ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ गणेश स्तवन… ☆ ज्योती कुळकर्णी ☆
(वृत्त:पादाकुलक)
☆
नमन करोनी तुला गणेशा
पहिली पूजा तुझी करावी
विघ्ने हरतो बाप्पा म्हणुनी
परंपरा ही सदा जपावी ||१||
*
चमकत असती दोन हिरे या
नेत्री तुजला छान शोभले
नाभी मधली प्रभा हिऱ्याची
तुला पाहुनी भक्त हरखले ||२||
*
चौसष्ट कला ज्ञाता पण्डित
नृत्य नि गायन कला तज्ञही
बुद्धीची ही तुझी प्रभावळ
प्रभा पडू दे भक्तांवरही ||३||
*
काव्य नाटके तुझी पैंजणे
रूणझुण करती आशय सुंदर
वेद पुराणे रत्न अलंकृत
शब्द कोंदणे तत्त्व निरंतर ||४||
*
तव लघु नयनी अवघे हे जग
सांगावे मज कसे मावले
विनायका तू दर्शन दिधले
मस्तक चरणी तुझ्या ठेवले ||५||
☆
© ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







