डॉ. शैलजा करोडे
जीवनरंग
☆ तेरी मेरी प्रेमकहानी… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
सूर्य मावळतीला गेला आहे. चोहीकडे संधीप्रकाश पसरला आहे. डिसेंबर महिना असल्याने हुडहुडी भरवणार्या थंडीने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला सुरूवात केली आहे. शहराबाहेर फारशी वर्दळ नसणार्या व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्यालयात मी माझे बाबा, आई व आमच्या दोन कुटुंब हिंतचिंतकासह बसलेली आहे. दिव्याच्या अगदी मिणमिण प्रकाशात अंधुकसा अंधार जणू अंगावर येत आहे.
गेल्या वर्षभरापासून या केंद्रात पुनर्वसनासाठी भरती असलेल्या माझ्या नवर्याला आज डिस्चार्ज मिळणार म्हणून आम्ही सगळे जमलेलो. बाबा कार्यालयीन पूर्ततेत गुंतले होते. पत्नी म्हणून माझ्या नवर्याला मी सोडवून नेऊ शकत असल्याने आम्ही हे पाऊल उचललेले.
“मॅडम, या लेटरवर सही करा “
मी सही केली. अक्षय माझ्या नवर्यासह पुनर्वसन केंद्राला आम्ही बाय करून निघालो.
सावित्री तू होतीस म्हणूनच मी जगू शकलो. तू नवजीवन दिलं आहेस मला. आता तुला सावित्री याच नावानं मी हाक देत जाईन.
“अक्षय, कितीही अडथळे आले तरी आपलं प्रेम अक्षय आहे, ते कधीच संपणार नाही. “
O my love. म्हणत अक्षयने एक प्रेमळ कटाक्ष माझ्याकडे ठाकला.
आज कशा अवस्थेतून मी त्याला सोडवलं होतं.? कोणत्या अशा शक्ती होत्या कि ज्यांनी व अक्षयमध्ये दुरावा निर्माण केला होता? . कशी सांगणार ही कथा दोन शब्दात. ” तेरी मेरी प्रेमकहानी है बडी मुश्कील, दो लब्जों मे ये बया ना हो पाए “
“अक्षयचं स्थळ माझ्यासाठी सांगून आलेलं. घरची गरीब परिस्थिती, पण मुलगा डाॅक्टर असल्याने बाबांनी स्थळाला होकार कळवला.
” बाबा, हा डाॅक्टर आहे. दारू पित असेल तर, ” माझी शंका.
” बाबांनी सरळ मुद्यालाच हात घेतला. अक्षय दारू पित होता, पण पिणार नाही शपथेवर बोलला.
लग्नानंतर सुरूवातीचे दोन /चार वर्ष चांगले गेले. माझ्या घरात प्रथमेश चिमणा ही आला. घर कसं आनंदानं भरलं.
हळूहळू अक्षयने रंग दाखवायला सुरूवात केली. रात्री बेरात्री उशीरा घरी येणंं, पार्ट्यांमधून दारू पिऊन येणं सुरू झालं. मी विरोध करताच, चारचौघात तसं वागावं लागतं. माझ्या व्यवसायाचा तो एक भाग आहे म्हणायचा. ”
अक्षयचे नातेवाईकही पैशांना लोचणारे होते. याचं लग्न आम्ही करायलाच नको होतं इथपर्यंत यांची मजाल गेलेली. अक्षयला चुकीचे सल्ले देणं, त्याच्यात व माझ्यात दुरावा निर्माण करणं सुरू झालं.
अक्षय तसा imotional fool होता. हलक्या कानाचा होता. त्यांच्या आडसट्यात तो वाहवत गेला. त्यातचं त्याच्याच हाॅस्पिटलमधील विधवा डाॅक्टर त्याच्यावर प्रेमजाळं टाकत होती.
चारी बाजूंनी मला नेस्तनाभूत करण्यात ही मंडळी यशस्वी झाली. अक्षय दुरावला. वहिनीच्या अंकित असलेला अक्षय तिच्या हातचं बाहुलं झाला. अक्षयचं दारूचं व्यसन तिनं नवर्याच्या मदतीनं वाढवलं. आणि दारूच्या नशेत अक्षयचं घर, बँक बँलन्स, शेअर्स, विमा, कॅश सगळं सगळं हडप केलं. सगळं लुटून झाल्यावर, ” निघ आमच्या घरातून म्हणत अक्षरशः त्याचं सामान फेकलं. अक्षयने विरोध करताच त्याला जबर मारहाण केली व या व्यसनमुक्ती केंद्राची मदत घेऊन, त्यांना खोटंनाटं सांगत त्याची रवानगी इथे केली.
वर्षभर या केंद्रात खितपत पडल्यावर आज मी याची सुटका केलेली.
राम सीतेसारखा चौदा वर्षाचा माझा वनवास आज संपला होता. अक्षरशः मरणाच्या दारातून मी अक्षयला आणलं होतं. माझ्या मंगळसूत्रात व भाळावरच्या कुंकवाच्या शक्तीनेच तो माझ्यापर्यंत पुन्हा पोचला होता. कितीतरी वर्षाने नववर्ष माझ्या जीवनात आनंद घेऊन आलं होतं.
“काय सावित्री काय म्हणतेस ” ” आज आपलं प्रेम जिंकलं अक्षय ” ” होय, तुझ्या प्रेमात ती शक्ती आहेच ” FM Radio वर गाणे सुरू होते.
” तेरी मेरी प्रेमकहानी है बडी मुश्कील
दो लब्जों मे ये बया ना हो पाए “
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – karodeshailaja@gmail.com





