सुश्री अरुणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ काय आहे सुख?… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
(वृत्त~ पादाकुलक)
☆
सुख दुःखाच्या धाग्यांनी हे
वस्त्र माणसा विणले आहे
त्या वस्त्राते लेवुनिया तुज
आनंदाने जगणे आहे
*
जखडलास तू मायेमध्ये
सुख शोधाया वणवण फिरसी
वाटेमधल्या काट्यांमध्ये
जखमी होता उगाच रडसी
*
सुख सुख म्हणजे काय तरी रे
खेळ सुखाचा आहे मनाचा
घेत रहावा स्वाद सुखाने
कणाकणातिल सौंदर्याचा
*
वसंतातला बहार सुंदर
पर्णाविरहित झाले तरुवर
तरी भासतो शिशीर ऋतुही
देत गारवा किती मनोहर
*
मिसळावा जो रंग जळात
त्या रंगाचे पाणी दिसते
पटलावरच्या रंगावरती
सुखदुःखाचे प्रमाण ठरते
*
सत्याला या जाण मानवा
दुःखाला मग नुरेल थारा
जीवनातल्या वाटेवरती
बरसतील हो शीतल गारा
☆
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





