श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ तरी पाऊस सोसले… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
नाही बोलावले चंद्रा,
नाही नक्षत्रे खुडली .
माझी स्वप्नील वैखरी ,
डोही माैनाच्या दडली.
नाही घेतली मी फुले,
माझी ओंजळ रिकामी.
व्यक्त होण्या अव्यक्ताला,
भाषा ठरली निकामी .
नाही पापणी भिजली,
नाही ओलावले काठ.
नाही गुंतलो नात्यात,
गणगोताकडे, फिरवली पाठ.
नाही विचारला जाब,
फक्त स्वताला कोसले.
नाही चिंबचिंब झालो,
तरी पाऊस सोसले.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




