श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ समई… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
तुझ्या बंगल्या शेजारी
माझी फाटकी झोपडी
तिथं गिरवतो रोज
जगण्याची बाराखडी
*
नाही अघळ पघळ
भूल थापांचा पसारा
माझा नेटका संसार
मीच मांडलाय सारा
*
तुझ्या देखण्या सुखाचे
नको लाऊ गालबोट
नाही आसपास माझ्या
ख-या खोट्याचा बोभाट
*
जगण्याची धडपड
माझ्या सत्वाची परीक्षा
नाही लपवा छपली
नाही मोक्षाची अपेक्षा
*
नाही नाचार खरा मी
यात नाही काही वाद
जीवाभावाच्या लोकांचा
मला मिळे प्रतीसाद
*
तुझा थाटमाट सारा
आहे व्यर्थ रोषणाई
माझ्या झोपडीत जळे
शांत चित्ताने समई
*
भले बुरे आतताई
सारे भोगलेत भोग
मोह निद्रेतून आता
आली खडाडून जाग
*
भला माझ्या मी घरात
सुखी नांदतो निवांत
तुझ्या ऐश्वर्याचा टाहो
माझ्या घुमतो कानात
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





