डॉ. स्वाती पाटील
कवितेचा उत्सव
☆ पुस्तक तुझ्या – माझ्यातले… ☆ डॉ. स्वाती पाटील ☆
(स्वाती नक्षत्रातील कविता)
पुस्तक तुझ्या- माझ्यातले,
सांग कुठून कसे वाचावे?
पाने आहेत थोडीच, पण त्याच
त्या ओळींवर किती वेळ साचावे..?
अचानक आलेला तो पाऊस,
अबोला भिजवून गेला होता,
हृदयातल्या प्रेमपाखरास,
घरट्यात निजवून गेला होता..
त्या इंद्रधनुसरीवर,
मनमयूर होऊन आजही नाचावे..
पुस्तक तुझ्या -माझ्यातले,
सांग कुठून कसे वाचावे..?
उन्हाळी झळा त्या,
कितीदा फिरून आल्या होत्या,
पिल्लांची सावली होण्यात,
आशा पल्लवीत झाल्या होत्या..
फाटणाऱ्या या संसारास,
मन धागा होऊन आजही टाचावे..
पुस्तक तुझ्या- माझ्यातले,
सांग कुठून कसे वाचावे..?
वादळाचे भय नव्हते,
श्वासांना उसासे कळत होते,
जगण्याचे ऋण भागविताना,
सुख व्याजातच मिळत होते..
अर्ध्या या कवितेचे उरलेपण होताना,
मन आजहि खचावे..
पुस्तक तुझ्या- माझ्यातले,
सांग कुठून कसे वाचावे..?
पाने आहेत थोडीच, पण त्याच
त्या ओळींवर किती वेळ साचावे..?
© डॉ.स्वाती पाटील
सांगली
मो. 9503628150
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




