सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “आनंद फक्त तुझाच” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
☆
थांबावं वाटलं तर नक्की थांब
पुन्हा एकवार स्वतः ला सांग
चालता चालता असशील दमली
पण शर्यत अजून नाही संपली…
*
मना लागेल हळूवार चाहूल
जपून टाक तू एक एक पाऊल
प्रत्येक वळणावर जग देईल हूल
बांधत रहा तू सकारात्मकतेचा पूल…
*
दूर क्षितिजावर स्वप्न तुझे
वाट तुझी रोज पाहत असे
पावलांना तुझ्या बळ त्यांचे
तेवत ठेव मनी नंदादीप आशेचे…
*
पोहाचशील एक दिवस तिथे
खुणावत होते यश तुला जिथे
कोरून ठेव मनात त्याचा आलेख
आयुष्यभर सोबतीला असेल तोच एक…
*
स्वप्न तुझे मार्ग तुझाच
कष्ट तुझे प्रवास तुझाच
आस तुझी मुक्काम तुझाच
यश तुझे आनंद फक्त तुझाच…
☆
💞शब्दकळी विजया 💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




