सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
चित्रकाव्य
किती देखणी गांधारी…
सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆
भावगीत (वर्ण संख्या सोळा यती आठव्या अक्षरावर)
☆
शालू नेसलं शिवारं काठ त्याचे जरतारी
बांधाबांधावर आली किती देखणी गांधारी
*
कांगोण्याची फुले छान चांदण्याच आकाशीच्या
सप्तरंगी उमलल्या कळ्या पहा टनटनीच्या
झाली कुंपणं साजरी शिवाराला राखणारी
बा़धाबांधावर आली किती देखणी गांधारी
*
चार पाकळ्याचे फूल गुच्छागुच्छाने उमले
तिच्या मोहक गंधात मन माझेही रमले
वैद्य आहे ही जालीम खोड मूळं पाने सारी
बांधाबांधावर आली किती देखणी गांधारी
*
पायवाट नागमोडी दिसतात गोड फुले
लक्ष वेधती साऱ्यांचे पुष्पगुच्छ पहा डुले
रंगपंचमी चालली हिरव्या पानात न्यारी
बांधाबांधावर आली किती देखणी गांधारी
*
रानामध्ये पिकं डोले बांधावर रंग सारे
किती मस्तीत वाहती शिळ घालणारे वारे
शेतीमाती चैतन्याने रंगरूपे सजणारी
बांधाबांधावर आली किती देखणी गांधारी
*
नववधू माती झाली तिला साज घाणेरीचा
फुला फुलांनी सजला हिरवा पदर तिचा
फुलावर विसावती फुलपाखरांची स्वारी
बांधा बांधावर आली किती देखणी गांधारी
☆
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





