प्रा. भरत खैरकर
कवितेचा उत्सव
☆ मरणलळा… ☆ प्रा. भरत खैरकर ☆
☆
साहल्या कितीक जीवनाच्या झळा
आता लागलेला मरणाचा लळा!
*
सौख्याचा सुवास कापुराचा धूर
तेवढ्यासाठीच माझा धपापला उर
परी न गवसला ममतेचा दरवळा!
*
वनव्याची आग आत न् बाहेर
झुंजलो एकला देत वाशांना आधार
छताने घराच्या दगा दिला मला!
*
आतल्या गाठींना दाबूनी पोटाशी
मुक्त वागलो मी आल्या संकटाशी
रुतलो दुःखात साहुनी उन्हाळा!
☆
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




