श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ तो तसा…. हा असा... ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
तो आषाढ तसा आणि असा हा श्रावण
तो सहस्रधारा, हा ऋतू मनभावन
*
माळून गळ्यामधे थेंबांचे मणिहार
फेर गुंफिती करात घालुनिया कर
*
तो भिजवीत जाई मुक्तपणाने तन
हा मन रिझवी नेसून कोवळे उन्ह
*
कोसळतसे उद्दाम होऊनी तो तिथे
झिरमिरे सोनसळी उन्हात हा इथे
*
आक्रमे नभाला तो घेऊन घनफौज
थांबतो, बरसतो अशी ही याची मौज
*
सोनेरी किरणे कधी ना दिसती त्याला
हा सजण्यासाठी सदैव कांचन ल्याला
*
अवसेला जातो देऊन दिव्यांचे तेज
व्रत, वैकल्यांचा शोभतो श्रावणी साज
*
आषाढ सरतो, सोडून श्रावणधारा
चैतन्याचे पंख लाभतात मनमोरा
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



