सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ “सुटल्या गाठी...” ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(अनलज्वाला वृत्त ८+८+८)
☆
साक्षीभावे पाही जेव्हा गतकालाला
जाणवते मज अपार तृप्ती शांत मनाला
*
हळूच मग मी पीळ उसवते बंधनातला
तो एक श्वास मुक्त मोकळा तेव्हा सुटला
*
सुटल्या गाठी सुटली माया निरोप समयी
विरक्त झाले संसारी मी नच लोभमयी
*
त्या काळाच्या गाठोड्याला कशास उपसा
का अडकावे पुनश्च आता नुसता जलसा
*
मावळतीचे रंग मनाला किती भुलवती
बघायचे का वळून मागे वळणावरती
*
आयुष्याच्या चौरंगावर विणले धागे
जो येतो तो जातो सारे ठेवित मागे
*
नकोत गाठी नकोत भेटी अलिप्त व्हावे
जळी राहोनि कोरडेपणी सुख मानावे
*
सुखदुःखाच्या गाठी मधले आर्त गुंतणे
काळासोबत विरुनी जावो हेच मागणे
☆
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
radhikabhandarkar@yahoo.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





