श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ पाटील… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

बारा वस्त्या

 ऐसपैस पांगलेले

 बारा बलुत्याचे गाव

 सूत्री एका ओवलेले

*

 गाव पाटलाचा वाडा

 उंच दूरच्या डोंगरी

 याच्या घारीच्या डोळ्यात

 गावासवे पंचक्रोशी

*

 सारा डोंगर चढून

 गाववारी येई दारी

 हीना दीना रावरंका

 न्याय, हक्काची पंढरी

*

 गावातील गल्ल्याबोळ

 घरे सारी उरावर

 साऱ्या गावची पालखी

 नित्य याच्या खांद्यावर

*

 दारी टांगलेली घंटा

 अपरात्रीही ठणाणे

 येता दारी आगंतुक

 कधी दूरचे पाहुणे

*

 लमाणांचे तंबू कधी

 चक्क याच्या अंगणात

 दाही दिशांची भ्रमंती

 घडे एकाच रात्रीत

*

 खाजगी न अश्रू आता

 खाजगी न खेद खंत

 याचा एकान्त विलीन

 गावच्याच लोकान्तात

*

 गाव रात्रीच्या कुशीत

 जागा पाटील अजून

 गावमाउलीच्या कंठी

 येई अंगाई दाटून

*

 हाडामांसाचा पाटील

 मूर्त एक दंतकथा

 सरलेले सारे द्वैत

 माथा पायथ्याचे आता!

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments