सौ. जयश्री पाटील
कवितेच्या उत्सव
☆ माझ्या या संसारी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
☆
सडा संमार्जन / चुल मुलं काम /
हेच चार धाम / देवा माझे //१//
*
दळीते कांडीते / नाव तुझे घेते /
आवडे करिते / घर काम //२//
*
रांधिते वाढिते / उष्टे मी काढिते /
घर आनंदिते / सेवाभावे //३//
*
धुणं भांडी सारी / करता करता /
विठ्ठल जपता / समाधान //४//
*
काळजी सर्वांची / घराची दाराची /
सुश्रुषा मोठ्यांची / अत्यादरे //५//
*
घर टापटीप / शोधते सौंदर्य /
अतिथी औदार्य / त्यात देव //६//
*
साथीदार माझा / साथ त्याची देते /
शेतात राबते / सवे त्याच्या //७//
*
काटे कुटे कष्ट / शिवार पंढरी /
माझ्या या संसारी / पांडुरंगा //८//
*
जरी कष्टकरी / भक्ती तुम्हावरी /
पांडुरंग हरी / ध्यास तुझा //९//
*
एक आस आहे / तुझ्या दर्शनाची /
वेळ निर्वाणीची / येण्याआधी //१०//
☆
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





