सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ नकळत… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆
☆
सरसर येती पाऊसधारा
अंगी शिरवे भरती वारा
हिरव्या हिरव्या रंगी रंगून
आषाढ ओंजळीत झेले धरा
*
आषाढ दिनी मेघ सांडला
कातळालाही पाझर फुटला
यक्ष-विरहाचे वहात ओझे
मेघदूत हा झुलत चालला
*
ओशाळ मनाचा सल सुटला
कोंब हिरवा मातीस फुटला
सरीवर सर धावत येऊनी
हिरवा आनंद मनी दाटला
*
शहारूनी कधी येता भावना
मळभाचा काळोख आषाढघना
हुडहुड अंगात भरूवून जाई
चिंबओला हा आषाढ गारवा
*
चातक मधूर स्वरात दंगला
वनात मोरपिसारा फुलला
हिरवे दान सांडत नभातुन
मेघदूत किती! शांत चालला
☆
© सौ.वनिता संभाजी जांगळे (घागरे)
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





वंदेमातरम् सुप्रभातम्
कवी मनाच्या सुंदर प्रस्तुती ला वंदन.
उर्वरा भूमी ला नमन.
खूप छान.