सुश्री प्राची जोशी
कवितेचा उत्सव
☆ मनाचा गाभारा… ☆ सुश्री प्राची जोशी ☆
☆
सागराच्या लाटेची गाज जसे मनीचे हितगूज
वाटे वरवर संथ जरी, खोल खोल अथांगात!!
*
कधी मनीच्या खोल डोहात, आठवणींचा पडतो पाऊस
कधी तरल भावनांचा, उसळतो मनावर तरंग!!
*
कधी मन जाई आत आत उदास, निराशेच्या गर्तेत
त्या भावनांसम जाणिवेने, अविरत हे नेत्र झरतात!!
*
आठवणींचे गोड गाठोडे, मनाच्या खोल कप्प्यात
त्यांच्या सहज सान्निध्यात, मन मोरपिशी आनंदात!!
*
आठवणी दाटतात सुहृदांच्या, मनी त्याचा लख्ख प्रकाश
कधी मनावर दाटते मळभ, अन् जीव होई कासावीस!!
*
कधी वाटे शांत निवांत, आठवणींच्या हिंदोळ्यात
कधी मनाचा होई कल्लोळ, त्यासी कोण सावरेल!!
*
आठवणी या पावसासम, येता जाता भिजवतात
परी त्या भिजण्यामागे, एक असे शांत सरोवर!!
*
असे आठवणींचे येणे जाणे, मनातील शांत सरोवरात
तेजाळली निरांजनाची ज्योत, मनाच्या खोल गाभाऱ्यात….
मनाच्या खोल गाभाऱ्यात….
☆
© सुश्री प्राची अभय जोशी
मो 9822065666
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






खूप सुंदर….अंतरमनाचा शोध घेणारी, उदास मानवरील मरगळ मोरपीसाने धूऊन काढणाऱ्या आठवणीच्या सरीवर स्वार व्होवून, मनाच्या अंतरंगात उतरनारी कविता… मस्त 👌