वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ हे बंध… ☆ वनिता संभाजी जांगळे ☆
☆
हे बंध नात्यांचे तुटताना ,
उगा गहिवर दाटून येतो .
काळजाला बांधल्या गाठीचा
सल मनात खुपत रहातो
*
वेळेस कधी सावरताना
मी काळास साकडे घालते
या निराधार आभाळाचा
टाहो उरातच फोडते
*
हे बंध मायाजाल होताना
ओझे सरताना न सरते
ही आठवे पुसून टाकताना
मात्र गोंदण मातीत उरते
*
लाट किनार्याहून परतताना
फक्त वाळूच किनारी उरते
वाळूस मुठीत आवळताना
ती हळूवार निसटून जाते
☆
© वनिता संभाजी जांगळे (घागरे)
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




