सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
चित्रकाव्य
मधुमासी तू धुंद मोगरा…
सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆
[वृत्त – सूर्यकांत (समुदितमदना), मात्रा- 8+8+8+1+2=27]
☆
चैत्र बहरला तुझ्या रुपाने वसंत उत्सव घडे
मधुमासी तू धुंद मोगरा सुगंध मज आवडे||ध्रु||
*
मोहरताना वेलीवरती रूप देखणे वसे
पानोपानी शुभ्र धवलसे जणू ठेवले ठसे
वात येवुनी छेड छेडतो अत्तर फाया उडे
मधुमासी तू धुंद मोगरा सुगंध मज आवडे ||1||
*
गुंडूमलई कुणी मोतिया, वसई नाम तुजला
हृद्यगंध मज सुखावणारा मदनबाणी सजला
बटमोगऱ्यात गंध वेढतो वेलीवर सापडे
मधुमासी तू धुंद मोगरा सुगंध मज आवडे ||2||
*
ज्ञानेशाने अभंगातुनी मान दिला रे तुला
कवनांमधुनी तुला लाभला शब्द फुलांचा झुला
मकरंदाला तुझ्या चाखण्या मिलिंद बघ बागडे
मधुमासी तू धुंद मोगरा सुगंध मज आवडे ||3||
*
संनिध तुझीया देव देवता सुखावती साजरे
नवरी सजली फुलवंतीने रूप तिचे लाजरे
वेलींवरच्या धुंद तारका चमचमणारे खडे
मधुमासी तू धुंद मोगरा सुगंध मज आवडे ||4||
*
कुंतलात मी तुला माळले शोभा रे वाढली
कवितेमधुनी शब्दफुलांनी दृष्ट तुझी काढली
झिरमिर येता ग्रीष्माची सर रूप फुले तव् गडे
मधुमासी तू धुंद मोगरा सुगंध मज आवडे ||5||
☆
© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर
औसा.
मोबा. नं. ८८५५९१७९१८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈







