श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ स्वर्ग स्वातंत्र्याचा… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(“Where the head is held high” ह्या रवींद्रनाथांच्या कवितेचा भावानुवाद)
☆
गगन निरामय निर्भयतेचे
जिथे न कसले बंधन ज्ञाना
स्वत्व रक्षितो जो तो जेथे
जसे जपावे अपुल्या प्राणा
*
जिथे न खंडित मानवताही
मतभेदाच्या क्षुद्र तटांनी
मंदिर जेथे पूर्णत्वाचे
घडे अहर्निश अथक करांनी
*
जीर्ण रुढींच्या, परंपरांच्या
तप्त रणाची झळ सोसुनही
तर्कबुद्धिचा निर्झर झुळझुळ
जिथे मुळीही सुकला नाही
*
ओढ विचारा अन् आचारा
उदात्ततेची, सत्यशिवाची
दिव्य प्रेरणा जेथ यात्रिका
मिळे निरंतर परमेशाची
*
सकल बंधने गळुन पडू दे
काळोखाचा विझु दे कणकण
स्वर्ग अवतरो स्वातंत्र्याचा
माझ्या देशी, हे करुणाघन !
☆
(माझ्या ‘ऐलपैल’ या काव्यसंग्रहातून)
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





