शिक्षण देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचे काम सुरू केलं.
स्त्रियांची *सुईण* म्हणुनही काम केले. अगदी एकही पैसा न घेता. स्वतः ला पैशाची कितीही अडचण असली तरीही!!! अकोल्यातील पहिल्या सूतिकागृहाच्या उद्घाटनाचा मान या मनस्विनीलाच मिळाला.
येवढे करूनही थांबली नाही… ही प्रज्वलित समिधा! समर्पणाची सिद्धता सार्थकी लावण्यास जणू आतुरलेली!!
यशोदाबाईंनी विधवा महिलांना कुंकू लावण्याच्या एका ऐतिहासिक विद्रोही सभेचे अध्यक्षपद भूषविले. १९३० च्या दशकात म. गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या मीठाच्या सत्याग्रहात सक्रिय सहभाग घेत, राष्ट्रीय ध्वज फडकविला या तेजस्वितेने!!
प्रतिकूल, खडतर, एकाकी परिस्थितीत ही स्वाभिमान आणि आत्मसन्मान टिकवून ठेवणारी ही खंबीर स्त्री… वैजयंती काळे या लेखिकेच्या नजरेतून… *माळावरची मानिनी* ठरली आणि जणू शब्दांनी सन्मानित झाली.
आगरकरांनी स्त्री सुधारणेचे जे बीज रोवले होते त्याला स्वतः च्या संघर्षातून आणि कर्तृत्वातून वटवृक्ष बनविला यशोदाबाईंनी!!
पती निधनानंतर पुढची ४४ वर्षे सामाजिक संघर्षाची शिदोरी पुरवत नेणारी ही संघर्षाची ज्योत १२ जुलै १९३९ रोजी विझली. समईतली एक तेवती शुभ्र कळी निमाली!!!
– लेख क्र. २०.
© प्रा.भारती जोगी
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈






