सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
चित्रकाव्य
यामिनी भाळे निशिगंधावर…
सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆
☆
रजनीगंधा उमलून आली
सुगंध चोहिकडे
भिरभिर भिरभिर फुला फुलावर
फुलपाखरू बागडे
*
यामिनी भाळे निशिगंधावर
धवलांगी चांदणं कांती
चषक भरावे अत्तर घेऊन
निसर्गातली प्रसन्न शांती
*
चंद्र म्हणाला चांदणं टिकल्या
धरणीवर का गेल्या
सुगंध घेऊन निशिगंधाचा
जणू सुवासिनी सजलेल्या
*
धवल चंद्रिका शृंगाराने
खुणावते वाऱ्याला
आला आला बहर फुलांचा
पुष्पगुच्छ घेऊन आला
*
गंधकुपी ती हळूहळू उघडे
कलिका खुलवत येतो
सुगंध मजला वेड लावतो
अत्तरफाया देतो
*
हार तुऱ्यातच शोभा याची
जिकडे तिकडे दिसतो
गजर्यामध्ये, प्रभु चरणावर
निशिगंध सुखावून हसतो
*
शब्द देऊनी मला म्हणे तो
कर माझ्यावर कवने
या जगताने ऐकावी या
गुलछडीवरची स्तवने
*
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




