सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
चित्रकाव्य
मोहरलेला गुलमोहर तू…
सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆
☆
मोहरलेला गुलमोहर तू
मी तव् रसिक निराळी
पुष्पदलांनी तुझ्या लाविले
हळदी कुंकू मम् भाळी
कधी सडा तू अंगांगावर
टाकलास प्रेमाने
रूप तुझे पाहूनच कवने
सुचली मज नेमाने
तुझ्या रूपाने वाटा सजल्या
नखशिखांत मोहरल्या
पायघड्या तू घालत गेला
रोम रोम थरथरल्या
प्रीत कुणाची तव् छायेतच
बहरून बहरून गेली
तुझ्या सवे रे पवन झिंगला
धुंद भ्रमंती केली
वाटा झाल्या शोभिवंत जणू
फुलदाण्या फुललेल्या
लाल जांभळ्या आणि केशरी
रंगरंगी खुललेल्या
निलमोहर म्हणती कोणी
गगनाचा रहिवासी
सुंगंधासही भुरळ पडावी
रंगांची मखलाशी
मोराचे फुल कोणी म्हणती
कोणी जंगलची ज्वाला
मनोमनी रुजतो जणू कान्हा
कृष्णचुडा म्हणती त्याला
कडेकपारी डोंगररांगा
गुलमोहराने सजल्या
कविता होऊन शब्द फुलांनी
मनात माझ्या रूजल्या
☆
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




