सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “गुरुदक्षिणा…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
हे काव्यपुष्प मी वाहते … गुरुदक्षिणा अत्यल्पशी
दक्षिणा ही निकस जरी … विद्या ही नित बावनकशी ।।
*
हा ज्ञान-स्वर्गच दाविशी … नित तो आम्हा तू भूवरी
परि दार आमचे तोकडे … घर जरी असे गंगेतीरी ।।
*
भाग्य आमचे थोर म्हणुनी … गुरु मिळाला तुजपरी
भरभरून करिशी दान तू … घ्यावे किती आम्ही करी ।।
*
कलियुगी या दाटले … ते द्रोण गुरु सगळीकडे
दक्षिणेला मान आधी … ज्ञानदान तिथेच अडे ।।
*
काही परी तुजसम गुरु … देणेच ज्यांना माहिती
तो एकलव्यही हळहळे … हे भाग्य नाही त्याप्रती ।।
*
सद्भागी आम्ही की करंटे … प्रश्न हा मजला पडे
तू गुरु आम्हा हे भाग्य … आम्ही शिष्य म्हणुनी तोकडे ।।
*
तव कीर्ती उज्ज्वल गुरुपदी … निशिदिनीच आहे वाढती
आतूर ज्ञानासाठी होऊ … शपथ आज ही तुजप्रती ।।
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





