श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
हिशोब पूर्वसंचितांचा…
श्री आशिष बिवलकर ☆
☆
प्रत्येक श्वासासाठी संघर्ष,
नियतीने लिहिलाय भाळी |
कोवळ्या वयात डायलीसिस,
असह्य वेदना त्याला छळी |
*
भोग शरीराचे देताना,
दैव करत नाही विचार |
लहानग्यांना देखील,
सोसावे लागती उपचार |
*
काय असतो अपराध,
निरागस कोवळ्या जीवाचा |
खेळ मांडते ते प्रारब्ध,
हिशोब पूर्वसंचितांचा |
*
पालक होतात हतबल,
त्याच्यासाठी करून धडपड |
पोटच्या गोळ्यासाठी देतात,
नशिबाची परीक्षा अवघड |
*
आयुष्याच्या सारीपाटावर,
नियती फेकत असते फासे |
सोंगटी सारखे खेळवतं,
खेळ खेळते तिला हवे तसे |
*
हातीपायी धडधाकट असणाऱ्यांनी,
संघर्ष अशा बालकांचा तो बघावा |
जमेल तसा माणुसकीचा आधार,
अशा कुटुंबांना आपुलकीने द्यावा |
©️ वास्तवरंग
☆
(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर)
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






