श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ कुठवर डंका इमानांचा… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
☆
कुठवर डंका ईमानांचा, निष्ठांचे आयुष्य किती
नूर बदलती क्षणाक्षणाला, सरड्यांचे ते रंग किती
*
गरळ ओकतो एक कोण तो, परी गिळावे अन्य कुणी
भोळ्या सांबा, सांग एकदा.. रिचवशील तू वीष किती
*
निर्वाणीच्या क्षणीच निखळे, चाक रथाचे पुन:पुन्हा
नियतीच्या या शापाची मी, भोगायाची सजा किती
*
जपुन ठेवला अजुन घाव तो, पुनर्जन्म मज दिधला ज्याने
दुभंग होवुन अभंग झालो, महात्म्य त्याचे स्तवू किती
*
गुरुकिल्ली ती अजिंक्यतेची, गवसायाची अजुन तुला
चक्रव्यूह ते भेदायाला, सांग रणे मी लढू किती
*
रानभुलींनी दिधली दीक्षा, सुजाण झाली पदयात्रा
अता क्षमा ना भरकटण्याला, घनांध असु दे रान किती
*
परिचित झाली बरीच तीर्थे, उदंड झाल्या प्रदक्षिणा
नकाशात जी नव्हती गावे, शोधायाची अजुन किती
(हरिभगिनी)
☆
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






